लिमा : भारताची नेमबाज सिमरनप्रीत कौर ब्रारने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. या प्रकारामध्ये भारताची ऑलिंपिक पदकविजेती मनू भाकेर अंतिम फेरीत चौथ्या स्थानी राहिली, तर एशा सिंहसुद्धा अंतिम फेरीत अपयशी ठरली. (Simranpreet)
पेरू देशातील लिमा येथे ही स्पर्धा पार पडली. भारताने या स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण, चार रौप्य व एक ब्राँझ अशा एकूण सात पदकांची कमाई केली. पदकतक्त्यात भारत चीन व अमेरिकेखालोखाल तिसऱ्या स्थानी राहिला. २५ मी. पिस्टल रॅपिड फायर प्रकारामध्ये महिला गटाच्या प्राथमिक फेरीत मनू भाकेर ५८५ गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. तिचे व चीनची नेमबाज युजिए सूनचे प्रत्येकी ५८५ गुण झाले होते. परंतु, शूट-ऑफमध्ये यूजिएने मनूवर २५-१६ अशी आघाडी घेत प्राथमिक फेरीत अग्रस्थान पटकावले. या फेरीतून सिमरनप्रीतने ५८० गुणांसह सहाव्या स्थानी, तर एशाने ५७५ गुणांसह नवव्या स्थानी राहून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. (Simranpreet)
अंतिम फेरीत मात्र मनूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पहिल्या टप्प्यात १५ शॉट्समध्ये तिला केवळ सहाच गुण मिळवता आले. या टप्प्यामध्ये सिमरनप्रीतने ९, तर एशाने ८ गुण मिळवले. दुसऱ्या एलिमिनेशन टप्प्यामध्ये मनूने काही प्रमाणात कामगिरी सुधारली. या टप्प्यामध्ये तिसऱ्या शॉटवेळी मनूसह तीन नेमबाजांमध्ये १७ गुणांवर बरोबरी झाली. त्यावेळी शूट-ऑफ टायमध्ये एशाचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर मनूने चौथ्या शॉट्सवेळी जर्मनीच्या डॉरिन वेनेकँपलाही मागे टाकले. पाचव्या शॉटअखेर मात्र मनू चीनच्या क्विआनशुन याओकडून २२-२५ अशी पिछाडीवर पडली. त्यामुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. (Simranpreet)
वीस वर्षीय सिमरनप्रीतने अंतिम फेरीच्या एलिमिनेशन टप्प्यात सरस कामगिरी केली. या टप्प्यामध्ये ती जवळपास प्रत्येक शॉट्सवेळी पहिल्या दोन स्थानांमध्ये होती. सहाव्या शॉट्सअखेर तिने क्विआनशुनला ३०-२९ असे मागे टाकले. मात्र, अखेरच्या शॉट्अखेर युजिए ३४, तर सिमरनप्रीत ३३ गुणांवर राहिली. या एका गुणाच्या निर्णायक आघाडीमुळे, युजिएचे सुवर्ण, तर सिमरनप्रीतचे रौप्य निश्चित झाले. क्विआनशुन ब्राँझपदक विजेती ठरली.
हेही वाचा :
पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची
श्रेयस, ईशानची वापसी