मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने बुधवारी (७ मे) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित लागलीच निवृत्त होणार असल्यामुळे पुढील महिन्यात रंगणाऱ्या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल. साहजिकच इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल. (Rohit Retirement)
मागील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये रोहित सपशेल अपयशी ठरला होता. विशेषत: ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला ५ डावांमध्ये केवळ ३१ धावा करता आल्या होत्या. तेव्हापासूनच त्याच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली होती. अखेर रोहितने बुधवारी स्वत: इन्स्टाग्रामवर निवृत्तीची पोस्ट लिहून या चर्चांना पूर्णविराम दिला. “हॅलो, मला फक्त इतकंच सांगायचंय की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय. कसोटीमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्युच्च सन्मान होता. तुम्ही सर्वांनी इतकी वर्षे दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वन-डे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे सुरु ठेवेन,” असे रोहितने पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहितने मागील वर्षीच भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. (Rohit Retirement)
रोहितने कारकिर्दीत सर्वांत अखेरीस २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ६७ कसोटींमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या असून त्यामध्ये १२ शतके व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. यांपैकी २४ कसोटींत त्याने भारताचे नेतृत्वही केले आहे. २०२२ मध्ये विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहितची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम सामना खेळला होता. (Rohit Retirement)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरच्या सामन्यात रोहितने स्वत: संघाबाहेर राहणे पसंत केले होते. त्याच्या अनुपस्थितीत कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते. तथापि, बुमराहच्या फिटनेसविषयी प्रश्नचिन्ह असल्याने त्याच्याकडे दीर्घकाळ कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेस २० जूनपासून सुरुवात होणार आहे.
हेही वाचा :
भारताचे दोन्ही तिरंदाजी संघ अंतिम फेरीत
भारत अंतिम फेरीत