जमीर काझी : मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याने निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. मात्र त्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल.,असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी केले. मुंबई महापालिकेत त्यांच्याबरोबर आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत नसलो तरी उर्वरित ठिकाणी त्यांच्याशी आघाडी करण्याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवड मंडळात २८ मनपाची चर्चा
सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज दादर येथील टिळक भवनात झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,’ राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, आज मुंबई वगळता २८ महानगरपालिकांसाठी राज्य निवड मंडळाची बैठक झाली असून जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पक्ष पातळीवर एक महत्वाचा टप्पा आज पार पडला आहे. सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आली आहे. (Discussions between Congress and Shiv Sena Thackeray)
युबीटीशी चर्चा सुरू
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सुचना दिल्या आहेत, याशिवाय कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, परिषदेतील पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, बी.एम. संदीप, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रफुल्ल गुडधे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते आमदार अमिन पटेल, माजी मंत्री रणजित कांबळे, सुनिल देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुचे अध्यक्ष सागर साळुंखे,प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते. (Discussions between Congress and Shiv Sena Thackeray)
तिकीट वाटपासाठी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी देताना स्थानिक परिस्थिती, सर्व समाज घटकांचा केला जात आहे. सोशल इंजिनिअरिंगचा विचार करून तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आली आहे, असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. (Discussions between Congress and Shiv Sena Thackeray)