संभाजीनगर : महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना आज उघडकीस आली. संगीता अण्णासाहेब पवार (वय ५०) असे महिला कीर्तनकाराचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचगाव परिसरात ही घटना घडली. (Woman Kirtankar Murdered)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितींनुसार, वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात संगीता पवार वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्री देखील त्यांचे आश्रमातच वास्तव्य होते. शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी पूजेसाठी पोहचले. यावेळी त्यांनी संगीता पवार यांना हाक मारली. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये जाऊन पाहिले, असता त्यांना धक्का बसला. संगीता पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पुजारी चौधरी यांनी तात्काळ विरगाव पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. (Woman Kirtankar Murdered)
विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर श्वान पथक, फॉरेन्सिक टीम, ठसे तज्ञ देखील पोहचले. सोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. कीर्तनकारांच्या हत्येची माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे म्हणाले, चिंचडगाव येथे रस्त्याच्या कडेला एक मोहटा देवीचं मंदिर आहे. याच ठिकाणी संगीता पवार राहत होत्या आणि पूजाअर्चा करत होत्या. काल रात्री एकट्याच होत्या आणि त्या झोपल्या असताना कोणतीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तपासाच्या दृष्टीने वेगवेगळे पथक घटनास्थळी आले आहे. तसेच सर्वच दृष्टीने आम्ही तपास करत आहोत आणि खऱ्या गुन्हेगाराला लवकरच अटक करू असे फुंदे म्हणाले. (Woman Kirtankar Murdered)