मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षाच्या होतील. त्यांच्या पक्षात ७५ वर्षानंतर सत्तेत रहायचे नाही अशी एक पंरपरा आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा पंतप्रधानांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, या प्रश्नाचा धागा पकडत राऊत यांनी मोदी यांना टोला मारला. (Raut criticize Modi)
खासदार राऊत म्हणाले, जयंत पाटील हे प्रगल्भ विचार असलेले नेते आहेत. सात वर्षापेक्षा जास्त काळ प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याने त्यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या अशा भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. नवीन नेतृत्व निर्माण व्हावे यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वत:हून जागा खाली करत आहेत. जयंत पाटील यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ते केले पाहिजे असा टोलाही त्यांनी मारला. (Raut criticize Modi)
….तर पक्ष, घर फोडले नसते
पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सुप्रिया सुळे यांच्याकडे चौकशी केली. याला स्नेह किंवा आदर म्हणत नाहीत तर तो एका शिष्टाचार आहे असे म्हणत खासदार राऊत यांनी, पवारांविषयी एवढाच आदरभाव असता तर ज्या पवारांनी मोदींना प्रतिकूल परिस्थितीत मदत केली त्यांचा पक्ष, घर अशा पद्धतीने फोडले नसते. मोदी, शहा जे दाखवतात ते ढोंग असून एक पब्लिसिटी स्टंट आहे. (Raut criticize Modi)
अजित पवारांनाही राऊत यांनी सुनावले
नुसते आंदोलन करुन काही होत नाही, सत्तेत राहून लोकांची कामे करावी लागतात, असे विधान अजित पवार यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांची आंदोलनावरची भूमिका लोकशाहीला छेद देणारी आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षालाही स्थान आहे. विरोधी पक्षाने आंदोलने केली नाही तर सत्ताधारी माजतील, राज्य, देश लुटतील, महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर डाके टाकतील अशी टीकाही राऊत यांनी केली. शिवसेना हा पक्ष आंदोलनातून उभा राहिला. शरद पवार यांनी आपला पक्ष आंदोलनातून उभा केला होता याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. (Raut criticize Modi)