कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज रविवारी कोल्हापूर सांगली रस्त्यांवर अंकली टोल नाक्यावर तीन तासाहून अधिक काळ शेतकऱ्यांसह, नागरिक, सर्वपक्षीय नेत्यांनी चक्काजाम केला. महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका न घेतल्यास थेट अलमट्टीवर धडक मारु, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला. (Almatti Dam)
सर्वपक्षीय विरोधी संघर्ष समितीने आज अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात सांगलीचे खासदार विशाल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, जयंत आसगांवकर, अरुण लाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, उल्हास पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील, रजनी मगदूम, सावकार मादनाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Almatti Dam)
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर ठाम असून केंद्रीय जलमंत्र्यांनी कर्नाटकच्या शिष्टमंडळाला बैठकीला बोलावले आहे. धरणाची उंची वाढवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. फक्त तोंडी विरोध केला जात आहे. धरणाच्या उंचीला विरोध आहे यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तसेच कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला. चक्काजाममुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. (Almatti Dam)
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी रस्त्यांवर ठिय्या मांडून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राज्य सरकारकडून जोपर्यंत बैठकीसाठी लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जलसंपदा विभागाकडून लेखी पत्र आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी केंद्रापर्यंत जाऊन आपली बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र शासन धरणाबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमदार विश्वजीत कदम यांनी केंद्राकडे पाठवण्यात आलेला वडनेरे समितीचा अहवाल चुकीचा असून त्याविरोधात सरकारने आवाज उठवावा. अन्यथा याच अहवालाच्या आधारे कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवेल, अशी भिती व्यक्त केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, यांनी धरणाची उंची कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Almatti Dam)
बुधवारी २१ मे रोजी बैठक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी तीन वाजता बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
राज्य शासन अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत. जलसंपदा मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.