Cartoonist Pradeep Mhapsekar: माझी रेषा, माझा गोतावळा !

चित्रकार कसा घडत जातो, या प्रश्नाचं उत्तर अनेक टप्प्यांमध्ये आणि विविध पातळ्यांवर देता येईल. एक, चित्रकार म्हणजे फक्त चित्रं काढणारी व्यक्ती नसून तो एक संवेदनशील, निरीक्षणशील, सर्जनशील आणि सतत शिकणारा कलाकार असतो. चित्रकार घडण्यासाठी केवळ हातात कला असणे पुरेसे नसते. निसर्ग, माणसं, प्रकाश, छाया, रंगसंगती यांचं सूक्ष्म निरीक्षण हळूहळू एक कलाकार घडवू लागतं. तो केवळ बघत नाही, तर ‘पाहू लागतो. खोलात जाऊन. एखाद्या चित्रकाराचं वेगळेपण त्याच्या शैलीत, दृष्टिकोणात असतं. ही शैली सहज तयार होत नाही. ती अनुभव, प्रेरणा, आत्ममंथन आणि प्रयोगातून घडते. खूप कष्टाने ती शैली त्याला गवसते. कधी तो आपल्या गुरूपासून शिकतो, तर कधी वेळेच्या वादळात, भोवऱ्यात स्वतःला शोधत असतो. तर कधी इतर मोठ्या व्यक्तींकडून आदर वाटणाऱ्या ज्ञानवंतांमध्ये तो शोधतो… (Cartoonist Pradeep Mhapsekar)

  • प्रदीप म्हापसेकर

दरवाजावरचा गणपती

हिरव्यागार कोकणात पार आतमध्ये झाडांच्या गर्दीत एक छोटसं लाल मातीचं घर दडलेलं आहे. घरात पाच सहा लहान मुलं खेळत आहेत. कोण सहावीतला, कोण सातवीतला, कोण आठवीतला. एक मुलगा मात्र हातात खडू घेऊन दरवाजाच्या समोर उभा आहे आणि कसलातरी विचार करतोय. पाठीमागे मुलं खेळत आहेत. एकमेकांना धक्के देत आहेत. आरडाओरड करत आहेत, पण तो मुलगा मात्र शांतपणे घराच्या त्या दरवाजावर काहीतरी रेखाटतोय…(Cartoonist Pradeep Mhapsekar)

आता त्याने एक छानसा गणपती रेखाटलेला आहे. साधी आऊटलाइन. पांढरीशुभ्र काळपट असा राखाडी रंगातला तो सुंदर दरवाजा. त्याच्यावरच्या त्या खडूच्या रेषा मस्त उठून दिसत आहेत. तो चित्रात दंग झालाय आणि हळूहळू पाठीमागचा मुलांचा आवाज, चिवचिवाट हळूहळू कमी होत जातोय…

सगळेच जण पाठीमागे उभे राहून, तल्लीन होऊन त्याचं चित्र पाहताहेत. इतक्यात त्या मुलाची आजी आतून येते आणि चमकून त्या चित्राकडे पाहत बसते. ती मोठ्याने ओरडते, ‘अरे देवा, हे काय केलंस तू? या दरवाजाचे विसर्जन करावे लागणार?’ त्या काळी गावाकडे देवांची चित्रं अशी उघड्यावर वगैरे ठेवायची पद्धत नसायची. शिवाय देवाचं चित्र पुसणार कोण? मोठं पाप लागणार. आजीला त्याची काळजी होती. इतक्या लहान वयात त्याने काढलेलं गणपतीचं सुंदर चित्र पाहून सगळेच हबकले. कारण त्यांच्या घरात ना कोणी चित्रकार होता, ना कोणी या मुलाला चित्रं काढायला शिकवली होती.

मात्र आता या गणपतीमुळे त्या दरवाजाचं विसर्जन करावं लागणार. मग दरवाजाच्या जागी काय लावायचं ? आजीला पडलेला हा मोठा प्रश्न. तर असा हा प्रसंग ठळकपणे आजही मला आठवतो. मी काढलेला तो गणपती आजही मला माझ्या डोळ्यांसमोर दिसतो… (Cartoonist Pradeep Mhapsekar)

चित्रकला म्हणजे काय असतं?

चित्रकला म्हणजे काय असतं, हे त्या वयात मला काहीच ठाऊक नव्हतं. पण नकळत चांगलं चित्र काढत होतो. कशी ती देव जाणो. पुढे शाळेत मी चित्र चांगलं काढतो म्हणून फेमस झालो. याला चित्र काढून दे, त्याला चित्र काढून दे. याला दहीहंडी काढून दे, त्याला दिवाळीचं चित्र काढून दे, हे असे प्रकार पुढे शाळेत खूपच वाढू लागले. नंतर तर शाळेतले माझे वर्गमित्र संध्याकाळी, रात्री घरी येऊ लागले. आपापली ड्रॉइंग बुकं घेऊन. तेव्हा ही सगळी चित्रं मी कशी काढायचो, हा आजही मला पडलेला प्रश्न आहे. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

पालिकेच्या शाळेतून पुढे दादरच्या छबिलदास शाळेत आमची रवानगी झाली. इथे मात्र कलेला एक वळण मिळालं. माझी चित्रकला पाहून चित्रकलेचे शिक्षक जाधव सरांनी खूपच स्वातंत्र्य दिलं. काही तासांना मला सुट्टी मिळायची. माझा हात चांगला आहे, हे समजल्यावर तळ मजल्यावरच्या ड्रॉइंग रूममध्ये मला जाधव सर काही ना काही काढायला सांगत. त्या वयात कळलं नाही, पण हे पुढे कळलं, जाधव सर हे माझे चित्रकलेतले पहिले गुरू होते. आज वाटतं, माझा हात या शाळेत थोडा मोकळा झाला. वळायला लागला. व्हॅन गॉग म्हणाला होता, ‘जर तुमच्या आतला एखादा आवाज म्हणत असेल, ‘तू चित्र काढू शकत नाहीस, तर चित्र काढ. मग तो आवाज शांत होईल.’ कमालच आहे. कितीतरी जणांना आपला आतला आवाज ओळखता येत नाही. काहींना आवाज उशिरा ऐकू येतो. अन् हा म्हणतोय आवाजाविरुद्ध आवाज उठवा ! पण व्हॅन गॉग ग्रेटच. हे असं लहानपणीच प्रत्येकाला कुणीतरी सांगायला हवं.

आर. के. लक्ष्मणचा कॉमन मॅन माझा गुरू

माझं फक्त ड्रॉइंग चांगलं होतं. बाकीच्या विषयात जेमतेम मार्क मिळायचे. मला आठवतं, माझ्या लहानपणापासून आमच्या घरी ‘महाराष्ट्र टाइम्स’ यायचा. ‘म.टा. ‘च्या उजव्या कोपऱ्यात एक चित्र असे. आर. के. लक्ष्मण यांचं कार्टून. त्या काळी कार्टूनमधलं काही कळत नव्हतं. खालच्या ओळी कधी वाचायच्या फंदात पडलो नाही. पण चित्रातला तो कॉमन मॅन लक्ष वेधून घ्यायचा. हा धोतरवाला चौकडीचा शर्ट घातलेला रोज कसा इथे प्रत्येक चित्रात असतो. कधी तो मार्केटमध्ये असतो. कधी ऑफिसमध्ये फायली ठेवत असतो. कधी बसस्टॉपवर. तर कधी फूटपाथवरून जाताना दिसतो. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

नंतर मी त्याला माझ्या वहीत रेखाटू लागलो. पुढे न बघता मी त्याचं चित्र माझ्या ड्रॉइंग बुकमध्ये काढू लागलो. याची मी वेगवेगळी इतकी चित्रं काढली की विचारू नका. तीसुद्धा वेगवेगळ्या अँगलने. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना हा कॉमन मॅन माझ्या शेजारी बसलेला असायचा. म्हणजे तसं कार्टून मी ड्रॉ करायचो. कधी तो हळूच मागून पाहत असे, मी काय काढतोय ते. याच्यामुळे तर पुढे मी व्यंगचित्र काढायला लागलो. छोट्या-मोठ्या साप्ताहिक, मासिकात माझी व्यंगचित्रं छापून येऊ लागली. बहुधा चित्र बरी काढतो म्हणून कदाचित छापत असतील. तर हे सगळं जे.जे.मध्ये शिकत असतानाच सुरू होतं. त्या वेळी एक कार्टून केल्याचं मला आठवतं. मी ब्रश घेऊन कॉमन मॅनच्या मागे लागलो आहे. तो घाबरून पुढे पळत आहे आणि मी म्हणतोय, ‘अरे तू पळून पळून कुठे पळणार? ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येच ना ? थांब तिथे मी येणारच आहे.’

