राहुल गांधी आले, पुण्यात आग लावून गेले

  • विजय चोरमारे

राहुल गांधी पुण्यात येऊन गेले. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांनी भारतीय राजकारणात आणि समाजकारणात अक्षरशः आग लावली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यावेळी प्रस्थापित व्यवस्थेमध्ये मध्ये जी आग लागली होती, जशी आग लागली होती तशाच प्रकारची आग तब्बल पावणे दोनशे वर्षांनंतर राहुल गांधी यांनी पुण्यात लावलेली आहे. पुण्यातून लावलेली आहे. आता ही आग कशी देशभर फैलावते हे नजीकच्या काळात आपल्याला बघावं लागणार आहे.

राजकारणाची नवी दिशा

एखादा राजकीय नेता येतो त्याची मोठी सभा होते सुमारे चाळीस हजार मुली कार्यक्रमाच्या ठिकाणी असतात पण तो कोणत्याही प्रकारचं राजकीय भाषण करत नाही, असं आपल्याकडे कधी घडताना दिसत नाही. मला पहा फुले वाहा, असंच राजकीय नेत्यांचं वर्तन असतं. राहुल गांधी यांचा पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रम या परंपरेला छेद देणारा होता.

हेही वाचाःराहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!

थेट राजकारणाची कोणतीही चर्चा न करता आपल्याला राजकारण कोणत्या दिशेने न्यायचं आहे ते राहुल गांधी यांनी पुण्यातल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलं आहे.

राहुल गांधी यांचा पुण्यातील छात्रों की गुंज हा कार्यक्रम काही नवा कार्यक्रम नाही. यापूर्वी राजस्थानातल्या कोटा आणि उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज आदी ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे. तिथेही तरुणांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला होता. पण त्यावेळी तिथल्या सरकारांनी, तिथल्या राजकीय कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले नव्हते. महाराष्ट्रात मात्र छात्रों की गूंज या कार्यक्रमाची तयारी सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने त्याच्या विरोधात अपप्रचार सुरू केलेला होता.

भाजपच्या विरोधाचा फायदा

अगदी राज्याचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते त्यांच्या अगदी तळातल्या सामान्य प्रवक्त्यापर्यंत सगळे लोक राहुल गांधींच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात अपप्रचार करीत होते, खोटी माहिती प्रसारित करीत होते. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुलांना पैसे वाटले जात आहेत, या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी पैसे वाटले जात आहेत अशा पदध पद्धतीने सातत्याने एक अपप्रचाराची मोहीम चालवली जात होती. आणि ती भारतीय जनता पक्षावरच उलटत होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आभार मानायला पाहिजेत.

हेही वाचाः राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

प्रयागराजचा कार्यक्रम झाला कोटाचा कार्यक्रम झाला, त्याच्या बातम्या किंवा त्याची चर्चा त्या शहरापुरती त्या त्या राज्यांच्यापुरती मर्यादित होती. पण पुण्यातला कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम ठरला. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याला इथे विरोध केला. आणि या विरोधामुळे इथे एक राजकीय रणाचं स्वरूप आलं आणि स्वाभाविकपणे पुण्यातला कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम बनला. त्याचा फायदा राहुल गांधी यांना झाला हे लक्षात घ्यावं लागेल.

चौकटीबाहेरचे मुद्दे मध्यवर्ती राजकारणात

आपण या कार्यक्रमाच्या आशयाकडे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे प्रेझेंटशन सुरू केलं ते बघितल्यानंतर वाटायला लागलं की हे काय करायला लागलेत. आता हा गडी बोअर करून टाकतोय की काय, असं अनेकांना वाटलं असणार. म्हणजे अशा पद्धतीने स्लाईड शो करणं, मनुस्मृतीतली कोटेशन देणं आणि महिलांच्या प्रश्नांची एक वैचारिक पद्धतीने काही चर्चा करणं हे खरंतर मोठ्या राजकीय कार्यक्रमांच्या मधे घडत नाही. छोट्या सभागृहातल्या अकॅडमिक चर्चासत्रांमध्ये हे घडत असतं. म्हणजे एका मर्यादित वर्तुळापुरते असलेले मुद्दे त्यांनी देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती चर्चेत आणले, हे पुण्यातील कार्यक्रमाचे प्रमुख यश म्हणावे लागेल.

हेही वाचाः सावित्रीबाईंवर  शेणाचे गोळे  फेकणाऱ्या प्रवृत्तीचा राहूल गांधींच्या कार्यक्रमाला  विरोध

मुलींच्या संदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, तेही पुन्हा महाराष्ट्रात किंवा देशभरात ज्या पद्धतीने स्त्री केंद्रित राजकारण सुरू आहे. स्त्रियांना कुठे पंधराश रुपये महिना दिले. कठे वार्षिक दहा हजार रुपये दिले. आणि असे पैसे दिले की आपलं सगळं राजकारण साधून जातं, अशी धारणा वाढत चालली आहे. त्यादृष्टीने सत्तेतले पक्ष पैसे वाटपाचे कार्यक्रम घेत आहेत.

