Delhi HC slammed Ramdev baba : रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी

Delhi HC slammed Ramdev baba

नवी दिल्ली : हमदर्दच्या रूह अफजा या लोकप्रिय पेयासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर दिल्ली कोर्टाने पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांची कानउघाडणी केली. त्यांनी वापरलेल्या ‘शरबत जिहाद’ या शब्दप्रयोगावर कोर्टाने रामदेव बाबांना तीव्र शब्दांत फटकारले. यापुढे अशी वादग्रस्त विधाने करणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी दिले. (Delhi HC slammed Ramdev baba)

पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) अन्न आणि औषध कंपनी हमदर्द आणि त्यांचे लोकप्रिय पेय रूह अफजा यांना लक्ष्य करताना सांप्रदायिक अपशब्द वापरले होते. हा व्हिडिओ काढून टाकण्याची ग्वाहीही पतंजलीच्यावतीने देण्यात आली.

‘हमदर्द’ने या वादग्रस्त व्हिडिओवर आक्षेप घेत रामदेव बाबा यांच्यावर खटला दाखल केला होता. मंगळवारी सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी या व्हिडीओवर रामदेव बाबा यांना चांगलेच फटकारले. पतंजलीच्या संस्थापकांचे वक्तव्य अविश्वसनीय होते. त्यामुळे न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. (Delhi HC slammed Ramdev baba)

न्यायालयाने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर, पतंजली आणि रामदेव यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी छापील वा व्हिडिओ स्वरुपातील असो या सर्व जाहिराती काढून टाकल्या जातील, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.

नायर म्हणाले, ‘‘मी त्यांना सल्ला दिला आहे. आम्ही व्हिडिओ काढून टाकत आहोत.’’

त्यावर न्यायमूर्ती बन्सल म्हणाले, ‘‘तुम्ही या प्रकरणात सहभागी होत आहात याचा मला आनंद आहे. हे व्हिडिओ पाहिल्यावर मला माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसला नाही.’’ (Delhi HC slammed Ramdev baba)

त्यानंतर न्यायालयाने रामदेव यांना, भविष्यात अशी विधाने, जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट जारी करणार नाहीत. अश प्रकारच्या आताच्या जाहिराती ‘‘ताबडतोब हटवा,’’ असे आदेश दिले.

हमदर्दची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, रामदेवबाबा हमदर्दविरुद्ध खटला चालवत आहेत आणि कंपनीच्या मालकांच्या धर्मावर हल्ला करत आहेत.

‘‘हे प्रकरण धक्कादायक आहे, जे अपमानाच्याही पलीकडे जाते. हे द्वेषपूर्ण भाषणासारखेच आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करणारेही आहे,’’ असे रोहतगी म्हणाले.

रोहतगी यांनी न्यायालयाला असेही सांगितले की, अ‍ॅलोपॅथीला लक्ष्य केल्याबद्दल रामदेव बाबा यांना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कडक शिक्षा दिली होती. त्यामुळे असला प्रकार मुळापासून संपवण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

रामदेवबाबा काय म्हणाले होते?

रामदेव बाबा यांनी ३ एप्रिल रोजी त्यांच्या कंपनीच्या उत्पादनाची – गुलाब शरबतची जाहिरात करताना वादग्रस्त विधान केले होते. एका व्हिडिओमध्ये त्यांनी हमदर्दच्या रूह अफजावर निशाणा साधला आणि हमदर्द त्यांचे पैसे मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी वापरत आहे, असा धक्कादायक दावा केला होता. रामदेव यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये ‘शरबत जिहाद’ हा शब्दही वापरला.

हेही वाचा :
 ‘सोनि’याचा वेलू गेला ‘लाखा’वरी
पत्नीने केले ओम प्रकाशांवर बारा वार

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या