जमीर काझी : मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली त्या पुणे शहरात मुलींसाठी विशेष ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम होत आहे. हा पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी सांगितले आहे. (Rahul Gandhi interacts with students in Pune)
काँग्रेस नेत्यांनी केली पाहणी
राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गुंज’ हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम २२ ॲागस्टला पुण्याच्या एसएसपीएम मैदानावर होणार आहे. त्याच्या तयारीची पाहणी आज काँग्रेस नेत्यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ज्येष्ठ नेते सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती, मनोज त्यागी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्य़क्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस (पूर्व) चे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम अध्यक्ष दिप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
१२ वर्षात १५४ वेळा पेपर फुटले
यावेळी सपकाळ म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून बहुजनांचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने आर्थिक लोभाच्या मोबदल्यात संधी देण्याचा सपाटा लावला आहे. नीट परिक्षा, न्यायालयातील भरती परीक्षा, टीईटी परिक्षा अशा सर्व परिक्षामध्ये घोटाळे होत असून पेपर फुटीचे ग्रहण लागले लागले. वन नेशन, वन इलेक्शन, याप्रमाणे वन नेशन, वन एक्झामिनेशन लागू करत विशिष्ट जातीवर्ग व पैसे देऊन पेपर विकणे, पक्ष फोडाफोडी करून वन नेशन, वन पार्टी करण्याचा भाजपाचा डाव आहे. परीक्षा आणि शिक्षण या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. गेल्या १२ वर्षात १५४ वेळा पेपर फुटले आहेत, त्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिला पण मोदी-शाह यांनी चर्चेपासून पळ काढला. शिक्षण व्यवस्था कशी असावी यासाठी व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज अभियान सुरु केले आहे. (Rahul Gandhi interacts with students in Pune)
मोहन भागवतांचा कार्यक्रम मॅच फिक्सिंग
छात्रों की गुंज कार्यक्रमावर टीका करताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस गडबडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झी बरोबर केलेला कार्यक्रम हा सिलेक्टिव्ह मुलांसाठी होता. तो मॅच फिक्सिंग कार्यक्रम होता, मोहन भागवत यांच्या फिक्स सामन्यासारखा छात्रों की गुंज हा कार्यक्रम असावा असे फडणवीस यांनी वाटत असेल पण हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, त्यांना जर कोणाला पाठवायचे असेल तर त्यांनी पाठवावे. फडणवीस हे उच्च विद्याविभूषित आहेत, बारकोड काय असतो हे त्यांना माहित असावे असे आम्हाला वाटते म्हणून त्यांची टीका हा केविलवाणा प्रकार असून त्यांचे वक्तव्य अज्ञानपूर्ण आहे. छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा व मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने भयगंडातून त्यांनी विधान केले आहे. भाजपाला जळी काष्टी पाषाणी फक्त राहुल गांधीच दिसत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमाला तरुणाईचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाने धसका घेतला म्हणून तिरंगा यात्रा काढावी लागत आहे, असेही सपकाळ म्हणाले.
आरएसएसच्या शाखेत वंदे मातरम सुरु करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या कार्यालयावर ५० वर्ष तिरंगा झेंडा फडकावला नाही, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही संबंध नाही त्यांच्या व त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष ९० वर्षापासून वंदे मातरम गात आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरु, महात्मा गांधी यांनी निश्चित केलेले व गायलेले वंद मातरमच काँग्रेस गाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शाखेत वंदे मातरम गाण्यास सुरुवात करावी असे आव्हानही सपकाळ यांनी दिले. (Rahul Gandhi interacts with students in Pune)