लोकसभेत जायला पंतप्रधान मोदी इतके का घाबरले?

Why was PM Modi so afraid to go to the Lok Sabha

गुजरातचे मुख्यमंत्री असताना एकदा निवासस्थानाजवळच्या ट्रकचा टायर फुटला, तर बाँबस्फोट झाला म्हणून नरेंद्र मोदी मध्यरात्री घाबरून पळाल्याचं सांगितलं जातं. पंजाबमध्ये रस्त्यावर काही शेतकरी आंदोलन करीत होते, तर त्यांना घाबरून विमानतळावर परत आले आणि निरोप दिला की मुख्यमंत्र्यांना सांगा मी जिवंत परत आलो. आणि आता महिला खासदार हल्ला करणार होत्या म्हणून लोकसभेकडे पाठ फिरवलेले मोदी देशाने बघितले. एरव्ही छप्पन इंच छातीच्या बढाया मारणारे मोदी प्रचंड सुरक्षा कवच असतानाही एवढे जिवाला का घाबरतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

विजय चोरमारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षांत संसदेच्या सुरक्षित वातावरणातही पहिल्यांदाच इतके घाबरलेले पाहायला मिळाले. इतके घाबरले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी ते लोकसभेत आले नाहीत. विरोधी खासदार त्यांच्यावर हल्ला करणार असल्याचा कांगावा सत्ताधा-यांनी केला. मोदींची अब्रू वाचवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, मीच पंतप्रधानांना लोकसभेत येऊ नका म्हणून सांगितलं. काही असले तरी मोदींनी लोकसभेत भाषण केलं नाही, हेच सत्य मागं उरतं. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तर जो डर गया…. हा डायलॉगही संसदेच्या आवारात ऐकवला.

गुरुवारी पाच फेब्रुवारीला संसदेची दोन्ही सभागृहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जवळपास ठप्प होती. लोकसभेचं कामकाज सुरू होताच लगेच स्थगित करण्यात आलं. थोड्याच वेळात ते पुन्हा सुरू झालं आणि अर्थसंकल्पाशी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाशिवाय हे झालं याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. (Why was PM Modi so afraid to go to the Lok Sabha?)

निडर नेता राहूल गांधी मोदींची कोंडी करतायेत

सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेत म्हणजे २०१४ आणि २०१९ नंतरच्या लोकसभेत भाजपकडं आणि पर्यायानं एनडीएकडं प्रचंड बहुमत होतं. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं होतं. एवढं की विरोधी पक्षनेता मिळेल एवढंही संख्याबळ नव्हतं. २०२४ला चित्र बदललं. काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले. विशाल पाटील आणि पप्पू यादव यांनी पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेसचं संख्याबळ १०१ झालं. भाजपला २४० वर रोखलं होतं. इतर विरोधकांचं संख्याबळही लक्षणीय आहे. त्यामुळे १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत संख्याबळाच्या जोरावर सरकार जी मुजोरी करत होते, ती यावेळी शक्य नाही. त्यात पुन्हा सभागृहात विरोधी पक्षनेता आहे. घटनात्मक पद आहे. त्याची ताकद आहे ती वेगळीच. त्या पदावर राहुल गांधी यांच्यासारखा निडर नेता आहे त्यामुळं ते पदोपदी सत्ताधा-यांची आणि पंतप्रधान मोदींची कोंडी करताहेत.

एप्स्टिन आणि भारत-अमेरिका करार

यावेळचं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या सुमारास काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या सरकारला अडचणीत आणणा-या होत्या. पंतप्रधान मोदींसाठी नामुष्कीजनक होत्या. त्यामुळे स्वाभाविक एरव्ही आक्रमकतेचा दिखावा करणारे मोदी आत्मविश्वास गमावल्यासारखे दिसत होते. त्यात पुन्हा विरोधी पक्ष ज्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणेल अशी अपेक्षा होती तसं काही घडलं नाही. सत्ताधा-यांनी तयारी भारत-अमेरिका कराराची केली असणार. एप्स्टिन फाइल्ससंदर्भात प्रतिवाद करण्यासारखं काही नव्हतं, पण त्याचीही तयारी केली असणार. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून त्यांनी काय तयारी केली होती, याचा अंदाज येऊ शकतो.

