राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

  • सुजय शास्त्री

राहुल गांधींच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमाने काँग्रेसमध्ये एक नवे चैतन्य आले आहे. अत्यंत गलितगात्र, पराभूत मानसिकतेत सापडलेली काँग्रेस गेल्या वर्षभरात राहुल गांधींच्या राजकारणाने ढवळून निघालेली दिसते आहे. राहुलने काँग्रेसला रस्त्यावरची लढाई करण्यास प्रवृत्त केले आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

डम्पिंग ग्राऊंडच्या ढिगा-यावर

बरोब्बर दहा वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडला भेट दिली होती. मुंबईतल्या सर्वात मोठ्या डम्पिंग ग्राउंडला सतत आगी लागत होत्या. त्या मुद्द्यावर राहुल यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्या वेळी मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचा प्रचंड गवगवा झाला होता. स्मार्ट सिटी वगैरे लंब्याचवड्या घोषणांचा तो सुकाळ होता. त्या सुरुवातीच्या काळात राहुल गांधी देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर पोहचले. तेथील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.

या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. मुलांना क्षयरोग होत आहे. यात एका मुलाचा मृत्यूही झाल्याचे ते सांगत होते. मुंबई ही भारताची आणि प्रगतीची ओळख आहे आणि अशा शहरात असा कचरा डेपो असता कामा नये असे ते म्हणाले होते.

त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहुल गांधी चढून गेले होते आणि त्यांच्या मागे टाटा सफारी, टोयोटो कोरोला, मर्सिडिजमधून घाम पुसत काँग्रेस नेते पळापळ करत होते. तो फोटो त्यावेळी माध्यमांमध्ये गाजला होता. राहुल गांधी यांनी तेव्हाच काँग्रेसला रस्त्यावर उतरण्यास सांगितलं होतं. पण सुस्त काँग्रेस नेते रस्त्यावरच्या लढाईत फारसे उत्सुक नव्हते.

पुढचा या दशकातला काँग्रेस नेत्यांचा इतिहास सर्वज्ञात आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपशी दोन हात करण्यापेक्षा त्यांच्या गोटात जाऊन आपले गड, जहागिऱ्या वाचवल्या. आजही अनेक नेत्यांचे तेच प्रयत्न सुरू आहेत.

नव्या प्रश्नांचे भान

असे पक्षातले अंतर्विरोध असूनही पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमाने काँग्रेसमध्ये एक नवे चैतन्य आणण्याचे काम केले आहे. सुस्त नेत्यांना त्यांनी कोणते प्रश्न आपण हाती घेतले पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्ताधाऱ्यांवर केवळ राजकीय टीका म्हणजे राजकारण नव्हे तर बदलत्या समाजाच्या आकांक्षा, त्यांचे प्रश्न हाती घेऊन त्याची उत्तरे सतत मागणे हे राजकारण असल्याचं त्यांनी सांगितलं. हा अत्यंत प्रगल्भ राजकीय विचार त्यांनी काँग्रेसला दिला आहे. त्याची देशाच्या राजकारणाला या घडीला गरज आहे.

आज राजकारणाचे विषय हे वाढते नागरीकरण, झोपडपट्ट्या, वाहतुकीची कोंडी, रस्त्यावरचे खड्डे, उत्तम रस्ते, पाणी, चालायला फूटपाथ, मुलांना खेळायला बागबगिचे, मैदाने, क्रीडांगणे, वृद्धांसाठी आरोग्य योजना, चांगली शिक्षण व्यवस्था, पर्यावरण, रोजगार, शेती समस्या इ. इ. असायला हवेत. ते न होता राष्ट्रवाद, हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान-बांगलादेश, हिंदुत्व, चिनी वस्तूंवरील बहिष्कार असे देशाला खाईत घेऊन जाणारे होताना दिसतात आणि देशातील विरोधी पक्षांना हे विषय हाती घेता येत नाहीत ही दुर्दैवाची परिस्थिती आहे.

समांतर रचनात्मक कार्यक्रम

महात्मा गांधींनी ब्रिटिशांशी लढताना सविनय कायदेभंग वापरला पण त्यांनी काँग्रेस पक्षाला लोकांपर्यंत पोहोचण्याचा समांतर असा रचनात्मक कार्यक्रमही दिला. कायदेमंडळात ब्रिटिशांशी वेगळ्या भूमिकेतून लढणे आणि समाजाचे प्रश्न सोडवताना समाजाचा एक भाग होऊन तो प्रश्न सोडवणे असे गांधींचे राजकारण असे. 

राहुल गांधी त्याच दिशेने जात आहेत. पहिले भारत जोडो यात्रेतून त्यांनी त्यांनी देशात पसरलेल्या विखाराला प्रेमाचे उत्तर दिले. त्यावेळीही त्यांनी त्यांच्या मागे पक्षातील किती नेते, कार्यकर्ते आहेत, कोणता जनसमूह आहे याची पर्वा केली नाही. ते चालत राहिले, लोक जोडत गेले व समाजात एक वेगळी सिम्पथी निर्माण होत गेली. त्यांची ही संपूर्ण यात्रा बिगर राजकीय स्वरुपाची होती.

अस्वस्थ, असंतोषग्रस्त असलेल्या समाजात स्थैर्य आणणे व त्याला प्रगतीची दिशा दाखवणे, समाजातील दोषावर काम करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास रुजवणे, शोषित-दुर्बल घटकांमध्ये सतत काम करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याचे काम करणे हे लोकशाही, सेक्युलर, मानवतावादी मूल्य स्वीकारलेल्या राजकीय नेत्याने करायचे असते. तो रोल आज राहुल गांधी करताना दिसत आहेत.

जेन झीच्या आंदोलनाचे यश

गेली १०-१२ वर्षे ही प्रचंड मन्वंतराची होती. देश हिंदुत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन हिंदू राष्ट्र होतो की काय अशी भीती वाटत असताना अचानक अभिजीत दीपके, नेहा बोरा, सौरभ दास यांच्या जेन झी आंदोलनाने मोदीशा यांच्या फॅसिस्ट राजकारणाला मोठे भगदाड पाडले. १६-१७ वर्षांची पोरं-पोरी थेट पंतप्रधान-गृहमंत्र्याला प्रश्न विचारू लागली, पोलिसांच्या दमनशाहीला त्यांनी विनोदातून चिमटे काढले व त्यांच्या कॉन्शसलाच त्यांनी आव्हान दिले हे विलक्षण होते. ही लाट नाही तर ते नवे मन्वंतर आहे. जंतर मंतर नंतरची राहुल गांधींची पुण्यातील ही ‘गुंज’ ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून देशात अद्भूत बदल होऊ शकतो.

Related posts

राहुल गांधी आले, पुण्यात आग लावून गेले

राहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!

राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच अभाविप, एनएसयुआय कार्यकर्ते भिडले