Sharad Pawar on Supriya Sule: विरोधात बसायचं की नाही, हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं

Sharad Pawar on Supriya Sule

मुंबई : संसदेत विरोधात बसायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी स्वतः घ्यायचा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये पवार यानी लोकसभा निवडणुकीपूर्वीची आणि नंतरची परिस्थिती, इंडिया आघाडीची सध्याची स्थिती आणि भवितव्य अशा विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले आहे. (Sharad Pawar on Supriya Sule)

इंडिया आघाडीसोबत राहणार की अन्य पर्यायांचा विचार करणार, या प्रश्नावर पवार म्हणाले की, आम्ही विरोधात काम करणार आहोत. भाजपाला पर्याय म्हणून विश्वासार्ह शक्ती निर्माण करण्याची गरज आहे.

अजित पवार यांच्याशी अलीकडे झालेल्या भेटी राजकीय स्वरुपाच्या नव्हत्या. आम्ही अनेक संस्था चालवतो, तिथे विविध विचारांची मंडळी काम करतात, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. याच ओघात सुप्रिया सुळे यांच्याबाबत काय, असा प्रश्न विचारला असता, संसदेत विरोधात बसायचे की नाही, हा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा असल्याचे उत्तर दिले. (Sharad Pawar on Supriya Sule)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भवितव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, आमच्यात दोन मतप्रवाह आहेत. एक गट म्हणतो पुन्हा एकत्र यावं (अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत). दुसरा गट म्हणतो की थेट किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपसोबत जाऊ नये. (Sharad Pawar on Supriya Sule)

नीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंसारखे मित्र इंडिया आघाडीसोबत राहिले असते, तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती, असे सांगून पवार म्हणाले, आम्ही जिंकलो असतो, असं निश्चितपणे म्हणू शकत नाही. पण तुम्ही भाजपाला मिळालेली मते आणि विरोधकांना मिळालेली मते पाहिलीत, तर आम्ही ‘मॅजिक फिगर’जवळ पोहोचलो असतो.

नीतिश कुमार यांच्यासंदर्भातील प्रश्नावर पवार म्हणाले, पाटण्यानंतर बेंगळुरूला झालेल्या बैठकीपर्यंत ते आमच्यासोबत होते. इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून त्यांचे नाव जाहीर करावे, असा लालूप्रसाद यादव यांचा आग्रह होता. माझ्यासह आणखी काही लोकांचा त्याला पाठिंबा होता. पण याबाबत घाई करू नये, असे काही लोकांचे म्हणणे होते. आपण दक्षिणेतील लोकांशी बोलून, सर्वांना विश्वासात घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेऊ असे काही लोकांचे म्हणणे होते. (Sharad Pawar on Supriya Sule)

राहुल गांधींच्या एकूण नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, ते मेहनती आहेत. देशात प्रश्न निर्माण झाले की ते प्रतिक्रिया देतात. पण राहुल काही मोठं करू शकतील अशी आजची राजकीय परिस्थिती नाही. मला असं वाटतं की त्यांनी आणि संपूर्ण विरोधकांनी अधिक आक्रमकपणे मैदानात उतरून काम करायला हवं. (Sharad Pawar on Supriya Sule)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पवार म्हणाले, परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल होती. लोकसभा निकाल आमच्या बाजूने लागले. मग विधानसभेत काय झालं? आम्ही गावोगाव फिरलो, सगळीकडे लोक म्हणाले की आम्ही लोकसभेसारखंच विधानसभेला मतदान केलं. पण निकाल वेगळा लागला. मी निवडणूक आयोगासंदर्भात मोठं विधान करू इच्छित नाही.

तुम्हाला देशाचं भविष्य कसं वाटतं? या प्रश्नावर पवार म्हणाले, मी आशावादी आहे. आपल्या देशात संसदीय लोकशाही टिकून आहे, ती आमच्यामुळे नाही, तर सामान्य जनतेच्या समजूतदारपणामुळे.

हेही वाचा :
ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी ठार
लाहोरमधील स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर