कोल्हापूरात महायुतीच्या विरोधात रस्त्यांवर उतरला जनसागर

Massive protest march in Kolhapur against the 'Mahayuti'

कोल्हापूर : प्रतिनिधी : सभासदांच्या मतांचा अवमान करुन बॅक डोअर एंट्रीद्वारे गोकुळवर कब्जा करणाऱ्या भाजप महायुती शक्तीच्या चार शासननियुक्त सभासदांना मतदानाच्या देण्याच्या अधिकाराच्या विरोधात आज कोल्हापूरात विशाल जनसमुदाय रस्त्यांवर उतरला. सरकारच्या निर्णयाच्या निषेध करत दूध उत्पादकांनी दिलेला कौल सरकार डावलत आहे असा आरोप केला. गोकुळमध्ये सरकारने हुकुमशाही निर्णय अंमलात आणण्याचा प्रयत्न केल्यास २०२९ च्या निवडणुकीत जनता महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही मोर्चाच्यावतीने देण्यात आला. (Massive protest march in Kolhapur against the ‘Mahayuti’)

शासनियुक्त चार संचालकांना मतदानाच्या अधिकाऱ्यांच्याविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने संघर्ष मोर्चा काढण्याचे आवाहन कोल्हापुरातील जनतेला केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. मोर्चाला कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, धारशिव, ठाणे, पुणे जिल्ह्यासह सीमाभागातील शेतकरी आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दसरा चौकात सकाळी आठ वाजल्यापासून दूध उत्पादक शेतकरी जमू लागले. त्यामध्ये ज्येष्ठ शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी, सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणाईंची संख्या लक्षणीय होती. इंजिनिअरिंग, डॉक्टरेट क्षेत्रातील लोक सहभागी होते. कोल्हापूर शहरातील पेठापेठातील नागरिकांसह उच्चभ्रू वस्तीतील लोक सहभागी झाले होते. (Massive protest march in Kolhapur against the ‘Mahayuti’)

मोर्चात २५ फूट उंचीची पायतानाची प्रतिकृती

सरकारचा निषेध करण्यासाठी २५ फूट उंचीची कोल्हापूर पायतानाची प्रतिकृती आणण्यात आली होती. तर लोकशाहीला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस फाशी देत आहेत असा प्रतिकात्मक देखावाही मांडला होता. नांगरधारी बळीराजाची प्रतिमा उठून दिसत होती. दूध उत्पादकांनी म्हशीही मोर्चात आणल्या होत्या. ‘एका म्हशीच्या गळ्यात तर मलाही स्वीकृत संचालक करा’ असा लिहलेला फलक गळ्यात बांधला होता. अनेक शेतकरी आसूड ओढत होते.

गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा…..

‘गोकुळ आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा’, ‘कोल्हापूरची संस्था गुजरातच्या दारी बांधू नका’, ‘कोल्हापूरची अस्मिता, गोकुळ वाचवा’, अशा घोषणा देण्यात आल्या. शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्यातील कवनांनी सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातून विराट मोर्चास सुरूवात झाली. मोर्चाचे पहिले टोक जिल्हाधिकारी कार्यालय तर शेवटचे टोक दसरा चौक होते. मोर्चात शासनाचा निषेध करण्यासाठी अनेक काळे झेंडे फडकावले. आमदार सतेज पाटील काळा शर्ट परिधान करुन शासनाचा निषेध करत आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सत्यजीत पाटील, ऋतुराज पाटील, राजीव आवळे मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. खासदार शाहू छत्रपती, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार जयंत आसगांवकर, शिवसेनेचे संजय पवार, युथ आयकॉन विवेकानंद पाटील यांची भाषणात महायुती सरकारवर निशाणा साधला.

पोराबाळांना नव्हे, सामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार

आमदार सतेज पाटील यांनी भाषणात महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला. गोकुळवर प्रशासक नियुक्ती, गोकुळवर स्वीकृत संचालक नियुक्ती, जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचे अध्यादेश काढताना सरकारने स्वत:च्या सोयीचे अध्यादेश काढले याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले,  गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पायाला भिंगऱ्या लावल्या. मी पोरा बाळांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला गोकुळमध्ये निवडून आणण्यासाठी प्रचार केला.  गोकुळ अमुलच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न उधळून लावा या आमच्या प्रचाराला सभासदांनी कौल दिला. सभासदांनी १३ जागा आम्हाला देऊन कौल दिला. गोकुळ चेअरमनची निवडणूक साध्या बहुमताने होणार असताना कोरमचा मुददा काढून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया तहकूब केली. त्याविरोधात आमची न्यायालयीन लढाई सुरू असून रस्त्यांवरची लढाई सुरू ठेवली आहे असे ते म्हणाले. समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने महायुतीने गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या सभेला महायुतीच्या संचालकांना उपस्थित ठेवावे असे आवाहन केले आहे. (Massive protest march in Kolhapur against the ‘Mahayuti’)

Related posts

हायकोर्टाकडून गोकुळमधील शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मंजूर  

फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर गोकुळमध्ये बेकायदेशीर संचालक नेमले नसते

शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार : आमदार कौस्तुभ गावडे