मुंबई : प्रतिनिधी : खरा हिरा असल्याचे सांगून खोटा हिरा विकून एका फ्रेंच महिलेची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. संबधित महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबईच्या बीकेसी मध्ये हे प्रकरण घडले आहे. प्रयोगशाळेत हिऱ्याची तपासणी करण्यास पाठवले असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बीकेसी पोलिसांनी ज्वेलर्सविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. (Fake diamond sold to French woman for ₹98 lakh)
५.०५ कॅरेटचा नैसर्गिक हिरा ९८ लाखांला खरेदी
या घटनेची माहिती अशी की पॅरिसमधील मल्लिका आफतिसी महिला मुंबईला भेट देण्यासाठी आली होती. मुंबई दौऱ्यात त्यांनी एका बीकेसी येथील एका ज्वेलर्स ऑफीसमधून ५.०५ कॅरेटचा नैसर्गिक हिरा निवडला. त्यासाठी त्यांनी ९८ लाख रुपये अदा केले. खरेदी केलेला हिरा कंपनीने पॅरिसमधील त्यांच्या पत्त्यावर कुरियरने पाठवण्याचे आश्वासन दिले.
ज्वेलरी कंपनीने हिरा फ्रान्सऐवजी इटलीतील मिलानला पाठवला
मल्लिका आफतिसी पॅरिसला परतल्यानंतर महिनाभर उलटूनही हिरा कुरिअरने न आल्याने त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. हा हिरा पॅरिसऐवजी इटलीतील मिलान येथे पाठवला असून तेथून हिरा घेण्यास सांगितले. पण तेथील एका एजंटने डिलिव्हरी आणि करांसाठी अतिरिक्त ४४ लाखांची मागणी केली. त्यांनी अवाजवी मागणीस नकार देत व्यवहाराचा निषेध केला. ज्यावेळी हिरा खरेदी केला तेव्हा अतिरिक्त शुल्काचा उल्लेख नव्हता असा त्यांनी दावा केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये बीकेसी पोलिसांकडे या संदर्भात पहिला तक्रार केली. (Fake diamond sold to French woman for ₹98 lakh)
हिरा पॅरिसला आला, पण प्रयोगशाळेत खोटा निघाला
तक्रारीच्या घटनेनंतर तब्बल दीड वर्षानी हा हिरा फेब्रुवारी २०२५ मध्ये मल्लिका यांच्या पॅरिसमधील घरी पोहोचला. जेव्हा हिरा पाहिला तेव्हा मल्लिकांना हिऱ्यांच्या खरेपणाबद्दल शंका आली. त्यांनी ताबडतोब फ्रान्समधील प्रसिद्ध जेमोलॉजी प्रयोगशाळा लॅबोरेटरीत फ्रांसेस डी जेमोलॉजी येथे हिरा तपासणीस पाठवला. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यावर मल्लिका यांना धक्काच बसला. त्यांना पाठवलेला हिरा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार केलेला हिरा होता.
बीकेसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल
मुंबईतील हिरा व्यापारी कंपनीच्या व्यवहाराने त्यांना धक्का बसला. मल्लिका आफतिसि यांनी वकिलामार्फंत बीकेसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कंपनीने त्या महिला मुद्दामहून वेगळा हिरा पाठवला की वाटेत तो बदलण्यात आला याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान ज्वेलरी कंपनीने पोलिसांसमोर हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की सखोल कागदपत्रांची पुर्तता आणि सीमाशुल्क तपासणीनंतरच हिरा पाठवण्यात आला होता. खरेदी केलेला हिराच फ्रेंच महिलेने खरेदी केला हिरा मिळाला आहे असा दावा ज्वेलरी कंपनीने केला आहे. (Fake diamond sold to French woman for ₹98 lakh)