कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ जागा जिंकून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकावला. भाजपने २६, शिवसेनेने १५ तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या. काँग्रेस पक्ष महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी ३४ जागा जिंकल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला. या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आप या पक्षांचा धुव्वा उडाला.
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवला. त्यांना अपक्ष उमेदवार विजय साळोखे सरदार यांनी कडवी झुंज दिली. काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकरही विजयी झाले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. सतेज पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेऊन विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर माधुरी गवंडी, काँग्रेसच्या माजी महापौर स्वाती यवलुजे आणि अदिल फरास विजयी झाले. माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजीत जाधव यांनी विजय मिळवत घराण्याची महानगरपालिकेत निवडून जाण्याची परंपरा कायम राखली आहे. (Mahayuti in power in the municipal corporation)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने ६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना विरुद्ध्द भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत आहे. या निवडणुकीत विधान परिषदेतेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक या सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. (Mahayuti in power in the municipal corporation)
प्रभाग एक मध्ये काँग्रेसच भारी.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भाजपने मोठे आव्हान दिले असून प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. माजी नगरसेवक सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, सचिन चौगुले, रुपाली पोवार यांनी विजय संपादन केल्याने आमदार सतेज पाटील यांनी बावड्याचा गड राखला.
प्रभाग २ मध्ये शिवसेनेचा बाण सुसाट
प्रभाग दोन मध्ये शिवसेनेचा बाण सुसाट सुटला आहे. या प्रभागात चारही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात काँग्रेसला डोके वर काढून दिले नाही. वैभव माने, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव आणि स्वरुप कदम विजयी झाले आहेत. माजी महापौर सुनील कदम यांचे स्वरुप कदम हे चिरंजीव आहेत.
प्रभाग ३ मध्ये भाजपचा चौकार
प्रभाग तीन मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक आणि विजेंद्र माने विजयी झाल्याने भाजपने विजयाचा चौकार ठोकला. या प्रभागात खासदार धनंजय महाडिक यांची मोठी ताकद आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाल्याने चौकार ठोकता आला. (Congress and BJP’s winning streak of four)
प्रभाग ४ मध्ये राजेश लाटकरांसह काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
प्रभाग चार मध्ये माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण ते राजेश क्षीरसागर यांच्याकडून पराभूत झाले होते. या प्रभागात स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे हे उमेदवार विजयी झाले आहेत. लाटकर यांनी प्रभाग चारमध्ये काँग्रेसचा गड राखला आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये सतेज पाटील, मालोजीराजेंचे वर्चस्व
उच्चभ्रू वस्ती असलेल्या नागाळा पार्क आणि कसबा बावडा असा मिळून तयार झालेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. सतेज पाटील आणि मालोजीराजे यांच्या एकत्रित प्रयत्नाने काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. विनायक कारंडे, सरोज सरनाईक, माजी महापौर स्वाती यवलुजे आणि माजी उप महापौर अर्जन माने विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी महापौर गवंडी विजयी
प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महापौर माधवी प्रकाश गवंडी या विजय झाली. तर भाजपच्या दीपा काटकर यांनी बाजी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या शिला अशोक सोनुले विजयी झाल्या असून काँग्रेसचे एकमेवर उमेदवार माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव विजयी झाले आहेत. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे पराभूत झाले.
प्रभाग ७ मध्ये आमदार क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज विजयी
प्रभाग क्रमांक सातकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय संपादन केला. क्षीरसागर यांची अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांच्याशी लढत होती. या प्रभागात भाजपचे विशाल शिराळे, दीपा ठाणेकर, शिवसेनेच्या मंगल साळोखे हे उमेदवार विजयी झाल्या. चारही जागा युतीने जिंकत महानगरपालिकेत बळ वाढवले. आमदार क्षीरसागर यांचे होम पीच असल्याने या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. ऋतुराज क्षीरसागर यांना अपक्ष उमेदवार विजय साळोखे सरदार यांनी कडी झुंज दिली. त्यांनी सहा हजारहून अधिक मते घेतली.
प्रभाग ८ मध्ये काँग्रेस वरचढ
प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेस तीन जागा जिंकून या जागी वरचढ ठरली आहे. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या ऋग्वेदा माने, प्रशांत खेडकर आणि माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी विजय मिळवला. बोंद्रे यांनी त्यांचे आत्ये भाऊ माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज खराडे यांचा पराभव केला.
प्रभाग ९ मध्ये शारंगधर देशमुखांसह भाजप शिवसेनेची बाजी
प्रभाग नऊ क्रमांक मध्य भाजप शिवसेनेने बाजी मारली आहे. भाजपचे विजय रिंकू देसाई, भाजपच्या माधवी पाटील, शिवसेनेच्या संगीत सावंत, आणि शाररंगधर देशमुख विजयी झाले. एकेकाळचे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करत विजय संपादन केला. देशमुख आणि माजी नगरसेवक राहूल माने यांच्या काटाजोड लढतीत शारंगधर देशमुख यांनी तब्बल तीन हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला.
