जमीर काझी : मुंबई : केंद्राचा मुंबईसह एमएमआर तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसाला सजग राहण्याचा सल्लाही देताना त्यांनी ‘मराठी माणसा, आता तरी जागा हो!’, असे आवाहन केले आहे.
आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात सोमवारी क्वांटम तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीवर बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अचानक आयआयटीच्या नावाचा मुद्दा उपस्थित करत “आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले आणि त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबाबतही माझ्या याच भावना आहेत.” हे विधान करताना ते हसलेही, पण सभागृहात उपस्थित अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. (Plan to connect Mumbai to Gujarat)
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला राज ठाकरेंचा विरोध
जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध करताना राज ठाकरे म्हणाले की, “जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. ते जम्मूचे खासदार आहेत. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे हे ओळखून ते जाणीवपूर्वक असे बोलत आहेत आणि शाबासकी मिळवत आहेत. ‘मुंबई’ हे नाव त्यांना खटकते, कारण हे नाव आपल्या मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे. ही मराठी माणसाची मुंबई आहे, ती महाराष्ट्रातून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आखला जात आहे.
मुंबई नको बॉम्बे हवे आहे
राज ठाकरे यांनी चंदीगड प्रकरणाशी याची तुलना करताना म्हटले की, “आज केंद्राने चंदीगड पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय विरोध झाल्याने तात्पुरती माघार घेतली, पण ती कायमची नाही. अगदी तसाच डाव मुंबईबाबत १०० टक्के शिजत आहे. ‘मुंबई’ नको, ‘बॉम्बे’च हवे, या मागे हळूहळू शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. आधी मुंबई, नंतर संपूर्ण एमएमआर गुजरातला जोडला जाणार आहे. केंद्रीय हस्तक उद्योगपतींनी इथले बंदर, जमीन, प्रकल्प कसे गिळंकृत केले आहेत हे तुम्ही रोज पाहात आहात. १९६० च्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबई महाराष्ट्राला मिळाली, तेव्हापासून गुजरातकडून मुंबईवर दावा सोडलेला नाही”, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘मराठी माणसा, आता तरी जागा हो!’, असे आवाहन केले आहे. (Plan to connect Mumbai to Gujarat)
मुंबईचे महाराष्ट्राशी नाते भाजपला खटकते
याबाबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले की, “केंद्रातील भाजपा सरकार आणि त्यांचे मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचत आहेत. जितेंद्र सिंह यांचे ‘बॉम्बे’चे समर्थन करणारे वक्तव्य हे त्यांच्या मनात दडलेल्या भावनेचे प्रकटन आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्या लढ्याची आणि बलिदानाची जाणीव भाजपाला नाही. मुंबईचे नाव, मुंबईची ओळख आणि मुंबईचे महाराष्ट्राशी नाते हे भाजपाला खटकते. मग ते प्रोजेक्ट्स गुजरातला हलवणे असो, की आता अशी वक्तव्ये करणे असो, यात एक सातत्य आहे. काँग्रेस पक्ष मुंबईच्या अस्मितेच्या रक्षणासाठी नेहमीच रस्त्यावर उतरला आहे आणि पुन्हा उतरेल”, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचीही टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले म्हणाले की, “त्यांचे वक्तव्य हे केंद्र सरकारच्या मनोवृत्तीचे दर्शन आहे. मुंबईला ‘बॉम्बे’ परत हवे आहे, असे म्हणणारे हे सरकार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची स्वप्ने पाहात आहेत का? भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणे बंद करावे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, मराठी माणसाची राहील. मराठी अस्मितेशी कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही खपवून घेणार नाही”, असेही त्यांनी सांगितले. (Plan to connect Mumbai to Gujarat)
बॉम्बे ते मुंबई नामांतर भाजपामुळे
याबाबत भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरेंचे अलीकडचे राजकारण ‘फॅक्ट्स’वर नाही, तर केवळ ‘फ्रीस्टाईल आरोपां’वर आधारित आहे. खरं तर ‘बॉम्बे’चं अधिकृत नामांतर ‘मुंबई’ करण्याचा निर्णय शिवसेना–भाजपा सरकारने घेतला होता. त्याला केंद्राची मंजुरी मिळवून देण्याचे काम भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले होते. पण राज ठाकरे ते सोईस्कर विसरले असून उद्धव ठाकरेंप्रमाणे यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला लगावला आहे.