आता लाडकी बहिणच्या पुढचा टप्पा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलाय. म्हणजे महाविद्यालयीन मुलींना पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगितलंय. तर हे सगळे लाडक्या बहिणींच्या पासून विद्यार्थिनींना पॉकेट मणी देण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींना सुरुंग लावून राहुल गांधी गेले आहेत.

हेही वाचाः राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह

तुम्हाला सरकारी पातळीवरून ज्या पद्धतीने विकत घेण्याचा प्रयत्न होतो त्यातून तुमची गुलामगिरी वाढत जाते. आधीच तुम्हाला पितृसत्ताक व्यवस्थेने इथं गुलाम बनवून टाकलेल आहे. वडील, नवरा, मुलगा यांच्या बंधनात इथली स्त्री आयुष्यभर राहते तिला कोणतंही स्वातंत्र्य नाही वगैरे.

माध्यम नव्हे, आशय महत्त्वाचा

 जंतरमंतरवरच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्राम रील केला होता. म्हणजे रील अशासाठी की त्यांना असं वाटलं, आजच्या या जेनझीशी कनेक्ट व्हायचं असेल तर Instagram रील बनवायला पाहिजे. म्हणजे त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही तशा सूचना केल्या होत्या. जेनझीशी कनेक्ट होण्यासाठी Instagram रील बनवा. अर्थात तुम्हाला जेएनझीशी कनेक्ट व्हायच असेल तर त्यांच्याशी जे संबंधित मुद्दे आहेत, त्यांच्यासाठी जे जळते प्रश्न आहेत ते प्रश्न हाती घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करा असं सांगितलं नाही.

म्हणजे तुमचा आशय काही असू दे. त्यांच्या दृष्टीनं टूल महत्त्वाचं आहे. माध्यम महत्त्वाचं आहे. इतका बाळबोधपणा भारतीय राजकारणात यापूर्वी कधी कोणी पाहिला असेल असं मला वाटत नाही. तर पंतप्रधान मोदी Instagram शी कनेक्ट झाले. तिथं काय म्हणाले, तर मला या मुलींच्या भाषेच्यामुळे कल्चरल शॉक बसला. मुलांनी शिव्या दिल्या त्याचं काही वाटलं नाही, पण मुलींनी शिव्या दिल्या ते धक्कादायक होतं. राहुल गांधी यांनी हे सगळं समोर आणून पुरुषसत्ताक मानसिकतेवर नेमकेपणाने बोट ठेवलं.

मन की बात नव्हे…

राहुल गांधींनी इथे येताना एक गोष्ट केली. ती म्हणजे त्यांनी `मन की बात` केली नाही. मनुस्मृतीच्या अनुषंगानं बोलताना मनुस्मृतीनं स्त्रियांना कसं दुय्यम स्थान दिलं हे मांडताना त्यांनी मुलींनाच बोलायला लावलं. आणि मुलींनीच सांगितलं की आपल्याला समाजात कशा पद्धतीनं दुय्यम वागणूक दिली जाते. कुटुंबापासून समाजापर्यंत सगळ्या ठिकाणी मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटत नाही. एका आदिवासी भागातील मुलीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. वसतिगृहांच्या समस्या मांडल्या. एका मुलीने पेपर फुटी मुळे मुलींना अधिक फटका कसा बसतो हे सांगितलं. मुलींच्या तोंडून राहुल गांधी यांनी मुलींच्या, स्त्रियांच्या समस्या अतिशय प्रभावीपणे मांडल्या.

नेहा राठोडचे सरप्राईज एलिमेंट

आपण अलीकडे सिनेमा बघतो, त्या सिनेमात काही सरप्राईज एलिमेंट असतात. म्हणजे एखाद्या सिनेमात सरप्राईज म्हणजे हिरो हिरोईन सगळे पोस्टरवर असतात. पण अचानकच त्या मुख्य हिरोच्या तुल्यबळ असलेला एखादा कलावंत मधेच एखाद्या प्रसंगात येऊन जातो. तसं या एकूण कार्यक्रमातलं सरप्राईज एलिमेंट नेहा राठोड होतं.

नेहा राठोड आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून माहित आहेत भोजपुरी मध्ये गाणी लिहिणाऱ्या कविता लिहिणाऱ्या आणि गाणी सादर करणाऱ्या कलावंत म्हणून. मोदी सरकारला प्रश्न विचारणा-या कलावंत म्हणून. नेहा राठोड यांनी धमाल उडवून दिली. अनेक वर्षे आयटी सेलवाले मला शिव्या देतात पण मी सुधारले नाही, असं त्या म्हणाल्या, त्यावर राहुल गांधींनी दिलेला प्रतिसादही अफलातून होता.

