राहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!

  • सोनाली शिंदे

पुण्यात शनिवारी राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम झाला. मुद्दाम प्रेक्षकांमध्ये उभं राहून ऐकला. सर्व बाजूने नजर जाईल तिथपर्यंत मुलीच मुली. सतरा ते वीस वयाच्या मुलींची संख्या लक्षणीय. काय ती ऊर्जा ! केवळ माहोल ! राहुल गांधींची एक झलक पाहण्यासाठी मुली अक्षरश: वेड्या झाल्या होत्या. दुपारी साडेचार वाजल्यापासून जमलेल्या या मुली. साडेसातला राहुल येईपर्यंत तीच ऊर्जा, तोच उत्साह.

पुरुषप्रधान मानसिकतेचा मुद्दा

१. केवळ चळवळीपर्यंतच राहिलेला ‘पुरुषप्रधान मानसिकते’चा महत्त्वाचा मुद्दा राहुल गांधींनी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्य राजकीय प्रवाहात आणला. केवळ आणला नाही तर केंद्रबिंदू बनवला. हा मुद्दा केवळ मांडला नाही, तर याच्या मुळाला म्हणजे मनुस्मृतीला हात घातला.

हेही वाचाः काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर कोण आहे?

शिवरायांच्या, फुलेंच्या महाराष्ट्रात, कर्मभूमीत आलेल्या राहुल गांधींनी त्यांचे नाव घेतले नसेल पण एकप्रकारे त्यांचा वारसाच चालवण्याचा प्रयत्न केला. महापुरुषांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांशी गद्दारी करण्यापेक्षा नाव न घेता प्रत्यक्ष विचार जपणं अधिक महत्त्वाचं.

२. ‘तुम्ही कुणाच्या तरी आई, बहीण, पत्नी अशी तुमची ओळख पुरुषांच्या नात्याने का केली जाते? तुमची स्वत:ची ओळख आहे.’ असं म्हणून या पठ्ठ्याने एखाद्या जखमेचं मूळ शोधून बरोबर त्यावर औषध लावण्याचा प्रकार केला.

हेही वाचाः … आणि झुरळांनी मोदींची खुर्ची हलवली!

जे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत स्त्रीमुक्तीचा मोठा लढा लढला गेला, विमन स्टडीजचे अकॅडमिक्स मांडले गेले, जगभरात थेअरीजवर ऊहापोह झाला. घरापासून समाजापर्यंत अनेकींनी संघर्ष केला. तो मुद्दा साध्या शब्दात उपस्थित करुन त्याने थेट इथल्या व्यवस्थेवर आसूड ओढला.

पारंपरिक समजाला छेद

३. केवळ भावनिक किंवा धार्मिक मुद्द्यांवर महिलांची, महिलांच्या समूहांची मने जिंकता येतात, याला राहुल गांधींनी छेद दिला. तार्किक मुद्द्यांवर तरुणाईची, विशेषत: महिलांची मने जिंकली जाऊ शकतात, हे सिद्ध करुन दाखवले. एकूण राजकारणाच्या प्रवासातील ऐतिहासिक बदल म्हणावा लागेल.

हेही वाचाः राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह

४. वक्तृत्व कौशल्यावर एखादवेळेस टीका होऊ शकेल. पण ऐकून घेण्याची क्षमता अफाट आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिचं, महिलांचं ऐकून घेण्याची क्षमता हे राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण अधोरेखित करण्यासारखं आहे.

५.टिपिकल पद्धतीनेच राजकीय मुद्दे मांडण्याला त्यांनी छेद दिला. प्रेझेंटेशन, व्हिडिओ, डेटा ही नवी पद्धत छात्रों की गूंजमधून आणली.

६. ‘कैसा भी हो, बंदा ये इमानदार है’ अशी भावना महिलांमध्ये आहे. ‘चौकीदार’ से ‘इमानदार’ सही है, अशी भावना आहे.

७. महिलांना महत्त्व देताना एकतर केवळ प्रतिनिधित्व म्हणून दिलं जातं किंवा देवी म्हणून. महिलांना माणूस म्हणून समान महत्त्व द्या, एवढं साधं राहुल सांगतात. म्हणून कदाचित जेनझी राहुल गांधींकडे आशेने बघते. जेनझीमधील मुलीही आणि मुलंही.

पक्ष, बॅनर विरहित कार्यक्रम

८. ‘छात्रों की गुँज’ अंमलात आणताना कुठेही पक्षाची टिमकी मिरवली नाही. ना पक्षाचे बॅनर लावले किंवा पक्षाच्या महानतेचे गोडवे गायले. केवळ मुद्दों की बात!

९. फक्त जरा राहुल गांधींनी स्टेजवर आल्या आल्या नमस्कार-हाय-हॅलो करत तरुणींचं स्वागत स्वीकारलं असतं आणि कार्यक्रम वेळेत सुरु झाला असता तर अधिक बरं झालं असतं.

१०. सांस्कृतिक राजकारण लक्षात घेताना, स्थानिक भाषा, तिथल्या संस्कृतीचा स्पर्श आपल्या कार्यक्रमाला आणि संवादाला असायला हवा, असं मात्र वाटलं.

११. पण हो! सांस्कृतिक अंगाने एरव्ही रुक्ष वाटणारे राजकीय नेते, आमदार-खासदार-प्रवक्ते पदाधिकारी तरुणाईच्या गाण्यांवर ताल धरुन डोलत होते, तेव्हा त्यांच्यातलं हळवं-निखळ रुप ‘ग्वाड’ दिसत होतं!

(सोनाली शिंदे या मुक्त पत्रकार आहेत.)

Related posts

राहुल गांधी आले, पुण्यात आग लावून गेले

राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच अभाविप, एनएसयुआय कार्यकर्ते भिडले