पण राहुल गांधी यांनी हे दोन्ही ट्रेंडिंगमधले विषय बाजूला ठेवले आणि एक असा मुद्दा पुढे आणला. ज्यापुढे सत्ताधा-यांकडं काही उत्तर नव्हतं. अध्यक्षांच्या मदतीनं राहुल गांधी यांना न बोलू देणं आणि गोंधळ घालणं एवढंच त्यांच्या हाती होतं. ते प्रयत्न त्यांनी भरपूर केले. पण सभागृहाच्या बाहेरचा अवकाश राहुल गांधी यांच्यासाठी खुला होता. त्यांच्यासह प्रियांका गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी सभागृहाबाहेरच्या मंचावरही तुफान बॅटिंग केली. गेल्या बारा वर्षांत मोदी सरकार पहिल्यांदा गोंधळलेलं दिसून आलं. आपल्यावरील आरोपांसंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाही, हे अमित शाह यांच्यासारख्या कथित चाणक्याच्याही ध्यानात आलं होतं. (Why was PM Modi so afraid to go to the Lok Sabha?)

जनरल नरवणे यांचं पुस्तकातील उत्तारा काय आहे?

माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा विषय राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि सत्ताधा-यांना मोठा शॉक बसला. चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केली असताना लष्कर सरकारकडं कारवाईची परवानगी मागत होतं. परंतु संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पंतप्रधान यापैकी कुणीही त्यासंदर्भात निर्णय घेतला नाही, असं जनरल नरवणे यांनी पुस्तकात म्हटलं आहे. पुस्तकातील त्या प्रकरणाचा सारांश ‘द कारवान’ या नियतकालिकानं छापला आहे.

राहुल गांधी यांनी जो उतारा वाचण्याचा प्रयत्न केला तो खरा आहे का?  तर खऱा आहे. तो जनरल नरवणे यांच्या पुस्तकातला आहे का?, तर आहे. त्यात कुठलाही खोटारडेपणाही नाही आणि नव्हता. तरीसुद्धा त्यामुळं सत्ताधारी बिथरले. कारण त्यांच्या छप्पन इंच छातीच्या फुग्याला माजी लष्कर प्रमुखांनी टाचणी लावली होती. चीनला लाल आँखे दाखवण्याची भाषा करणा-यांची प्रत्यक्ष चीननं घुसखोरी केली तेव्हा पिवळी होण्याची पाळी आली होती. जनरल नरवणे यांच्या पुस्तकातून ते स्पष्ट होत होतं.

मोदींचा भेकडपणा जगासमोर आणला

`फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी` हे पुस्तक जरनल नरवणे यांनी लिहून पूर्ण केलं आहे. ते पेंग्विन प्रकाशनानं छापूनही तयार केलं आहे. आणि राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार ते अमॅझॉनवर उपलब्धही आहे. परंतु हे पुस्तक प्रकाशकानं संरक्षण मंत्रालयाकडं मंजुरीसाठी पाठवलंय. एक वर्षांपासून अधिक काळ संरक्षण मंत्रालयानं म्हणजे केंद्र सरकारनं ते पुस्तक अडवून ठेवलंय. जनरल नरवणे यांच्या पुस्तकातला तपशील मोदी सरकारचा भेकडपणा उघड करणारा आहे. त्यामुळं सरकारनं त्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. ही बाब राहुल गांधी यांना चव्हाट्यावर आणायची होती. ती त्यांनी संसदेच्या मंचावरून जगासमोर आणली. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नसल्यामुळं त्यातला उतारा वाचता येणार नाही, या मुद्द्यावर अध्यक्ष अडून बसले. सत्ताधा-यांनीही तेवढाच मुद्दा लावून धरला. त्या पुस्तकातलं वास्तव खोटं आहे, असं कुणीच म्हणत नव्हतं. तर असा सगळा मामला होता.

त्यामुळं पंतप्रधान मोदी बुधवारपासून लोकसभेत येणं टाळत होते. त्यामागच्या कारणाचीही चर्चा होती. असं सांगितलं जात होतं की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदीजींना माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत भेट देऊ इच्छित होते. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात त्या पुस्तकाची प्रत दाखवून तसं जाहीरही केलं. सत्ताधारी पक्ष मात्र हे पुस्तक प्रकाशित झालं नसल्याचा दावा करत आहे. (Why was PM Modi so afraid to go to the Lok Sabha?)

काँग्रेसला माझं थडगं बांधायचं आहे

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जाणं टाळलं, मात्र गुरुवारी संध्याकाळी त्यांनी राज्यसभेत भाषण केलं. भारत-अमेरिका व्यापार करारामुळं जागतिक पातळीवर भारताचं महत्त्व किती वाढलंय वगैरे सांगितलं. गेली पंचवीस वर्षे काँग्रेस मला रोज दोन किलो शिव्या देते. काँग्रेसला माझं थडगं बांधायचं आहे वगैरे वगैरे. ते लोकसभेत मात्र गेले नाही. याचा अर्थ असा काढला जातो की, लोकसभेत राहुल गांधींना कोणतीही कृती करण्याची संधी त्यांना द्यायची नव्हती.

बुधवारचा गोंधळ गुरुवारीही मागील पानावरून पुढे सुरू राहिला. विरोधी खासदारांच्या जोरदार घोषणाबाजीमुळं गुरुवारी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. विरोध सुरू असतानाच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पंतप्रधानांच्या भाषणाशिवायच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला, हे इथं लक्षात घ्यायला हवं.

बुधवारी चार फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी लोकसभेत भाषण देण्यासाठी आले नाहीत. त्यावर सत्ताधारी पक्षातर्फे असा कांगावा करण्यात आला की, त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती होती. स्वतः लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी म्हणे त्यांना तसं कळवलं होतं. त्यामुळं मोदी आले नाहीत. म्हणजे छप्पन इंच छाती, विश्वगुरू वगैरे बिरुदं मिरवणा-या मोदींवर म्हणे लोकसभेत हल्ला होणार होता. आणि त्या हल्ल्याला घाबरून ते लोकसभेत आले नाहीत. सत्ताधा-यांच्या या युक्तिवादासाठी लोकसभेचं फुटेज दाखवलं गेलं. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान जिथे बसतात त्या जागेला घेराव घातला होता.

प्रियंका गांधींची उपरोधिक टीका

काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी यांनीही लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीवर उपरोधिक टीका केली. त्या म्हणाल्या, सरकार एपस्टिन फाइल्समुळे घाबरलं आहे का? की राहुल गांधी पुस्तकातील संदर्भ देतील याची भीती आहे? की भारत-अमेरिका करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, म्हणून प्रश्नांना घाबरत आहेत? मला वाटत नाही पंतप्रधान मोदी संसदेत येण्याचं धाडस करतील. ते आले तर मी त्यांना पुस्तक भेट देईन, असं सांगून राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना जनरल नरवणे यांच्या पुस्तकाची छापील प्रत दाखवली.

 तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तर संसदेच्या आवारात फिल्मी स्टाइलमध्ये मोदींच्या घाबरण्यासंदर्भात वक्तव्य केलं. जो डर गया… सो मर गया… हा फिल्मी डॉयलॉग बोलत त्यांनी मोदींवर टीका केली.

निशिकांत दुबेंचे भाषणाने विरोधक संतप्त

या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट घडली. ती म्हणजे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे अत्यंत घाणेरडे भाषण. तुम्ही एक पुस्तक आणताय तर माझ्याकडं अनेक पुस्तकं असल्याचं सांगून त्यांनी काही पुस्तकांचे संदर्भ दिले. त्यांचे संदर्भ देत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केली. नेहरू परिवाराचा, काँग्रेस परिवाराचा इतिहास गद्दारी, मक्कारी आणि अय्याशीने भरला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे विरोधकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

काँग्रेस, आणि राहुल गांधींच्या आरोपांचा प्रतिवाद करता येत नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून भाजप चारित्र्यहननावर उतरला असल्याचं दिसून येतं. हा संघर्ष कुठवर कसा जातोय हे पाहावे लागणार आहे. (Why was PM Modi so afraid to go to the Lok Sabha?)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर