निवडणुका जिंकणे, संस्था आपल्या प्रभावाखाली आणणे, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकल्याचे आरोप, रातोरात पक्षांवर ताबा मिळवणे अशा कारणांमुळे जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते, तेव्हा समर्थक लगेच एकच प्रश्न विचारतात – “देशात झालेल्या अभूतपूर्व पायाभूत विकासाबद्दल का लिहित नाही?” चला, आज ती इच्छा देखील पूर्ण करूया.
राकेश कायस्थ
देशभर विकासाची जी गंगा वाहते आहे, तिची काही झलक दाखवायची होती. प्रत्येक राज्यातील एक उदाहरण घ्यायचे ठरवले होते; पण माझा आळस आणि तुमची व्यस्तता या दोन्हींचा विचार करून चारच उदाहरणांवर समाधान मानतो. (Potholes on the roads of Bhopal)
पहिले उदाहरण आहे उत्तर प्रदेशचे, ज्याला सुशासनाच्या बाबतीत अनेक युरोपीय देशांपेक्षाही पुढे असल्याचे सांगितले जाते. दुसरे देशातील सर्वांत श्रीमंत महाराष्ट्राचे. तिसरे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे. आणि चौथे म्हणजे ‘स्वर्ग’ म्हणून गौरविल्या जाणाऱ्या गुजरातचे.
करदात्यांकडून आयकर आणि जीएसटीच्या माध्यमातून गोळा केलेल्या हजारो कोटी रुपयांतून सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून दिल्ली–डेहराडून महामार्ग उभारण्यात आला. मोदी सरकारचे ‘डबल इंजिन’ हे केवळ घोषणेत नाही, तर महामार्गाच्या मध्यभागी एकाच आकाराचे दोन देखणे खड्डे तयार करून त्याचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले आहे. बाकी रस्त्यावर विखुरलेले छोटे-मोठे खड्डे ठेवले आहेत, जेणेकरून लोकांना मागील सरकारांच्या काळातील खड्ड्यांची आठवण कायम राहावी! (Potholes on the roads of Bhopal)
मुंबई–गोवा महामार्ग
दृश्य तर आणखीच विलक्षण आहे. संपूर्ण रस्ता पाहिला तर जणू हिऱ्याच्या फेशियलनंतरचा गुळगुळीत चेहरा वाटतो; पण अचानक एखाद्या ठिकाणी मेकअप निघून गेल्यासारखे मोठे भगदाड दिसते. सुदैवाने, मोदीजींच्या इराद्यांइतके मजबूत लोखंडी सळईचे बांधकाम असल्याने वाहन पूर्णपणे आत कोसळत नाही; नाहीतर अपघातात मृत्यू झालेल्या माणसानेही नेहरूंना कधी माफ केले नसते !
गुजरातमधील वापी–सिल्वासा महामार्ग
तर आधुनिक कलाकृतीच वाटतो. पाण्याने भरलेला एक खड्डा, मग दोन-तीन इंच रस्ता आणि पुन्हा पुढचा खड्डा. जणू एखाद्या आधुनिक चित्रकाराने रस्त्यावर प्रयोग केला आहे. माझा दहावीत शिकणारा मुलगा हा फोटो बारकाईने पाहत होता. विचारले तर तो म्हणाला, “बाबा, इंजिनिअर बहुतेक १८ होलचा गोल्फ कोर्स बनवत होता; पण चुकून सगळे होल एकाच ठिकाणी पडले!”
भोपाळमधील रस्ता
पाहिला की शिवराजसिंह चौहान यांच्या प्रसिद्ध विधानाची आठवण येते – “मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेतील वॉशिंग्टनपेक्षाही चांगले आहेत.” त्यानंतर आयटी सेलने त्या विधानावर शंका घेणाऱ्यांना देशद्रोही ठरवले होते. भोपाळमधील हा खड्डा इतका भव्य आहे की त्यात बसून अभिमानाने आणखीही बरेच काही करता येईल. वर नैसर्गिक पाण्याचीही सोय आहे!
आता या चार महामार्गांपैकी सर्वोत्तम खड्डा कोणता?
माझ्या मते प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
- सुरक्षिततेच्या दृष्टीने भोपाळचा खड्डा सर्वोत्तम. कारण त्यात माणूस पूर्णपणे आत जाईल; त्यामुळे बाहेरच्या वाहनांची धडक बसण्याची शक्यता कमी!
- डिझाइनच्या बाबतीत दिल्ली–डेहराडून महामार्गाला तोड नाही. डबल इंजिनची संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसते.
- कलात्मकतेच्या निकषावर गुजरातचा रस्ता आधुनिक शिल्पकलेचा नमुना वाटतो.
- पारदर्शकतेच्या बाबतीत मुंबई–गोवा महामार्ग सर्वांत पुढे. रस्ताच स्वतःची छाती फाडून दाखवत आहे – “पाहा, माझ्या आत लोखंडी सळई आहे. करदात्यांचा प्रत्येक पैसा वापरला आहे.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा सांगितले आहे की प्रत्येक महामार्ग प्रकल्पावर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवले जाते. त्यामुळे हे सर्व खड्डेही उपग्रहाच्या देखरेखीखालीच तयार झाले असावेत, अशी श्रद्धा ठेवायला हरकत नाही.
मग एक सूचना आहे…
पुढील २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘पायाभूत विकास’ या विषयावर भव्य चित्ररथ काढले, तर या चार महामार्गांपैकी पहिला क्रमांक कोणाला मिळेल?