खरंतर ही गंमत होती. कार्टूनच्या नावाने सगळी धमाल चालू होती. पुढे खूप ठिकाणी माझी व्यंगचित्रं प्रकाशित होऊ लागली. त्या वेळी ‘इलस्ट्रेटेड विकली’मध्ये शेवटच्या पानावर देशभरातल्या व्यंगचित्रकारांची कार्टून्स छापली जायची. तिथे लक्ष्मणच्या शेजारी माझे कार्टून पाहून माझी छाती फुलायची. अगदी अलीकडे तुर्कस्तानमधल्या एका पेपरात माझं कोरोनावरील कार्टून प्रसिद्ध झालं होतं. फ्री प्रेसमध्ये असताना पहिल्या पानावरचं माझं व्यंगचित्र लंडनमधील एका संस्थेने मागवून घेतलं होतं. मला वाटतं हा लक्ष्मणचा कॉमन मॅन माझा चित्रकलेतला दुसरा गुरू असावा. अर्थात लक्ष्मण! पंचवीसएक वर्षं मी वेगवेगळ्या नावांनी खूप राजकीय व्यंगचित्रं रेखाटली.

व्यंगचित्र काढणं जोखमीचं काम

आज व्यंगचित्र काढायचं म्हणजे जोखमीचं काम आहे. पण त्या वेळीही माझ्या काही व्यंगचित्रांमुळे वाद झाले होते. पण आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. कमेंटमधून शिव्या घालणारे नव्हते. ट्रोल करणारे नव्हते. पण पेपरचा दरारा होता. १९९२-९३च्या सुमारास कपिल पाटील यांनी ‘आज दिनांक’ हे सायं दैनिक सुरू केलं होतं. तिथे माझी कला संपादक म्हणून नेमणूक केली होती. इतकं महत्त्व मला नाही वाटत, त्या काळी कुणा आर्टिस्टला मिळालं असेल. अर्थातच ही सगळी मेहरबानी कपिल पाटील यांची होती. तर इथे मी पेज लेआउट करताना पहिल्या पानासाठी रोज एक पॉकेट कार्टून करत होतो. गोविंदराव या टोपणनावाने ते कार्टून छापून येत असे. इथे सल्लागार म्हणून दोन मोठी माणसं काम करत होती. एक अंबरीश मिश्र आणि दुसरे अशोक शहाणे. अंबारीशजी माझ्या कार्टूनचं बऱ्याचदा कौतुक करत असत. एखादं कार्टून आवडलं की ते एक रुपयाचं नाणं मला बक्षीस

देत असत. त्यांनी दिलेली बरीच नाणी मी जमा करून ठेवली होती. बऱ्याचदा ते माझ्या कार्टूनबद्दल बोलत आणि त्यामुळे मी रोज थोडा थोडा परिपक्व होत असे. जबाबदारीचं भानही मला त्यामुळे राहत होतं. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

कार्टून या कलेबद्दल खूप आठवणी आहेत. या काही मंडळींमुळे दिल्लीतल्या काही व्यंगचित्रकारांची माहिती मला मिळाली. महाराष्ट्रात लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांना ओळखणारे खूप आहेत. हे मोठेच आहेत पण तिकडेही दिल्लीत, दक्षिणेत काही मातब्बर लोक होते. रविशंकर होता. सुधीर दार होता. प्रत्येकाची शैली वेगवेगळी होती. एकेकाची खतरनाक स्टाइल होती. पण त्यांचे पेपर इकडे पाहायला मिळत नसल्यामुळे त्या वेळी त्यांच्याबद्दल फार माहिती अशी कुणाला नव्हती. आणि आजच्यासारखे इंटरनेट, फेसबुक वा इंस्टाग्राम नव्हते. आज दोन मिनिटांत जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय चाललंय हे कळतं.

नामदेव ढसाळांशी ओळख (Namdeo Dhasal)

