नांगराच्या फाळाच्या तलवारी करुन शेत शिवाराचे रक्षण करा : राजू शेट्टी

Land survey for the Shaktipeeth in Kolhapur district

कोल्हापूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील नांगरीच्या फाळाला धार लावून तयार ठेवावे. जर अधिकारी जबरदस्तीने मोजणी करण्यासाठी शिवारात घुसले, तर याच नांगरीच्या फाळाच्या तलवारी करून आपल्या मायभूमीचे आणि शिवाराचे रक्षण करा. कोणत्याही अधिकाऱ्याला शेतात पाऊल टाकू देऊ नका.” असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांला केले. (Land survey for the Shaktipeeth in Kolhapur district)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण व वादळी बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी ‘आरपारच्या लढाई’चा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे.

शक्तीपीठ महामार्गासाठी ९ सप्टेंबरला जमीन मोजणी

शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात आता थेट युद्धाची ठिणगी पडली आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून जमिनीची मोजणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात कडाडून विरोधाचा एल्गार पुकारला आहे. (Land survey for the Shaktipeeth in Kolhapur district)

महिला शेतकरी रोखणार अधिकाऱ्यांची वाट

या आंदोलनात आता महिलांनीही उडी घेतली आहे. ९ सप्टेंबर रोजी मोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील महिला शेतकरी स्वतः शिवारात ठाण मांडून बसणार आहेत. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि पोलीस ताफा जरी आला, तरी त्यांना शिवारात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा आक्रमक निर्धार महिलांनी केला आहे. “शिवारात रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही,” असा संतप्त आणि करारी निर्णय आजच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.

जमीन मोजणीची आदेशाची होणार होळी

३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महामार्गाच्या शासकीय आदेशाची जाहीर होळी करून तीव्र निषेध नोंदवला जाईल ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आणि मोजणीच्या आदेशाची होळी करून जिल्हा प्रशासनाला आव्हान देणार आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

  ९ सप्टेंबर मोजणीच्या दिवशी गावबंदी आणि शिवारबंदी करून अधिकारी व पोलिसांना गावातच रोखले जाईल. प्रशासनाने ९ सप्टेंबरपासून मोजणीची जय्यत तयारी सुरू केली असली, तरी शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या या रोषापुढे नमते घेणार की बळाचा वापर करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Land survey for the Shaktipeeth in Kolhapur district)

 या बैठकीस कॉम्रेड गिरीष फोंडे,  इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील,  सम्राट मोरे,  कॅाम्रेड शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे,  प्रकाश पाटील, कृष्णात डी. पाटील,  नामदेव यादव,  भगवान पाटील,  कृष्णात साबळे, अमित नाळे यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