जमीर काझी : मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय असल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Sapkal’s allegations against Narvekar)
सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना शुक्रवारी त्याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले. तसेच अर्ज भरण्यापासून रोखले. अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. (Sapkal’s allegations against Narvekar)
सपकाळ पुढे म्हणाले की,’ लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे. परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत असल्याचे दाखवून द्यावे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. (Sapkal’s allegations against Narvekar)