तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

Raj Thackeray criticizes Amit Satam

मुंबईत मॅनहोल पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत झाड पडून स्कूलबस मधील चिमुकला ठार झाला. मुंबई महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. असं असताना भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष  भाजपचे आमदार अमित साटम या विषयावर विधानभवनाच्या आवारात हसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईची न केल्याबद्दल खडसावले आहे.  (Raj Thackeray criticizes Amit Satam.)

प्रति

श्री. देवेंद्र फडणवीस,

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही ते पसरू देताय?

देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !

तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.

मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती. (Raj Thackeray criticizes Amit Satam.)

आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात)  तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?

तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.

खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.

तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत. (Raj Thackeray criticizes Amit Satam.)

राज ठाकरे ।

Related posts

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग 

देशासमोर आता नागरिकता चोरीचे  मोठे संकट : मिनाक्षी नटराजन