‘आज दिनांक’मधील कार्टूनमुळेच माझी प्रख्यात कवी, लेखक नामदेव ढसाळ यांच्याशी ओळख झाली. मित्र अनिकेत जोशी यांनी ढसाळ यांचे ‘सत्यता’ नावाचे साप्ताहिक डिझाइन करायला लावले. ढसाळ म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्यासोबत काम करताना मला धक्कयावर धक्के बसत होते. त्यांचं भन्नाट वागणं बोलणं बघून मी अवाक झालो होतो. त्यांच्यामुळे मला एक माझं नवीनच आयुष्य गवसलं होतं. मला वाटतं, त्यांच्यामुळे माझ्या रेषांमध्येही एक धाडसीपणा आला. माझं एखादं कार्टून पाहून ते म्हणायचे, ‘काढ दणकून ! मी आहे ना!’ पण माझ्यात त्यांच्याइतका धाडसीपणा नव्हता. ढसाळ यांचं काम करत असताना त्यांना खूप लोक भेटायला यायचे. ढसाळ फक्त पांढऱ्या लुंगीवर त्यांच्याशी खणखणीत आवाजात बोलत बसायचे. मी काम अर्धवट टाकून मधेच ते पाहत बसायचो. फार क्वचित ते बाहेर कधी एकटे दिसायचे. पण बऱ्याचदा त्यांच्या अवतीभवती दहा-बारा माणसं असायची. ढसाळ एखाद्या सम्राटासारखे त्यांच्यामध्ये बसलेले असायचे.

ढसाळांसोबत मी खूप फिरलो आहे. मी राहणारा मुंबईतला, पण त्यांनी मला वेगळीच मुंबई दाखवली. कल्पनेच्याही पलीकडची. रात्री-अपरात्री त्यांच्याबरोबर फिरल्यामुळे मुंबईची दुसरी बाजूही पाहता आली. ते पाहून माझ्यातल्या कलाकाराला शॉक बसत. आज मला माझीच दया येते. त्या काळी त्यांच्यासारखं दोन टक्केही जीवन मला जगता आलं नाही. ढसाळ यांच्या सोबतच्या कितीतरी आठवणी आहेत. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना मी बऱ्याचदा त्यांना भेटायला जात असे. बेडवर असतानाही त्यांच्या गमतीजमती चालू असायच्या. बेडवर असतानाच त्यांचं एक स्केच मी केलं होतं. साध्या बॉलपेनने रेखाटलेलं. त्यांचं निधन झालं तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सकाळी ७ वाजता पोहोचलेला पहिला मी होतो. अर्थात हा काही मोठेपणाचा भाग नाही. मी जवळ गिरगावात राहत होतो. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

ढसाळांनी दृष्टिकोन बदलला

काही माणसं आपल्यावर इतका प्रभाव टाकतात पण त्या वेळी ते जाणवत नाही. पण नंतर ती माणसं नसतानाही तुमच्या मनात कायम राहतात. अशी काही माणसं तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमचे विचार बदलतात. तुम्हाला हलवून जागी करतात. तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण ही माणसं बदलून टाकतात. त्यात तुम्ही चित्रकार वगैरे असाल तर बघायलाच नको. मी ढसाळ यांच्याबरोबर असताना याची मला जाणीव झाली. कारण इथे मी त्यांच्यासोबत खूप वेगवेगळी माणसं पाहत होतो. त्यांच्याकडे खूप लोक आपापली दुःख मांडत होती. समस्या घेऊन येत होती. मला हे सगळं नवं होतं. हे सगळं पाहून मी विचारात पडायचो. ढसाळ साहित्यिक म्हणून खूपच मोठे होते. आमच्या साहित्यावर फार कमी गप्पा झाल्या. कला केवळ ‘छान दिसणं’ नाही, तर कला काही वेळा गूढ, विचित्र, खळबळजनक किंवा अस्वस्थ करणारीही असते. तिचं उद्दिष्ट नेहमी सौंदर्य दाखवणं नसून प्रेक्षकाला विचार करायला लावणं; भावनिक प्रतिक्रियेला चालना देणं; किंवा समाजावर भाष्य करणं असं असू शकतं.

त्यांच्या पत्नी मलिका अमर शेख यांच्या ‘महानगर’ नावाच्या कवितासंग्रहातल्या कवितांना मी चित्रकार असूनही चित्र न काढता एक वेगळाच प्रकार केला होता. पेपर-मासिकं यांच्यातील फोटो कापून, फाडून प्रत्येक कवितेला एकेक कोलाज केलं होतं. अर्थात ढसाळांची पाठीवर थाप होती म्हणून. पण तसा प्रकार पुढे कुठल्या पुस्तकात मला पाहायला मिळाला नाही. ढसाळ आता नाहीत, पण आजही ते माझ्या अवतीभवती कुठेतरी असतातच. मिश्कीलपणे ते हसत असल्याचा मला भास होतो. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

सहा-सात वर्षांपूर्वी मी त्यांच्यावर एक मोठा लेख लिहिला होता. सोबत त्यांचं एक स्केचही केलं होतं. आजही ते स्केच अधूनमधून फेसबुकवर इथून तिथून कोणाकडून तरी फिरताना दिसतं. कुणाच्या कवितेत ते चित्र असतं, तर कुणाच्या लेखात असतं. मग चित्रातले ढसाळ आणि मी एकमेकांकडे पाहून हसतो.

