मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक महिन्यांची मुदतवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा न करता तब्बल एक वर्षाची मुदतवाढ मराठी भाषा शिकण्यासाठी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने मंत्री सरनाईक तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणेचे परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांचे स्वागत केले असले तरी शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. (CM announcement for auto-rickshaw and taxi drivers)
कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी
मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकवण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने मराठी भाषा न शिकणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरील कारवाई टळली आहे. यापूर्वी मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर १८ ऑगस्टपासून परिवहन विभागाने कारवाई सुरू केली होती. त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये प्रचंड नाराजी होती. भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल महाराज्यचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा टॅक्सी चालक संघटनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. (CM announcement for auto-rickshaw and taxi drivers)
१ लाख ६५ हजार चालक मराठी शिकले
रिक्षा टॅक्सीचालकांना प्रवाशांबरोबर मराठीत संवाद साधण्यासाठी आणि जुजबी मराठी भाषा शिकवण्यासाठी परिवहन विभागाने १०५ दिवसाचा विशेष उपक्रम राबवला होता. त्यामध्ये एक लाख ६५ हजार ८०० चालक मराठी भाषा शिकले. मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती.
१ हजार २६८ चालकांना नोटीसा
त्यानंतर मराठी भाषा न शिकणाऱ्या चालकांवर परिवहन विभागाने १८ ऑगस्टपासून कारवाई सुरू केली होती. पहिल्याच दिवशी १ हजार २६८ टॅक्सी, रिक्षा चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमराठी चालकांनी बंदची हाक दिली होती. मराठी रिक्षाचालकाला मारहाणही केली होती. त्यामुळे वातावरण गढूळ झाले होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर गरज भासल्यास तीन महिन्याचा कालावधी देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी भाषा शिकण्यास एक वर्षाची मुदतवाढ देऊन सरनाईकांना तोंडघशी पाडले. मुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते आहेत असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (CM announcement for auto-rickshaw and taxi drivers)