राहुल गांधींमधील बदल

राहुल गांधी बदललेत, राहुल गांधी प्रगल्भ झालेत, राहुल गांधी आक्रमक बनलेत अशा चर्चा अलीकडच्या काळात प्रसार माध्यमांच्यामधून केल्या जातात. हे खरं आहे का तर खरं आहे. त्याच्या पाठीमागे त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी जे राजकीय यश आहे तेही महत्त्वाचं आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागा मिळाल्या आणि राहुल गांधींच्या पाठीमागे शंभर खासदारांचं बळ लोकसभेत उभं राहिलं. ते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते बनले आणि  त्यांना घटनात्मक संरक्षण मिळालं.

हेही वाचाः Rahul attacks Shah: देशाला मध्ययुगात नेण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

त्यानंतर ते लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीनं त्यांच्यासमोर तेवढ्याच ताकतीनं उभे राहू लागले. तिथून पुढं ख-या अर्थानं दोन्ही नेत्यांच्यातली तुलना होऊ लागली. भारत जोडो यात्रेनंतर बदललेली स्थिती आणि लोकसभेतील शंभर जागा यामुळं वाढलेला आत्मविश्वास हे महत्त्वाचं कारण आहेच. तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतोय. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन धरणे आंदोलन करण्यापासून संसद मार्ग पोलिस ठाण्यात एका एफआयर साठी साडेसात तास बसून राहण्यापर्यंतच सगळं जे राहुल गांधींच अलीकडच राजकारण दिसतं ते सामान्य माणसाशी कनेक्ट होणार राजकारण आहे.

राहुल गांधी आणि लोकांचे प्रश्न

आता मुद्दा आहे तो राहुल गांधी लोकांचे प्रश्न मांडतायत का? राहुल गांधी लोकांचे प्रश्न फार सुरुवातीपासून मांडताहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळातल नवखेपणा असेल, प्रगल्भपणा नसेल. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने केलेली त्यांची पप्पूची प्रतिमा असेल. कुणी काहीही म्हटलं तरी राहुल गांधी अगदी सुरुवातीपासून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडत होते.

आपल्याला आठवत असेल की २२ जुलै २००८ रोजी राहुल गांधी लोकसभेत पहिल्यांदा बोलले होते. यूपीए सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी राहुल गांधींनी संसदेत पहिले भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी विदर्भातल्या कलावती या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचा मुद्दा विषय उपस्थित केला होता. या कलावतींचे नाव नंतरही भारतीय राजकारणात वेळोवेळी चर्चेत आले.

त्यानंतरसुद्धा त्यांनी सातत्याने इथल्या तरुणांचे, तरुणींचे, बेरोजगारांचे, आदिवासींचे, दलितांचे, अन्यायग्रस्तांचे प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. पण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने धर्माचे राजकारण करतोय, ज्या पद्धतीने धर्मा-धर्मात विद्वेष पसरवण्याचं काम करतोय – हे राजकारण आणि त्याला इथल्या मध्यवर्ती धारेतल्या प्रसारमाध्यमांची मिळणारी साथ आणि त्यांच्याकडून राहुल गांधींच्यावर होणारा अन्याय यामुळे राहुल गांधींचे हे मुद्दे तेवढ्या प्रभावीपणे लोकांच्या पुढे येत नव्हते.

विद्वेषाच्या राजकारणाला छेद

हिंदू मुस्लिम राजकारण हेच भारतीय राजकारणात गेली काही वर्षे सातत्याने चाललेलं होतं. पण त्या राजकारणाचा फोलपणा आता लोकांच्या लक्षात यायला लागलाय. त्या राजकारणातून काही साध्य होत नाही. बेरोजगारीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत. शिक्षणाचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत. पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. हे सगळं लक्षात आल्यावर तरुण पिढी रस्त्यावर यायला लागली.

कॉक्रोच जनता पार्टीनं जे आंदोलन उभारलं ते आंदोलन तेवढ्याच प्रखरतेनं पुढं नेण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं. गेल्या काही दिवसात राहुल गांधी ज्या पद्धतीचे राजकारण करतायत त्याचा परमोच्च बिंदू म्हणून पुण्यातल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाकडे बघता येईल. हा कार्यक्रम फक्त आणि फक्त मुलींसाठी होता. मुलींनी पुरुषसत्ताक व्यवस्था झुगारून द्यावी, पिंजरा तोडावा असं थेट आव्हान राहुल गांधींनी केलं. काँग्रेसच्या नेत्यांना तरी राहुल गांधींचं हे आव्हान किंवा हे मुद्दे किती पचणी पडतायत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related posts

राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

राहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!

राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच अभाविप, एनएसयुआय कार्यकर्ते भिडले