चंद्रकांत खोत नावाचा अवलिया (Chandrakant Khot)

माझ्या आयुष्याला स्पर्शन गेलेल्या ज्ञानवंतांचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा एक साधू पुरुष माझ्या आजही डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतो. भगव्या कपड्यात तो त्या मंदिरात कमालीचा वेगळा, उठावदार दिसत असे. मुळात तो गोरापान, तेजस्वी होता. तो काळ असावा २०१०चा. ‘लोकमत’च्या चिंचपोकळी ऑफिसात तेव्हा मी काम करत होतो. या ऑफिसच्या अगदी शेजारी एक साईबाबांचं मंदिर होतं. एकदा दुपारी ऑफिसच्या गेटमधून आत शिरणार तेव्हा अचानक हा साधू मला आडवा आला. कदाचित मीच त्याला आडवा गेलो असणार. मग कोणी बाजूला व्हायचं यावर तिथे गंभीर चर्चा झाली. थोडी गमतीने शाब्दिक झटापट झाली. तेव्हा त्या साधू पुरुषाने मला माझं नाव विचारलं. तर मीच त्यांना म्हणालो, ‘तुम्ही चंद्रकांत खोत आहात ना!’ खरंतर त्यांना कधी मी याआधी पाहिलंही नव्हतं. फक्त नाव ऐकलं होतं. पण मनातून वाटलं हे तेच असावेत. मग परत ते म्हणाले, (Cartoonist Pradeep Mhapsekar)

‘तुम्ही कोण?’ मग ओळखपाळख झाल्यावर ते म्हणाले, ‘ऑफिसातून सुटल्यावर इथे खाली, या मंदिरात मला भेटायला या.’ खोत तेव्हा त्या मंदिरातच दिवसभर एका जागेवर बसलेले असायचे. हे खोत तेच ‘अबकडई’ दिवाळी अंकवाले. ‘बिंब प्रतिबिंब’ पुस्तकवाले. दोनेक वर्षं मी त्यांना रोज इथे मंदिरात भेटायचो. खूप गप्पा रंगायच्या. त्यांच्या आणि माझ्या वयात अंतर असतानाही नंतर ते अगदी जानी दोस्त झाले होते. ते त्यांच्या ‘अबकडई’ अंकाचे स्वतः लेआऊट करायचे. कमालीचा डिझाइन सेन्स होता त्यांना. प्रत्येक वर्षी भन्नाट कल्पना सुचायच्या त्यांना. सलग २१ अंक त्यांनी काढले. दरवर्षी वेगळा विषय असायचा. खूप लोकांच्या संग्रही अजूनही ते अंक असतील. त्याच्या ‘अबकडई’ अंकावर एकाने पीएचडी केली आहे. एकेक अंकाच्या आठवणी ते मला भरभरून सांगायचे. आणि मी म्हणायचो, ‘बापरे काय म्हणता ? अरे देवा !’

खोतांचा भगवा रंग

खोतांचा तो भगवा रंग मला खूप काही शिकवून गेला होता. ते कमी बोलत पण रोज काही अफलातून सांगून जात. त्यांच्या या अफलातून शब्दांनी माझ्या मेंदूत खूप काही चित्र तयार होतं. ते लेखक होते. कवी होते. पण मला त्याहीपेक्षा ते कुणी अधिक वेगळे वाटत होते. त्यांच्या भूतकाळातल्या एकेक घटना मला एकेक कॅनव्हासवरचं चित्र वाटत होतं. काय आयुष्य जगले होते ते. जगण्यात सतत वेगळेपणा, स्पष्टपणा. आम्ही बोलायचो एक पण कळत-नकळत आमच्या दोघांत काहीतरी दुसरीच अदृश्य देवाणघेवाण होत असे. म्हणजे बघा, ते मला मोठे कलाकारासारखे वाटायचे. पांढरीशुभ्र दाढी. हातात ब्रश असता तर? ते दोनेक वर्षं रोज दोन कलाकारांतला मौनातला संवाद असायचा. कुठलाही विषय आम्हाला व्यर्ज नसायचा. कुणी त्यांची मुलाखत घ्यायला आलं तर त्यांना ते उडवून लावत. मग कुणी मला फोन करायचं. म्हणायचं, ‘मित्रा, प्लीज त्यांना राजी कर बाबा.’ मी मग प्रेमाने त्यांच्यावर वैतागायचो. म्हणायचो, ‘का यांना टाळता ?’ खोत म्हणायचे, ‘याने माझं एकही पुस्तक वाचलेलं नाही.’ मग मी त्यांना समजवायचो. तेव्हा कुठे तयार होत.

