प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ

Fadnavis should resign as an act of atonement

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली आहेत. महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मनाची लाज  बाळगून प्रायश्चित म्हणून  गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री राज्याला द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी  केली. (Fadnavis should resign as an act of atonement)

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते  म्हणाले की, गृहविभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून  खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणातील निघृणता, स्वारगेट एसटी स्टँडवरील बलात्कार, केंद्रीय मत्र्यांच्या घरातील मुलींना छेडछाड, बदलापूरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार, अशोक खरात प्रकरण, महिला व मुलींचे बेपत्ता होणारे प्रकार…ड्रग्जच्या खुलेआम काळ्याधंद्याने उडता महाराष्ट्र झाला आहे, तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलले जात असताना गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे.  फक्त घोषणा होतात कारवाई मात्र काहीच होत नाही. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा याला थेट गृहमंत्रीच जबाबदार आहेत,  भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार सुस्साट असून जनता व प्रशासन यांच्यात मिसिंगलिंक आहे, कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंग लिंक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. (Fadnavis should resign as an act of atonement)

देशभर जनगणना सुरु झाली असली तरी जातनिहाय जनगणना मात्र होत नाही. जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधांनी केली होती पण ती आता करत नाहीत कारण हा व्यक्ती फक्त फेकूच नाही तर अत्यंत खोटारडा आहे. मुंह में राम और बगल में नथुराम, असे त्यांचे काम आहे. मोदी यांचा आचार, विचार व व्यवहार हे अगदी उलटे आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पाया पडला व नंतर त्यांचा खून केला, मोदी संसदेच्या पाया पडले व त्यांनी संविधान व लोकशाहीचा गळा घोटला. १०० स्मार्ट सिटी, दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, रुपयाची घसरण थोपवणे यातील काहीच त्यांनी केलेले नाही. असेही सपकाळ यांनी सांगितले. यावेळी  प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते. (Fadnavis should resign as an act of atonement)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेज अव्वल