मुंबई : प्रतिनिधी : सरकारकडे पैसा नाही त्यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत. आहे त्या योजनांना निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी माध्यमाशी बोलताना सतेज पाटील यांनी लाडक्या बहिणींचे अनुदान कमी करण्याचे काम सरकारने केले आहे. केवायसीची अट लादून लाडक्या बहिणींची संख्या कमी केली जात आहे. याआधी केवायसीची अट नव्हती का?” असा सवाल करत आमदार पाटील म्हणाले की, सरकारकडे विविध योजनांसाठी द्यायला पैसा नाही, ही खरी स्थिती आहे. त्यामुळे अनुदान कमी करण्याचा प्रकार सुरु आहे. अवकाळीने अनेक भागांना दणका दिला आहे, त्यासाठीचे कोणतेही नियोजन महायुती सरकारकडे नाही, असाही आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला. (Satej Patil alleges that the financial condition of the state government is bad)
सरकार शेतकऱ्यांबद्दल सकरात्मक नाही
सतेज पाटील म्हणाले, कांद्याचे भाव कमी झाले आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. अखेर उच्च न्यायालयाने कापूस आणि सोयाबीन खरेदीची केंद्र वाढवा असा निर्णय दिला, मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत सकारात्मक नाही, हे वारंवार दिसत आहे, आता अवकाळीचा दणका विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागाला बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना काही प्राथमिक मदत केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मात्र सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का?” असा प्रश्न सरकारचे आतापर्यंतचे निर्णय पाहिल्यावर पडतो, असे ते म्हणाले. (Satej Patil alleges that the financial condition of the state government is bad)
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना बंद
निवडणुकीसाठी काही योजना आणायच्या आणि मतदानाचा तीर्थप्रसाद मिळाला की त्या योजना बंद करायच्या हे या सरकारने आणलेले नवे धोरण आहे, असा टोला लगावत सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आता बंद करण्यात आली आहे. ही योजना निवडणुकीपूर्वी होती, आता निवडणुका संपलेल्या आहेत. बहुमताचा तीर्थप्रसाद मिळाला आहे, त्यामुळे आता त्या योजनेची गरज नाही. आता लोकांनी स्वतःच्या पैशाने देवदर्शनाला जायचे. सरकार त्यांना पाठवणार नाही, हा निवडणुकीसाठीचा जुमला होता.
काँग्रेसच्या काळात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अशा विविध योजना काँग्रेसच्या काळात सुरु झाल्या आणि त्या अखंड सुरु राहिल्या आहेत. मात्र आता भाजपने फक्त निवडणुकीसाठी काही योजना आणायच्या आणि निवडणुका झाल्या की त्या योजना बंद करायच्या हे नवे कार्ड भाजप खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला.
कंत्राटदारांसाठी एक लाख पाच कोटींचा शक्तीपीठ महामार्ग
समृद्धी महामार्गावर कोणत्याही सुविधा नाही, अपघात होत आहेत, मात्र सरकार सातत्याने सांगत आहे की, आम्ही सर्व सोयीसुविधा पुरवू मात्र त्यांच्याकडून त्याची पूर्तता होत नाही. एकीकडे समृद्धी महामार्ग अडचणीत आहे, दुसरीकडे सरकार ८६ हजार कोटींचे बजेट असलेला शक्तीपीठ महामार्ग आता १ लाख ५ हजार कोटींवर गेला तरी, सरकार करु पाहात आहे. गरज नसलेला हा मार्ग आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, काँग्रेसने या महामार्गाला विरोध केला आहे.. जिथे रस्ते चांगले नाहीत, अशा गाव, खेड्यांना हे एक लाख कोटी रुपये खर्च करा. फक्त सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी हा एक लाख कोटी रुपयांचा महामार्ग बांधला जात आहे, असा आरोप करत सतेज पाटील म्हणाले की, तुमच्या लाडक्या कंत्राटदारांना शहरातील कामे द्या. या राज्यातील खड्डे दुरुस्त करा, रस्ते चकाचक करा, शेतकऱ्यांना फक्त चांगल्या सोयी सुविधा द्या, अशी आमची मागणी आहे. (Satej Patil alleges that the financial condition of the state government is bad)