बाहेरून रागीट, आतून प्रेमळ

असा हा बाहेरून रागीट वाटणारा पण आतून कमालीचा प्रेमळ माणूस. माझ्या एका पुस्तकावर त्यांनी अभिप्राय द्यावा, अशी माझी इच्छा होती. तसं मी त्यांना सांगितलं तर ते मोठ्याने हातवारे करत म्हणाले, ‘मी अभिप्राय वगैरे देत नाही’ मी म्हटलं, ‘ठीक आहे, तुमची मर्जी. चारेक दिवसांनी मी ऑफिसात जात असताना त्यांनी मला मोठ्याने हाक दिली. ‘ओ बावीस कप !’ त्या काळी मी खूप चहा प्यायचो म्हणून बावीस कप. मी आत मंदिरात जाताच त्यांनी आपल्या डोक्याखालच्या मोठ्या बॅगेतून एक कागद माझ्या हातात दिला. (Cartoonist Pradeep Mhapsekar)

म्हणाले, ‘हा घ्या तुमच्या पुस्तकावरचा अभिप्राय.’ कागदावर फक्त चार ओळी लिहिलेल्या होत्या. त्या चार ओळी माझ्यासाठी चारशे ओळी होत्या. ‘माझ्या ठाण्यातल्या पेंटिंग प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांनीच करावं, असं मी त्यांना म्हणालो, पण मंदिर सोडून ते कधीच कुठे बाहेर गेले नाहीत. पण उद्घाटनाच्या दिवशी ते सकाळीच तिथे हजर होते आणि जोरदार भाषण करून गेले. त्यांच्या मंदिरासमोरच ज्यू लोकांची स्मशानभूमी होती. तिथे आत आम्ही दोघांनी जायचं ठरवलं होतं. पण ते राहूनच गेलं. कारण हा भगवा कलाकार जगातून अचानक निघून गेला. नव्हे, चटका लावून गेला.

अमूर्त शैलीत चित्रं

कार्टूननंतर माझ्या आयुष्यातला दुसरा चॅप्टर सुरू झाला होता. तो म्हणजे पेंटिंग. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग. हा प्रकार बरीच वर्ष माझ्या डोक्यात वादळासारखा फिरत होता. ‘आज दिनांक’मध्ये असताना काही अमूर्त शैलीत चित्रं केली होती.

पण नंतर लक्षात आलं, हे काम घाईगर्दीत होणारं नाही. हा मनाचा, मेंदूचा एक अदृश्य अनोखा खेळ आहे. त्या काळी मी मीडियात काम करत होतो. ते सोडता येणार नव्हतं. कारण आर्थिक मुद्दा महत्त्वाचा होता. तेव्हाच ठरवलं होत पेंटिंग्ज करायची पण नंतर. सगळ्या दगदगीपासून दूर गेल्यावर. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगबद्दल काय बोलणार? ही कला काय आहे? ती केवळ रंगांची उधळण नाही. असं म्हणतात की तो एक कल्पनाशक्तीचा स्फोट आहे. ते खरं आहे. ती एक अशी जादू आहे, जी कधी कागदावर, कधी कॅनव्हासवर, तर कधी हृदयावर उमटते. कशी? त्याचं विश्लेषण करणं थोडं अवघड आहे.

चित्रकार हा केवळ रंगांचं कौशल्य असलेली व्यक्ती नसतो. एक द्रष्टा असतो. जो समाज, निसर्ग, भावना आणि कल्पना यांना आपल्या दृष्टिकोणातून पाहतो आणि त्या भावना, कल्पना रंगांतून व्यक्त करतो. चित्रकाराचं काम असतं बघणाऱ्याच्या मनात एक नवीन जागा निर्माण करणं; जिथे तो विचार करेल, अनुभवेल आणि आत्मपरीक्षण करेल. जॉर्जिया ओ’कीफ (Georgia O’Keeffe) म्हणतो, ‘रंगांच्या लहरी आणि आकारांच्या भाषेत मी असे अनेक विचार मांडले; जे शब्दांमध्ये सांगणं अशक्य होतं.’ तर लिओनार्डो दा विंची म्हणतो, ‘चित्रकलेचा संबंध केवळ डोळ्यांशी नसतो. ती तर मनाची भाषा असते. कलाकार डोळ्यांनी पाहतो, पण मनाच्या विचारांनी रंग भरतो.’ एडवर्ड हॉपर म्हणतो ‘जर एखादी भावना शब्दांत अचूक उतरवता आली असती, तर ती चित्रात उतरवण्याची गरजच पडली नसती.’ ही काही उदाहरणं मी मुद्दाम इथे दिली. कारण माझ्या आयुष्यातला हा दुसरा चॅप्टर किती गहन आहे; वेगळा आहे, याची कल्पना येईल.

