मुंबई : प्रतिनिधी : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी गुरुवारी (दि. २० ) बंद राहणार आहे. सकाळी ११ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहा तासांसाठी मुंबई विमानतळावरु एकही विमान उड्डाण होणार नाही. रनवेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडतर्फे देण्यात आली. (Mumbai Airport closed on Thursday)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज सरासरी ९५० विमानाचे उड्डाण होते. त्यामुळे हे विमानतळ २४ तास व्यस्त असते. वाहतूक मानकांच्या नियमांनुसार विमानतळाचा दर्जा राखण्यासाठी विमानतळाची देखभाल आणि दुरुस्ती यांचं दरवर्षी नियोजन केले जाते.
विमानतळ प्रशासनाकडून गुरुवारी २० नोव्हेंबरला सहा तासांत वार्षिक मान्सूननंतरची रनवे दुरुस्ती केली जाणार आहे. विमानतळाच्या दोन्ही रनवेजची तपासणी, पृष्ठभाग दुरुस्ती, विद्युत व्यवस्था, मार्किंग आणि ड्रेनेज सिस्टीमचे निरीक्षण केले जाणार आहे. या देखभालीच्या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी या काळातील आपापली विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच काही विमान कंपन्यांनी मुंबई विमानतळाऐवजी दुसऱ्या विमानतळावर विमाने उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Airport closed on Thursday)
मुंबईमध्ये यंदा सुमारे ४०० मिमी पाऊस पडल्यानं पावसाळ्यादरम्यान धावपट्टीवर पाणी साचल्याने धावपट्टीची नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी हवाईपट्टी खराब होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर पावसाळ्यानंतर दरवर्षी धावपट्टीची देखभाल केली जात असते. या कामाचे नियोजन काही महिने आधीच केले जाते. धावपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हवाईपट्टीची दुरुस्ती आणि पाहणी अतिशय महत्त्वाची असल्याने विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने पत्रकाद्वारे दिली. (Mumbai Airport closed on Thursday)
प्रवाशांनी आपल्या फ्लाइटचे अपडेट्स काळजीपूर्वक तपासून रद्द होणारी विमान उड्डाणे, विमानांच्या वेळेतील बदल जाणून घ्यावा, मोठ्या प्रवासापूर्वी एअरलाइन्स वेबसाइट किंवा अॅपवरून आपली फ्लाइट स्थिती तपासा. फार आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांनी जर त्यांची फ्लाईट उड्डाणाच्या वेळी बंद असेल तर पर्यायी उड्डाण वेळा तपासाव्यात. या सहा तासांच्या बंदीपूर्वी किंवा बंदीनंतर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅफिकमध्ये वाढ होऊ शकेल, अशा सूचना केल्या आहेत. (Mumbai Airport closed on Thursday)