नागपूर जिल्ह्यात मत्स्य विभागानं केलेली एक कारवाई सध्या चर्चेत आहे. दोन-पाच किलो नव्हे तर तब्बल ३६ टन थाई मांगूर मासे जप्त करून खड्ड्यात पुरून टाकण्यात आले. या माशांना वाघूर किंवा आफ्रिकन कॅटफिश म्हणूनही ओळखलं जातं
हेही वाचाः डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी परिसरातील चिंचोली शिवारात एका खाजगी मत्स्यपालन केंद्रावर प्रशासनानं कारवाई केली. ‘थाई मांगूर’ माशांचे अवैध उत्पादन सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली होती. या आधारे मत्स्य विभाग, पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासह ५ विभागांच्या संयुक्त पथकाने खाजगी केंद्रावर धाड टाकली. ३२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ३६ टन साठा जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने सापडलेले हे मासे आठ फूट खोल खड्ड्यात शास्त्रीय पद्धतीने गाडून नष्ट करण्यात आले.
हरित लवादाकडून बंदी
पर्यावरण आणि आरोग्याला होणाऱ्या गंभीर धोक्यांमुळे राष्ट्रीय हरित लवादानं सन दोन हजार सालापासून भारतात ‘थाई मांगुर’ माशांच्या पालन, विक्री आणि व्यापारावर पूर्ण बंदी घातली आहे.
हेही वाचाः व्हेल माशाची उलटी म्हणजे काय? अॅम्बरग्रीसला एवढी किंमत का मिळते?
थाई मांगूर मासा जल परिससंस्थेला धोका मानला जातो. ही एक मांसाहारी आणि आक्रमक प्रजाती आहे. ती इतर देशी माशांना खाते, ज्यामुळे पाण्यातील इतर जातींच्या माशांची संख्या झपाट्याने कमी होते. भारतातल्या देशी माशांच्या उत्पादनात ७० टक्के घट होण्यास थाई मांगूर मासा कारणीभूत असल्याचं मानलं जातं.
कर्करोगाला निमंत्रण
या माशांना वाढवण्यासाठी कुजलेले मांस, मेलेल्या जनावरांचे अवशेष आणि कचरा खाऊ घातला जातो. त्यामुळं पाणी दूषित होतं आणि प्रचंड दुर्गंधी पसरते. अस्वच्छ वातावरणात वाढत असल्यामुळं आणि दूषित अन्न खाल्ल्यानं या माशांच्या मांसामध्ये शिसे, मर्क्युरी यांसारखे विषारी घटक जमा होतात.
हे मासे खाल्ल्यास कर्करोग तसेच यकृत आणि मुतखड्याचे गंभीर आजार होऊ शकतात. हा मासा अत्यंत घाणेरड्या आणि कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यातही जिवंत राहू शकतो, ज्यामुळे तो नैसर्गिक जलस्रोतांचे संतुलन बिघडवतो. दोन ते तीन महिन्यांत याची मोठी वाढ होते आणि तीन ते चार किलोपर्यंत वजन होते, त्यातून आर्थिक फायदा असल्यामुळं त्याची अवैधपणे पैदास केली जाते. हा मासा पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे, हे लक्षात घ्यायला हवं.