फ्रांझ क्लाइन

फ्रांझ क्लाइन. अॅबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझमचा मास्टर. सर्वात प्रभावशाली अमेरिकन अॅबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिस्ट चित्रकारांपैकी एक. ऊर्जा आणि गतिमानता टिपणाऱ्या त्यांच्या धाडसी, काळ्या आणि पांढऱ्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला चित्रकार. यांचं पहिलं चित्र मी पाहिलं तेव्हा मी चक्रावून गेलो होतो. क्लाइन फक्त सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि नंतर त्याच्या आईने त्याला अनाथ मुलांसाठीच्या संस्थेत पाठवून दिलं. हा जीवनातला खडतर काळ विसरून त्याने कलाक्षेत्रात आपलं नाव अजरामर केलं. तो म्हणायचा, ‘मी जे पाहतो ते मी रंगवत नाही तर त्या पाहण्याने माझ्यात निर्माण झालेल्या भावना रंगवतो.’ त्याच्या या तत्त्वज्ञानामुळे त्याला काही जण अॅक्शन पेंटर म्हणत. मला याचं काम खूप आवडतं. कारण याची खूप चित्रं काळ्या पांढऱ्या रंगांत रंगवलेली आहेत. माझ्या मनात हेच दोन रंग पुन्हा पुन्हा उमटत असतात.

मी सुरुवातीची कागदावरची बरीचशी चित्रं काळ्या पांढऱ्या रंगांत केली. या दोन रंगांत खेळायला मला खूप आवडत होतं. त्याआधी मी काही क्लाइनची चित्रं पहिली नव्हती. कालांतराने नेटवर एका काळ्या पांढऱ्या रंगातल्या चित्राने माझं लक्ष वेधलं. ते कमालीचं आवडलं मला. मग मी त्या चित्रकाराचा शोध घेतला. तर हे क्लाइन महाशय सापडले. मग तर मी सुसाटपणे याच्या मागे लागलो. याची इतर चित्रं शोधू लागलो. महाशय मला पुढे धक्क्यावर धक्के देत गेले. त्यांच्या एकेक चित्राने मी हबकून गेलो. हेच ते हेच ते ! काय तो फोर्स ! काय तो कॅनव्हासवरचा वेग. अफलातून कॉम्बिनेशन. कितीतरी सोपं पण, तितकंच अवघड, अवजड !

कला आणि कलाकार यांच्यातला संवाद

कला आणि कलाकार यांच्यातला संवाद हा केवळ कलाकृतींच्या निर्मितीपुरता मर्यादित नसतो. तो एक सर्जनशील प्रवास असतो. अंतर्मनाच्या गाभ्यापासून जगाच्या व्यापकतेपर्यंत. हा संवाद जितका खोल, तितकी कला प्रभावी. आणि तितकाच कलाकार अजरामर. ओऽऽ म्हापसेकर मधेच किती जड बोलता ! असो.

तर क्लाइन मला खरंतर आतून उद्ध्वस्त करून गेला. मला उभा-आडवा नांगरून गेला. कधी कधी कलाकाराला वाटतं की, ‘मी ही कला घडवत आहे’, पण खरंतर त्याला घडवणारी ती कला असते. कलाकाराचं आयुष्य, त्याचे अनुभव, वेदना, आनंद या सर्वांचं सुंदर रूप म्हणजे कला. ती कलाकाराशी बोलते, ‘मला पूर्ण कर, मला मुक्त कर.’ आणि कलाकारही उत्तर देतो, ‘मी तुझ्या रूपातून स्वतःला शोधतोय.’ क्लाइनचे काळे-पांढरे रंग इतर सगळ्या रंगांना झाकोळून टाकतात. हीच ताकद असते कलाकाराची. १३ मे १९६२ रोजी वयाच्या ५२व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना फ्रांझ क्लाइन यांचं हृदयविकाराने निधन झालं.

कसा घडतो चित्रकार ?

चित्रकार कसा घडत जातो, या प्रश्नाचं उत्तर अनेक टप्प्यांमध्ये आणि विविध पातळ्यांवर देता येईल. एक, चित्रकार म्हणजे फक्त चित्रं काढणारी व्यक्ती नसून तो एक संवेदनशील, निरीक्षणशील, सर्जनशील आणि सतत शिकणारा कलाकार असतो. चित्रकार घडण्यासाठी केवळ हातात कला असणं पुरेसं नसतं. निसर्ग, माणसं, प्रकाश, छाया, रंगसंगती यांचं सूक्ष्म निरीक्षण हळूहळू एक कलाकार घडवू लागतं. तो केवळ बघत नाही, तर ‘पाहू’ लागतो. खोलात जाऊन. एखाद्या चित्रकाराचं वेगळेपण त्याच्या शैलीत, दृष्टिकोणात असतं. ही शैली सहज तयार होत नाही. ती अनुभव, प्रेरणा, आत्ममंथन आणि प्रयोगातून घडते. खूप कष्टाने ती शैली त्याला गवसते. कधी तो आपल्या गुरूपासून शिकतो, तर कधी वेळेच्या वादळात, भोवऱ्यात स्वतःला शोधत असतो. तर कधी इतर मोठ्या व्यक्तींकडून आदर वाटणाऱ्या ज्ञानवंतांमध्ये तो शोधतो.

आयुष्यातला तो एक महत्त्वाचा काळ असा मस्त बिझी होता. या काळात मी माझ्या कलेच्या कामामुळेच कितीतरी

मोठमोठ्या लोकांच्या सहवासात आलो. माझ्या ऐन तरुण वयात ही प्रगल्भ, मोठ्या विचारांची माणसं मला गवसली. वेळ, काळ, सकाळ, दुपार, रात्र सगळं काही विसरायला होत असे या काळात. अशी कितीतरी माणसं आहेत. जागेअभावी प्रत्येकाबद्दल मला इथे सांगता येणार नाही. माझ्या हृदयातल्या कॅनव्हासवर ती कायमची रंगवली गेलेली आहेत. या लोकांनी कळत-नकळत माझ्यावर संस्कार केले. मला प्रगल्भ केलं. मला घडवलं.

दरवाजावरच्या रेखाटनानंतरचा प्रवास

लहानपणी गावातल्या दरवाजावर खडूने रेखाटलेल्या त्या रेषेने पुढे खूप मोठा प्रवास केला. ती रेषा आजपर्यंत तीच आहे. पण या सगळ्या मान्यवर, मोठ्या मंडळींमुळे या रेषेने कितीतरी नवनवीन रुबाबदार वळणं घेतली. लहानपणी हातात खडू घेतला होता. पुढे हातात पेन्सिल आली. स्केचपेन आलं. जे.जे.मध्ये असताना हातात ब्रश आला. आज हातात आयपॅड आहे. पण सगळीकडे रेषा तीच आहे. तिने फक्त कपडे बदलले आहेत. पण तिचा स्वर, आवाज, संवाद तोच आहे. या रेषेच्या अवतीभवती कितीतरी मोठी अदृश्य माणसं आहेत. यातल्या काहींना रेखाटून, त्यांच्या लेखांना, कवितांना चित्र काढून किंचितशी परतफेड केली आहे असं त्यांना वाटत असेल. पण मला नाही वाटत तसं. तसं वाटलं असतं तर या रेषेने माझा कधीच जीव घेतला असता.

असो. तर चित्रकार पॉल क्ली म्हणाला होता, ‘रेखाटन म्हणजे एक रेषा फिरायला गेलेली आहे, इतकंच!’

मित्रांनो, आज माझी रेषा फिरून आली. आल्या आल्या तिने प्रवासातल्या गमतीजमती मला सांगितल्या. त्या फक्त मी तुमच्याशी शेअर केल्या इतकंच !

***

(प्रदीप म्हापसेकर हे प्रथितयश चित्रकार, व्यंगचित्रकार आहेत. संपर्क: ९८२०० ७१९७५)

(समतावादी मुक्त संवाद पत्रिका – दिवाळी २०२५ विशेषांकातून साभार)

Related posts

पेपरफुटी आणि एकलव्याचा अंगठा

काळोखातले उजेडात…

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले