चेन्नई : आयपीएलच्या या मोसमामध्ये प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशा आम्ही अद्याप सोडलेल्या नाहीत. परंतु, तसे न घडल्यास पुढील मोसमासाठी योग्य संघबांधणी करणे महत्त्वाचे आहे, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नईला ९ विकेटनी दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तो बोलत होता. (Dhoni)
यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये रविवारी चेन्नईला सलग पाचवा, तर एकूण सहावा पराभव पत्करावा लागला. सध्या चेन्नईचा संघ गुणतक्त्यात तळाशी दहाव्या स्थानी असून त्यांच्या खात्यात केवळ ४ गुण आहेत. प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी चेन्नईला आता साखळी फेरीतील उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागणार आहेत. अशावेळी धोनीने मात्र आपण एकावेळी एकाच सामन्याचा विचार करणार असल्याचे सांगितले. (Dhoni)
“आम्ही उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असले, तरी सध्या आम्ही केवळ पुढील सामन्याचा विचार करणार आहोत. आम्हाला सर्व सामने जिंकता आले नाहीत, तर पुढील मोसमासाठी योग्य संघबांधणी करणे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल. संघामध्ये सतत खूप सारे खेळाडू बदलण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे, खेळाडूंच्या पाठिशी उभे राहणे आणि त्यांना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करण्याचा फायदा आम्हाला पुढील मोसमात होऊ शकतो,” असे धोनी म्हणाला. (Dhoni)
चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनीही मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना आम्हाला वास्तवाची जाणीव असल्याचे सांगितले. स्पर्धेमध्ये आम्ही सध्या कुठे आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला यशस्वी व्हायचे असल्यास चांगले क्रिकेट खेळावे लागेल, हे आम्हाला समजते. आमच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या संधींचा सर्वतोपरी लाभ घेण्याचा प्रयत्न आम्ही करू,” असे फ्लेमिंग यांनी नमूद केले. (Dhoni)
सीएसकेला असे कधीच पाहिले नव्हते
चेन्नईच्या यंदाच्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने चेन्नईचे व्यवस्थापन व प्रशिक्षकांवर नाराजी व्यक्त केली आहे. “चेन्नई संघाने या वर्षीच्या लिलावापासूनच चांगली कामगिरी केलेली नाही. अनेक गुणवान युवा खेळाडू लिलावामध्ये उपलब्ध होते. तुम्ही लिलावामध्ये इतके सारे पैसे घेऊन जाता, परंतु योग्य खेळाडूंना करारबद्ध करत नाही. अन्य संघांनी आक्रमक खेळणाऱ्या खेळाडूंना आपल्याकडे घेतले. चेन्नईची मात्र अशी अवस्था यापूर्वी कधीच नव्हती, असे रैना म्हणाला.
हेही वाचा :
श्रेयस, ईशानची वापसी
अभिषेक नायर पुन्हा ‘केकेआर’मध्ये दाखल