नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबा (एलटीई) या दहशतवादी संघटनेचा टॉपचा दहशतवादी रजाउल्लाह निजामानी उर्फ अबू सैउल्लाह हा ठार झाला. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तींनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (Abu Saiullah)
अबू सैउल्लाहला पाकिस्तान सरकारकडून खास सुरक्षा व्यवस्था पुरवली असतानाही त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आज रविवारी दुपारी सिंधमधील माटली येथील त्याच्या निवासस्थानातून काही कामानिमित्त बाहेर पडला. एका क्रॉसिंगजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले.
अबू सैउल्लाह भारतासाठी मोस्ट वाँटेंड होता. २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ छावणीवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरूमधील इंडियन सायन्स काँग्रेसवर हल्ला आणि २००६ मध्ये नागपूरमधील आरएसएस मुख्यालयावरील हल्ल्याच्या घटनेत तो मुख्य सुत्रधार होता. (Abu Saiullah)
काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करुन नऊ दहशतवादी तळावर हल्ले केले होते. त्यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या ऑपरेशनमध्ये युसुफ अझहर, अब्दुल रौफ, मुदासिर अहमद अशा खतरनाम दहशतवाद्याने अचूक लक्ष्य साधताना यमदसनी पाठवले होते. पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यावर लष्कराने अचूक कारवाई केली होती. एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर दिले होते. पण पाच दिवसात दोन्ही देशाने शस्त्रसंधी केली. त्यानंतर आज रविवारी अबू सैउल्लाह ठार झाल्याचे वृत्त धडकले. (Abu Saiullah)