Gangs of Triple Engine Government : गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार मध्ये राजकीय टोळीयुद्ध : सपकाळ

Gangs of Triple Engine Government

जमीर काझी : मुंबई : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, त्यामुळे नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Gangs of Triple Engine Government)

लाचारीपोटी तीन पक्ष एकत्र

  काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यात केली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सत्तेच्या अनुषंगाने असलेल्या लाचारीपोटी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. हे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे त्यांच्यात टोळी युद्ध पहायला मिळत आहे. कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील दरे गावात शेतात जाऊन रुसुन बसतात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री गायब होतात.  शिंदे यांना निषेध नोंदवायचाच असेल किंवा ते खरेच नाराज असतील आणि काही ठोस घडत नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी तो मुकाट्याने सहन करावा लागणार आहे. (Gangs of Triple Engine Government)

अजित पवारांची मांडवली यशस्वी

 पुण्यातील भूखंड प्रकरणावर सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘मला वाचवा’ अशी विनवणी  केली, दिल्लीत त्यांची मांडवली झाली आणि पार्थ पवारला क्लिन चिट मिळाली असे दिसते. तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यातही दिलजमाई झाली असावी. असे नसते तर ९९ टक्के भागिदारी असणाऱ्या पार्थ पवारला सोडून केवळ १ टक्के भागिदारी असलेल्या व काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसती. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करुनही भाजपाने अजित पवार यांना सत्तेत घेतलेच, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. (Gangs of Triple Engine Government)

नगरपालिका निवडुकीच्या प्रचाराला काँग्रेसकडून सुरुवात

 राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातून प्रचार सभांना सुरुवात केली. बुलढाणा, चिखली, मेहकर येथे त्यांनी प्रचार सभा घेत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. बुलढाण्यातील लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. विकृतींच्या विरोधात लढताना सर्वांची मोट बांधली पाहिजे. शहरातील लोक पाठिशी आहेत त्यांना सभ्य व सुसंस्कृत बुलढाणा हवा आहे. गुंडगिरी, गांजा, अफिम, भ्रष्टाचारापासून जनतेला मुक्ती हवी आहे असे सपकाळ यांनी सांगितले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर