१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

Chinese Chutou dog story

घटना आहे चीनमधली. एका कुत्र्याच्या मृत्यूची. त्यावरून उसळलेल्या सार्वत्रिक संतापाची. हा असा तसा कुत्रा नव्हता, तर त्याचे सोशल मीडियावर पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ‘चुटौ’ या कुत्र्याची ही कहाणी आहे. चीनमधील या बॉर्डर कॉली जातीच्या कुत्र्याचे सोशल मीडियावर तब्बल १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. चुटौच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Chinese Chutou dog story)

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’नं यासंदर्भात बातमी दिली. त्यानुसार चुटौ हा चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर गुओ यांचा पाळीव कुत्रा होता. गुओ जिथे जिथे प्रवासाला जात, तिथे चुटौ त्यांच्यासोबत असायचा. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असत.

११ मे रोजी गुओ जॉर्जियामध्ये रोड ट्रिपवर गेले होते. त्या काळात चुटौ त्यांच्या आई-वडिलांकडे राहत होता. मात्र अचानक तो घराजवळून गायब झाला. नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात व्यक्ती त्याला मोटारसायकलवर घेऊन जात असल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच गुओ आपली ट्रिप अर्धवट सोडून तातडीने परतले आणि चुटौचा शोध सुरू केला.

काही दिवसांच्या शोधानंतर गुओ संशयित चोरट्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी आपला कुत्रा परत मिळवण्यासाठी पैसे देण्याची तयारीही दर्शवली. मात्र त्या चोरट्यानं दिलेल्या माहितीनंतर गुओ हादरून गेले. कारण चोरट्यानं चुटौला १८० युआनमध्ये — म्हणजे २,३०० रुपयांत एका रेस्टॉरंटला विकले. कुत्र्याच्या मांसाची विक्री करणारं ते रेस्टॉरंट होतं. (Chinese Chutou dog story)

“कुत्रा मरून गेला आहे. आता हा विषय इथेच संपवा.” असं चोरट्यानं सांगितलं. गुओ त्या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचले. त्यांनीही गुओच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यानंतर गुओ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, चुटौच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांचा संताप उफाळून आला. हजारो लोकांनी या घटनेचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

चुटौची ही कहाणी लाखो लोकांना अस्वस्थ करून गेली. प्राण्यांचे हक्क आणि त्यांची सुरक्षितता याबाबत पुन्हा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Chinese Chutou dog story)

Related posts

जगभरात विकल्या जाणा-या चारपैकी एक कार इलेक्ट्रिक

गीर अभयारण्यातील आठ सिंहांचा मृत्यू

ब्रेन कॅन्सरच्या उपचारात नवी आशा