Raj Thackeray in the Mahavikas Aghadi : राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार?

Raj Thackeray in the Mahavikas Aghadi

राज ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ताकद नगण्य असली तरी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय चर्चेचा बराचसा अवकाश ते व्यापून राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का? गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे. परंतु सोमवारी सकाळी संजय राऊत यांच्या विधानामुळे यासंदर्भातलं वातावरण अचानक तापलं. (Raj Thackeray in the Mahavikas Aghadi)

राज्याच्या राजकारणात सध्या एका प्रश्नाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत येणार का? गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक घडामोडी, नेत्यांची वक्तव्ये आणि वाढत्या भेटीगाठींमुळे ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

खरं तर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळिकीतेमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, दोन्ही ठाकरे बंधू अनेकदा एकत्र दिसले आहेत. ठाण्यात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेविरोधात एकत्रित मोर्चा काढला होता. या एकत्र येण्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केवळ मुंबई महानगरपालिकाच नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raj Thackeray in the Mahavikas Aghadi)

या सगळ्या चर्चांना अधिक बळ दिले ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबत येण्याची इच्छा असल्याचे सूचक विधान केले. इतकेच नव्हे, तर राज ठाकरे स्वतः काँग्रेसलाही सोबत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती राऊत यांनी दिली. मात्र, महाविकास आघाडीत कोणताही नवीन पक्ष सामील करायचा झाल्यास, सर्व घटक पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु, मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसची भूमिका मात्र नकारात्मक दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीला नव्या मित्रपक्षाची गरज नसल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. इंडिया आघाडीतील घटक नसलेल्या कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याची काँग्रेसची अट आहे. ज्यामुळे मनसेचा मार्ग कठीण झाल्याचे बोलले जात आहे. (Raj Thackeray in the Mahavikas Aghadi)

या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षाच्या आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. विशेष म्हणजे, निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मनसे, शिवसेनेचा ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यासोबत काँग्रेसही असणार आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या शिष्टमंडळाचा महाविकास आघाडीतील युतीशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राजकीय अभ्यासकांच्या मते, राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात आपली परप्रांतीय आणि मुस्लिमविरोधी भूमिका काही प्रमाणात मवाळ केली आहे. यामुळे काँग्रेससारख्या पक्षांना त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करणे शक्य होऊ शकते. मात्र, मनसेचे भाजपसोबतचे जुने संबंध आणि हिंदुत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीतील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना कितपत मान्य होईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर मनसे महाविकास आघाडीत सामील झाली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. महाविकास आघाडीला याचा फायदा होईल की अंतर्गत मतभेद वाढतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशासमोर काही अडचणीचे मुद्दे आहेत.

त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांची परप्रांतियांच्या विरोधातील भूमिका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनेपासूनची परप्रांतियांच्या विरोधातील भूमिका राष्ट्रीय पक्षांसाठी अडचणीची ठरली आहे. त्यामुळे भाजपनेही त्यांचा वापर करून घेताना त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवल्याचा देखावा केला आहे. आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर तीच अडचण आहे. महाराष्ट्रात काँग्रेस राज ठाकरेंसोबत आघाडी करतेय ही चर्चासुद्धा बिहारमध्ये महागठबंधनसाठी त्रासदायक ठरू शकते. (Raj Thackeray in the Mahavikas Aghadi)

दुसरा मुद्दा आहे तो राज ठाकरे यांच्या मुस्लिमविरोधी भूमिकेचा. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे, सीएए एनआरसी वगैरे मुद्यांवरून वेळोवेळी मुस्लिमविरोधी भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेनेनेही मुस्लिमविरोधी भूमिका घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने त्यापासून फारकत घेतली आहे. राज ठाकरे यांनी अद्याप त्याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या त्या भूमिकेसह काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांना स्वीकारण्याची शक्यता नाही.

तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे मनसे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मित्रपक्ष असेल. मनसेसोबत जो काही व्यवहार असेल तो उद्धव ठाकरे यांनी करावा. काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी थेट संबंध ठेवू नयेत, असाही पर्याय असू शकतो. तो उभयपक्षी मान्य होईल का, हाही खरा प्रश्न आहे.

त्यामुळे संदीप देशपांडे किंवा हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही. राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची काय भूमिका राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांची भूमिकाही त्यादृष्टिने महत्त्वाची ठरणार आहे.

थोडक्यात सांगायचं झाल्यास, राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाची चर्चा ही केवळ ठाकरे बंधूंमधील सलोख्यापुरती मर्यादित नाही. तो सलोखा झालेला आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात केवळ दोन भावांमधील किंवा दोन पक्षांमधील सलोखा पुरेसा ठरणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या निवडणुकांच्यादृष्टिने त्याचे अधिक महत्त्व आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरच या प्रश्नाचे अंतिम उत्तर अवलंबून असेल.

सर्वांना कुतूहल आहे, ते मुंबई महापालिकेतील आघाडीचेच. इथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु महाविकास आघाडीचे काय होईल, याबाबत संभ्रमावस्था आहे. उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांची सोबत हवी आहे. त्यासाठी ते महाविकास आघाडीची साथ सोडायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. अशा परिस्थितीत राजकीय चित्र काय राहणार, हा प्रश्न आहे. केवळ तीस टक्के मराठी मतांच्या जोरावर ठाकरे बंधू किती यश मिळवतील. राज ठाकरे सोबत असताना मुंबईतले मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांना किती साथ देतील, याचा अंदाज येत नाही. गेल्या काही काळामध्ये हिंदुत्ववादी नेत्यांकडून मुस्लिमांवर हल्ले होत असताना मुस्लिमांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अलीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लिमांना टार्गेट करणा-या हिंदू नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. अशा परिस्थितीत एमआयएमने जर मुस्लिम मतांमधला हिस्सा बळकावला तर त्याचा ठाकरे बंधूंच्या युतीला तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला किती फटका बसेल, हे सांगता येत नाही.

या सगळ्या परिस्थितीचा विचार करता, मनसे आणि महाविकास आघाडी यांच्या समीकरणाचे उत्तर मिळत नाही. बिहार विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत तरी त्यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही.

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार