महायुतीचा २४ महानगरपालिकेवर झेंडा  

Mahayuti wins in 24 municipal corporations

 मुंबई : प्रतिनिधी :  राज्याचे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील तब्बल २४ महापालिकावर भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळविलेले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकापाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक जागा पटकावीत भाजपने राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले नाव अधोरेखित केले आहे.

 मुंबईतील २२७  जागापैकी रात्री उशिरापर्यत निकाल जाहीर झालेल्या २२६  पैकी सर्वाधिक ८८ जागा पटकावत भाजपा क्रमांक एकचा पक्ष बनला असून त्यांचा मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट २८ असे एकूण ११६ हा बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासूनच्या मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूनी एकत्र येऊन दिलेली झुंज अयशस्वी ठरली. आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उद्धव यांनी चुलत बंधू व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना २० वर्षानंतर सोबत घेऊनही सत्ता कायम ठेवण्यात अपयश आले. तरीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६६ जागा पटकवित द्वितीय क्रमांकांचे स्थान मिळविले.  मनसेने सहा उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसने (२४), एमआयएमने (९), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (३) समाजवादी पार्टी (२), राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार एक जागा पटकावली. (Mahayuti wins in 24 municipal corporations)

 गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुक प्रचाराची रणधुमाळी अखेर आजच्या निकालाने थंडावली आहे. २९ महापालिके पैकी भाजपाने एकट्याने १६ जागी स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर महायुतीसह २४ महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे तर लातूर,चंद्रपूर, भिवंडी येथे काँग्रेस , मालेगावमध्ये इस्लाम पक्ष तर वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने निर्विवादपणे सत्ता मिळविली आहे. (Mahayuti wins in 24 municipal corporations)

नवी मुंबईत गणेश नाईकाकडून एकनाथ शिंदेचा टांगा पलटी

 मुंबई महानगर प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या आठ पैकी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली व मीरा भाईंदर, भिवंडी,पनवेल व उल्हासनगर या महापालिका भाजपा व शिवसेना शिंदे गटाने एकत्र लढविल्या. मात्र नवी मुंबईत भाजपाचे जेष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र मतभेदामुळे युती होऊ शकली नाही. निवडणूक प्रचारकाळात त्यांच्यात एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करण्यात आली. गणेश नाईक यांनी शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे गायब करतो, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी १११ जागापैकी ६५ जागा पटकवित स्पष्ट बहुमत मिळविले. तर शिवसेना शिंदे गटाला ४३ जागा मिळाल्या. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन जागावर समाधान मानावे लागले. (Mahayuti wins in 24 municipal corporations)

 भाजपा महायुतीने बहुमत मिळवलेल्या महापालिका अशा : मुंबई, ठाणे,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नागपूर, पनवेल उल्हासनगर,पुणे,पिपंरी- चिंचवड, नाशिक,संभाजीनगर मीरा-भाईंदर, धुळे, नांदेड, परभणी, जालना,अकोला, अहिल्यानगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली-मिरज, इचलकरंजी.

विरोधी पक्षाने बहुमत मिळविलेल्या महापालिका अशा: लातूर, चंद्रपूर, मालेगाव,भिवंडी व वसई विरार यापैकी लातूरमध्ये काँग्रेसला  स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार आहे तर चंद्रपूर व भिवंडी मध्ये मित्र पक्षाची मदत घ्यावी लागेल. मालेगावमध्ये इस्लाम पक्षाने तर बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर