कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेआणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मुंबईसाठी जाहीरनामा सादर केला. मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी १५०० रुपये स्वाभिमान निधी देण्याची तसेच तरुणांना २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार असल्याची घोषणा केली. ७०० स्केअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातलं सर्वात मोठं ग्रंथालय उभारण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली.
आज शुक्रवारी शिवसेना भवन येथे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना दोघां चुलत भावांनी मार्गदर्शन केले. जाहीरनामा सादर करण्यापूर्वी आदित्य आणि अमित ठाकरेंनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. प्रचाराची दिशा, स्थानिक मुद्दे, दोन्ही पक्षांमधील समन्यवय या संदर्भात मार्गदर्शन केले. महापालिकांच्या शाळांमध्ये ज्युनियर महाविद्यालये सुरु करणार असून त्यामध्ये मराठी भाषा अनिवार्य असणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. महापालिका पार्किंग मोफत ठेवणार असून एका फ्लॅटला एक पार्किंग असायलाच हवे, असे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.नागरिकांना चालण्यासाठी मोकळे फुटपाथ मिळालेच पाहिजे असा आमचा हट्ट असणार आहे, असे सांगितले. (Thackeray brothers released the Mumbai Manifesto)
मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी क्लायमेट ऍक्शन प्लॅन राबवणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयात नाष्टा आणि दुपारचे जेवण देणारे मास किचनही तयार करणार असल्याचे सांगितले. मुंबईतील कष्टकरी महिलांच्या लहान मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणघरे उभी केली जातील. मुंबईतील प्रमुख रस्त्यावर दर दोन किमीवर महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत. १०० युनिटपर्यत वीज मोफत करणार असून पाण्याचे दर देखील स्थिर ठेवण्यात येणार आहेत. (Thackeray brothers released the Mumbai Manifesto)
मुंबईचे डिजिटल मॅपिंग, पालिका प्रशासन कारभार अधिक सुलभ करणार असल्याचे सांगून प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अत्याधुनिक व्यायामशाळा, जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती करणार करण्यात येणार आहे. नव्या इमारतींमध्ये रेनवॉटर पर्कोलेशन पिट्स व रेनवॉटर होल्डिंग टँक करण्यात येईल. तसेच डिसॅलिनेशन प्रकल्प आणि एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येतील. पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट ऍम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासह अन्य सुविधांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला. (Thackeray brothers released the Mumbai Manifesto)