IPL Final : इडन गार्डन्सवर होईल अंतिम सामना

IPL Final

कोलकाता : आयपीएलचा अंतिम सामना इडन गार्डन्स स्टेडियमवरच होईल, अशी आशा बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या यजमानपद कायम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (IPL Final)

आयपीएलच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार इडन गार्डन्सवर २५ मे रोजी अंतिम सामना रंगणार होता. तथापि, ऑपरेशन सिंदूरमुळे इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अठरावा मोसम ८ मे रोजी स्थगित करण्यात आला. त्यानंतर, बीसीसीआयकडून उर्वरित सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर केले असले, तरी प्ले-ऑफ लढती व अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही. नव्या वेळापत्रकानुसार ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. सध्या बीसीसीआयकडून देशभरातील हवामानाचा आढावा घेण्यात येत असून २५ मेनंतर प्ले-ऑफ व अंतिम सामन्यांची ठिकाणनिश्चिती होईल, असे समजते. या पार्श्वभूमीवर बोलताना गांगुली म्हणाले, “आम्ही बीसीसीआयशी चर्चा करत आहोत. बीसीसीआय आणि कॅब यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे अंतिम सामना इडन गार्डन्सवरच खेळवला जाईल, अशी मला आशा आहे.” (IPL Final)

आयपीएलचा अंतिम सामना इडन गार्डन्सवर व्हावा, या मागणीसाठी काही स्टेडियमबाहेर निदर्शनेही केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना गांगुली यांनी “आयपीएलच्या अंतिम सामन्याचं स्थळ बदलणं इतकं सोपं आहे का?” असा प्रतिप्रश्न विचारला. निदर्शनांचा फायदा होणार नाही. आम्ही बीसीसीआयशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आयपीएलच्या मागील मोसमाचा विजेता असल्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्याचे यजमानपद इडन गार्डन्सला मिळाले होते. १७ मे रोजी बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने कोलकात्याच्या यंदाच्या प्ले-ऑफमधील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे इडन गार्डन्सवर अंतिम सामना रंगला, तरी त्यामध्ये स्थानिक संघ असणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. (IPL Final)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर