मुंबई : प्रतिनिधी : मराठी माणसांसाठी तुम्ही काय कामे केली?. दहा कामे दाखवा असे आव्हान शिवसेनेचे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. मोदींच्या मित्र गौतम अडाणीला अख्खी मुंबई विकणे किंवा फुकटात घालणेही मराठी माणसासाठी सेवा नाही अशी टीकाही राऊत यांनी केली.
मग दिवसभर तोंडाची डबडी वाजवण्याची गरज काय?
काल बुधवारी मुंबईत शिवसेना आणि मनसे यांच्यात युती झाल्यानंतर सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे पक्षांच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला. या टीकेला खासदार राऊत यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर काल दिवसभर तुमचे प्रवक्ते ही युती कशी आहे, अमुक-तमुक बोलत होते मग दिवसभर तोंडाची डबडी वाजवण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. (Raut criticizes the Chief Minister)
महाराष्ट्र तोडू विषयावर मुख्यमंत्री गप्प
भाजप किंवा फडणवीस यांनी मराठी माणसासाठी काय केले असा प्रश्न राऊत यांनी केला. गोपीनाथ मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही. बेळगाव–कारवार सीमाप्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही. गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद आहे. बाकी कोणत्या भाजपा नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे सहकारी कुणीही अखंड महाराष्ट्राबाबत बोलत नाही. अधिवेशनकाळात “वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू” असे बोलले गेले, त्यावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी उभे राहिले पाहिजे होते. महाराष्ट्र कसा तोडताय बघू” असे ठाकरे म्हणाले. पण मुख्यमंत्री उभे राहिले का आणि जाब विचारला का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. (Raut criticizes the Chief Minister)
ठाकरे नसते तर लहानश्या तुकड्याचे मुख्यमंत्री झाला असता
ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात. नाहीतर राज्याचे तुकडे करून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावे लागले असते याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्राचे तुकडे आम्ही होऊ दिले नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ दिली नाही. ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रात आम्ही संघर्ष करून ठेवलेले आहे. ही तुमची पोटदुखी नाही तर काय? असा सवाल राऊत यांना केला. तुम्ही काय केले मराठी माणसासाठी ते दाखवा. दहा कामे दाखवा. गौतम अडाणीला मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसासाठी काम नाही. मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणे किंवा फुकटात घशात घालणे ही मराठी माणसासाठी सेवा नाही,” अशी टीकाही यावेळी खासदार यांनी केली. (Raut criticizes the Chief Minister)