Municipal election : कोल्हापूर महानगरपालिकेत प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना

Municipal election

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दीर्घकाळ रखडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीची तयारी सुरू केली असून अ,ब,क वर्ग महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्यसरकारने जारी केली आहेत. त्यानुसार कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेत चार सदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. (Municipal election)

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात यापूर्वी एक सदस्यीय प्रभाग होते. २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणूकीत एक सदस्यीय प्रभाग निवडणूक झाली. २०२० मध्ये महानगरपालिकेची मुदत संपली. त्यानंतर आलेली कोरोना लाट आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा गाडा प्रशासक हाकत आहेत. महायुतीने २०१७ मध्ये मुंबई वगळता राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचनेद्वारे निवडणूक घेतली होती. २०२० नंतर महानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया तीन वेळा राबवण्यात आली. पहिल्यांदा एक सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना दोन वेळा राबवण्यात आली होती. पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक होऊ शकली नाही. (Municipal election)

आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेत चार सदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत दोन वर्षापूर्वी निर्मिती झाली असून इचलकरंजी शहराला पहिल्यांदाच महापौरपद मिळणार आहे. २०१७ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने झाली होती. या निवडणूकीत भाजप महायुतीने बाजी मारली होती. पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात यापूर्वी कधीच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक झालेली नाही. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे इच्छुक उमेदवार आणि पक्षांचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. (Municipal election)

२०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीत राज्यात महायुतीची सत्ता होती. तरीही काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी महानगरपालिकेवर आघाडीचा झेंडा फडकावला होता. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये दोन गट झाले आहेत. सद्यस्थितीत पूर्वी एकमेकाचे मित्र असणारे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणूकीत महायुतीतील पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यावर निवडणूकीची धुरा असेल. तर महाविकास आघाडीची धुरा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, शहराध्यक्ष रवीकिरण इंगवले, सुनील मोदी यांना सांभाळावी लागणार आहे.  (Municipal election)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर