जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. (Fadanvis praise Modi)
मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची संपूर्ण तपशीलवार माहिती देऊन देशातील विविध विकास योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासास गती मिळाल्याचे सांगून सरकारचे आभार मानले. ते म्हणाले,’ राज्यात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटींची कामे सुरू आहेत. एकाच वर्षात राज्यातील गरीब लाभार्थींकरिता ३० लाख घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. (Fadanvis praise Modi)
कोविडच्या काळापासून देशातील ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले, १२कोटी शौचालये झाली, मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया अंतर्गत अनुसूचित जातिजमातींच्या लाभार्थींना १४ हजार ७०० कोटींचे कर्ज देऊन आत्मनिर्भरतेचा आधार दिल्यामुळे या वर्गाचे जीवनमान उंचावले आहे. मोदी सरकारच्या काळात ५५ कोटी जनधन खाती उघडली गेली. आयुष्मान भारत योजनेत ७७ कोटी खाती नोंदविली गेली असून यातून कोट्यवधी गरीबांना मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत.
समाजातील वंचित लोकांना थेट लाभ दिल्यामुळेच २५ कोटी लोकसंख्या गरीबी रेषेच्यावर आली. गेल्या दहा वर्षांत शेती क्षेत्रात पाच पटींनी वाढ झाली. पीएम किसान योजनेअंतर्गत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३.७ लाख कोटी रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. सौर पंपांची संख्या १० लाखांच्या वर गेली असून एकट्या महाराष्ट्रात त्यापैकी पाच लाख पंप आहेत. सहकार क्षेत्रात नवे धोरण आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला गेल्या 50 वर्षांत झाली नाही एवढी मदत मोदी सरकारने केली.लखपती दीदी योजनेतून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. २३ शहरांत मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले. मुद्रा योजनेचा दीड कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. (Fadanvis praise Modi)
मोदी सरकारने केलेल्या कामातून स्वाभिमानी भारताचे नवे रूप ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे जगाला दिसले असून ही कारवाई ऐतिहासिक म्हणून इतिहासात नोंदविली जाईल, संरक्षण उपकरणांत भारत स्वयंपूर्ण झाला असून आता आपण संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहोत. शस्त्रनिर्माणच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रामुळे निर्यात वाढ झाली असून ७४ टक्के एफडीआय झाली आहे.