प्रभाग १० मध्ये जनसुराज्यने खाते खोलले
प्रभाग दहा मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने खाते खोलले. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या अक्षय जरग यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांचे बंधू राहूल इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक महेश सावंत यांचा पराभव केला. भाजपच्या अर्चना कोराणे, पूर्वा राणे, शिवसेना शिंदे गटाचे अजय इंगवले विजयी झाले. या प्रभागात माजी नगरसेवक दीपा मगदूम पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजीत विजयी
या प्रभागात भाजप शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी नकाते आणि निलांबरी साळोखे विजयी झाल्या. शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी बाजी मारली आहे. त्यांनी काँग्रेसच्या संदीप सरनाईक यांचा पराभव केला. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत चंद्रकात जाधव आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे सत्यजित जाधव हे चिरंजीव आहेत. काँग्रेसच्या माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी गड राखला आहे. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत.
प्रभाग १२ मध्ये माजी महापौर आजरेकरांचे पती विजयी
प्रभाग बारामधून काँग्रेस आणि महायुतीला समिश्र यश मिळाले आहे. या प्रभागात शिवसेनेचे अश्कीन आजरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अदिल फरास विजयी झाले आहेत. माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे अश्कीन आजरेकर हे पती आहेत. काँग्रेसच्या स्वालिया बागवान आणि अनुराधा मुळीक विजयी झाल्या आहेत. आजरेकर कुटुंबिय हे पूर्वीश्रमीचे सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन विजय संपादन केला. माजी नगरसेवक ईश्वर परमार यांना पराभव स्वीकारावा लागला.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये मतदारांनी महायुतीचे तिघे विजयी
या प्रभागात मतदारांनी समसमान कौल दिला आहे. या प्रभागात महिला गटात भाजपच्या माधुरी व्हटकर आणि रेखा उगवे विजयी झाल्या. अजित पवार गटाचे नियाज खान विजयी झाले. नियाज खान शिवसेना उद्धव ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसचे प्रविण सोनवणे एकमेव उमेदवार विजयी झाले.
प्रभाग क्रमांक १४ काँग्रेसचे तिघे विजयी
प्रभाग चौदामध्ये काँग्रेसचे विनायक फाळके, अमर समर्थ आणि दिलशाद मुल्ला विजयी झाल्या. तर भाजपच्या निलिमा पाटील विजयी झाल्या. विनायक फाळके यांनी माजी नगरसेवक अजित मोरे यांचा पराभव केला. तर अमर समर्थ यांनी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचा पराभव केला.
प्रभाग १५ मध्ये काँग्रेस ठाकरे गटाने बाजी
प्रभाग १५ मध्ये काँग्रेस ठाकरे गटाने बाजी मारली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मोहिते, रोहित कवाळे विजयी झाले. रोहित हे माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांच चिरंजीव आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खाते खोलले आहेत. माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे विजयी झाल्या. या प्रभागातून भाजपच्या सृष्टी जाधव विजयी झाल्या आहेत.
प्रभाग १६ मध्ये फिफ्टी फिफ्टी.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप आणि काँग्रेसला फिफ्टी फिफ्टी यश मिळाले आहे. काँग्रेस उमेदवार उमेश पवार, धनश्री कोरवी. भाजपचे उमेदवार पूजा पोवार, मुरलीधर जाधव विजयी झाले आहेत. मुरलीधर जाधव हे माजी नगरसेवक आहेत.
प्रभाग १७ मध्ये हाताला कौल
प्रभाग १७ मध्ये काँग्रेसच्या हाताला मतदारांनी कौल दिला आहे. अर्चना बिरांजे ,सचिन शेटे, शुभांगी पाटील, आणि प्रवीण केसरकर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रविण केसरकर हे माजी नगरसेवक असून सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
प्रभाग १८ मध्ये महायुतीला तीन जागा
प्रभाग क्रमांक १८ मध्ये महायुतीने तीन जागा जिंकल्या. भाजपचे कौसर ईस्माईल बागवान, माजी नगरसेविका रुपाराणी निकम यांनी विजय संपादन केला. शिवसेना शिंदे गटाचे अभिजीत मोकाशी विजयी झाले. अरुणा गवळी या एकमेव काँग्रेसच्या उमेदवार या प्रभागात विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक १९ मध्ये २३ वर्षीय मानसी लोळगे विजयी
प्रभाग क्रमांक १९ मध्ये मतदारांनी काँग्रेस आणि महायुतीला समसमान वाटा दिला आहे. दुर्वास कदम आणि सुषमा जगर हे विजयी झाले. तर भाजपचे माजी नगरेवक विजयसिंह खाडे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मानसी लोळगे विजयी झाल्या. २३ वर्षीय मानसी लोळगे या वकील आहेत. त्यांचे वडील माजी नगरसेवक आहेत.
सर्वात मोठा प्रभाग २० मध्ये महायुतीचे वर्चस्व
सर्वात मोठा प्रभाग असलेल्या २० मध्ये महायुतीच्या सुरेखा ओटवकर, वैभव कुंभार, नेहा तेंडूलकर शिवसेनेचे शिंदे गटाचे अभिजीत खतकर विजयी झाले. या प्रभागात काँग्रेसच्या एकमेव उमेदवार जयश्री कांबळे यांनी विजय मिळवला. चार जागा महायुतीने तर काँग्रेसने एक जागा जिंकली.