Pune Graduate Election : लाडांचे कुंडल डावीकडून उजवीकडे

Pune Graduate Election

आजोबांच्या विचारसरणीला नातवाची श्रद्धांजली

मनांत माझ्या गुणगुणतें हें रसिका कोणी कांहीं ।

कृष्णाकांठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं ॥

सांगली जिल्ह्यातले कुंडल प्रत्यक्षात कृष्णाकाठीं नाही. पण गोविंदाग्रजांनी या कवितेच्या माध्यमातून जणू कुंडलची प्रतिष्ठापना कृष्णेकाठी केली आहे. शंभरहून अधिक वर्षांपूर्वी त्यांनी कुंडल पहिले उरले नसल्याचे लिहिले होते. बदलते राजकारण पाहिले तर पाऊणशे वर्षांहून अधिक काळ डावीकडे असलेले कुंडल आज उजवीकडे झुकले आहे. क्रांतिअग्रणी जीडीबापू लाड यांचे नातू शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कुंडलच्या राजकीय इतिहासाला कलाटणी दिली आहे. याच विषयाच्या संदर्भाने आपण बोलणार आहोत.

विजय चोरमारे

गोविंदाग्रजांच्या कृष्णाकाठी कुंडल कवितेमध्ये पुढील ओळी आहेत-

रायगडावर खडे पसरले शिवरायाच्या पायीं ।

हिरेमाणकें तीं; आम्हांला दुसरी दौलत नाहीं ॥

शिवरायांच्या पायी असलेले खडे हीच आमची दौलत, तेच आमचे हिरेमाणके असे या ओळींमध्ये म्हटले आहे. त्याच प्रमाणे कुंडलच्या भूमीची ओळख देशपातळीवर क्रांतिभूमी आहे. क्रांतिअग्रणी जीडीबापू लाड यांचा क्रांतिचा विचार आजवर कुंडलच्या भूमीने जपला. वाढवला. जीडीबापूंचे पुत्र आमदार अरुण लाड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून बदलत्या काळात मध्यवर्ती धारेतल्या परंतु पुरोगामी विचारांच्या पक्षाची पाठराखण केली. जीडीबापूंच्या तिस-या पिढीने मात्र थेट भाजपमध्ये प्रवेश करून कुंडलच्या भूमीतला लाल रंग भगवा करून टाकला आहे. क्रांतिअग्रणींच्या वारसांची एवढी काय मजबुरी होती, की त्यांना थेट भाजपच्या वळचणीला जावे लागले. विचारांशी द्रोह करून जातीयवाद्यांच्या छावणीत जावे लागले. (Pune Graduate Election)

एरव्ही शरद लाड यांची स्वतंत्रपणे दखल घेण्याची आवश्यकता नव्हती. किंबहुना त्यांची दखल घ्यावी असे त्यांचे राजकीय कर्तृत्वसुद्धा नाही. परंतु जीडीबापूंचे वारस म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

शरद लाड यांनी घेतलेली भूमिका ही आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेऊन घेतल्याची चर्चा आहे. परंतु त्यांना अद्याप उमेदवारीची हमी मिळालेली नाही. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्याशी आतापर्यंत भेटही झालेली नाही.

पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या अरुण लाड हे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय़ घेतला. अरुण लाड यांनी आपल्यासोबत यावे, असा अजितदादांचा आग्रह होता, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचे भाजपमध्ये जाण्यासाठी ब-याच काळापासून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. माढ्याचे बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे हे अरुण लाड यांचे व्याही. सोलापूर जिल्ह्यातून त्यांची ताकद मिळाल्यामुळे गतवेळी अरुण लाड निवडून आल्याचे मानले जाते. शरद लाड यांनाही आपल्या सासुरवाडीकडून गेल्यावेळेसारख्याच समर्थनाची अपेक्षा असल्यामुळे ते पदवीधरच्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. (Pune Graduate Election)

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही पुणे पदवीधर आणि अरुण लाड यांच्याशी वेगळे कनेक्शन आहे. ते कसे बघा.

पुणे पदवीधर मतदार संघावर एकेकाळी भाजपचे वर्चस्व होते. १९९० ते २००२ पर्यंत या मतदारसंघावर प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून भाजपचे वर्चस्व होते. २००२ साली जनता दलाच्या शरद पाटील यांनी भाजपकडून मतदारसंघ खेचून घेतला. २००८ साली चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व मिळवले. २०१४च्या निवडणुकीत चंद्रकांतदादा निवडून आले, त्याला अरुण लाड कारणीभूत होते. यावेळी सारंग श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. अरुण लाड यांनी बंडखोरी केल्यामुळे मतविभागणी होऊन चंद्रकांतदादा पाटील निवडून आले होते. २०१४ला भाजपची सत्ता आली तेव्हा चंद्रकांतदादा पाटील आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रिमडळात संधी मिळाली आणि नंतर ते दुस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून पुढे आले. प्रदेशाध्यक्ष बनले. अरुण लाड यांची उमेदवारी त्याअर्थाने चंद्रकांतदादांच्या पथ्यावर पडली होती. २०२०च्या निवडणुकीत अरुण लाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. एकत्रित राष्ट्रवादीची ताकद, सोलापूरमधून शिंदे पाहुण्यांची झालेली मदत यामुळे अरुण लाड यांना भाजपवर सहज मात करता आली. आता या जागेवरून विधिमंडळात जाण्यासाठी शरद लाड यांनी कंबर कसली आहे. माढ्याच्या शिंदेंमार्फत त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू होती. पक्षप्रवेश करा, उमेदवारीचे नंतर बघू असा आदेश आल्यामुळे शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भिलवडी वांगी मतदारसंघातून १९९०च्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढणा-या पतंगराव कदम यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढणा-या जीडी बापू लाड यांचा १४ हजार ९२७ मतांनी पराभव केला होता. लाड-कदम यांच्यातला संघर्ष तेव्हापासूनचा आहे. (Pune Graduate Election)

पतंगराव कदम यांच्या कन्या भारती यांचा विवाह कुंडलच्याच महेंद्र लाड यांच्याशी झाला. त्यामागेही पतंगरावांची राजकीय गणिते होती. पतंगरावांच्या या जावयांचा जिल्हा परिषद निवडणुकीत शरद लाड यांनी पराभव केला होता. मात्र अलीकडच्या काळात संघर्ष कमी झाला होता. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांना अरुण लाड यांनी सहकार्य केले होते.

तर शरद लाड यांनी आपला डाव्या विचारांचा वारसा गुंडाळून ठेवून थेट उजव्या छावणीत प्रवेश करण्यामागे फक्त पदवीधरची निवडणूक हे एकमेव कारण आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो.

कुंडलचा क्रांती सहकारी साखर कारखाना हा लाड यांचा कारखाना. शरद लाड या कारखान्याचे सध्या अध्यक्ष आहेत. कारखाना उत्तम चालला आहे, परंतु सरकारी यंत्रणांनी वेळोवेळी तपासण्या करून लाड कुटुंबीयांवर दबाव कायम ठेवला आहे. अरुण लाड तो दबाव सहन करून वाट काढत होते. परंतु शरद लाड यांना संघर्षाची सवय नसल्यामुळे ते पटकन शरण गेले.

पदवीधर मतदार संघाची परंपरा पाहता भाजपला हा मतदार संघ हवाच आहे. शरद लाड यांचा भाजप प्रवेश झाला, त्याच्या आधीपासून भाजपनेही मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे. सांगलीतून दीपक शिंदे म्हैसाळकर आणि मकरंद देशपांडे यांची नावे त्यासाठी चर्चेत होती. मकरंद देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. खरेतर २००८ साली त्यांनाच उमेदवारी मिळणार होती. परंतु त्या काळात जेम्स लेनचे प्रकरण घडले होते.  तेव्हाच्या वातावरणामुळे ब्राह्मण उमेदवार देणे भाजपला जोखमीचे वाटले. त्यातून चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. तीन निवडणुकांनंतर पुन्हा मकरंद देशपांडे यांचे नाव चर्चेत आहे. यावेळीही पुन्हा ब्राह्मण की मराठा असा पेच आहेच. मकरंद देशपांडे यांना दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचा पर्याय होताच. त्यात शरद लाड यांचा प्रवेश झाला आहे. भाजपकडून अनेकजणांनी तयारी केली आहे. परंतु भाजपअंतर्गतही मोठी गटबाजी आहे. जिल्ह्यांचे वाद आहेत.

शरद लाड यांना अद्याप उमेदवारीचा शब्द दिला नसला तरी ते प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे शरद लाड यांना उमेदवारी दिली जाते, की भाजपच्या अन्य उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. आणि २०१९ला विश्वजित कदम यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तयारी करायला सांगितले जाते, याचीही उत्कंठा आहे.

बाकी काहीही असले तरी कम्युनिस्ट जीडीबापू लाड यांच्या नातवाने भाजपमध्ये प्रवेश करून आजोबांच्या विचारसरणीला श्रद्धांजली वाहिली, याचीच चर्चा जोरात आहे.

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार