२८ मार्च १९६५चा न्यू यॉर्क टाइम्सचा अंक तसा नेहमीसारखाच होता. रुटीन बातम्या. त्यातल्या त्यात विशेष बातमी होती डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्याविषयीची. ते अलाबामातल्या नागरी हक्कांविषयीची चळवळ अधिक तीव्र करणार होते. तिला दोन कॉलम जागा मिळाली होती. बाकी मग नेहमीचेच व्हिएतनाम, क्युबा वगैरे तेव्हाचे चर्चेतले विषय. ते पहिल्या पानावर होते. यात खळबळजनक वगैरे काहीही नव्हते. पण या अंकातल्या एका लेखाने मात्र ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) आणि ‘नॅशनल सिक्यरिटी एजन्सी’ (एनएसए) च्या अधिकाऱ्यांना अस्वस्थ करून सोडले होते… (US National Security Agency)
- रवि आमले
न्यू यॉर्क टाइम्सच्या ३२व्या पानावरचा तो दोन कॉलमी लेख. एका भल्यामोठ्या जाहिरातीच्या बाजूस असलेल्या जागेत कोंबलेला. त्याचा मथळा होता ‘द इम्पॉर्टन्स ऑफ बीईंग बंडी’. राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा सहायक मॅकजॉर्ज बंडी यांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा तो लेख. या लेखाने, खरेतर त्यासोबत वापरलेल्या छायाचित्राने सीआयए आणि एनएसएचे अधिकारी काळजीत पडले होते.
ते छायाचित्र न्यू यॉर्क टाइम्सच्या असंख्य वाचकांनी तर नीट पाहिलेही नसेल. व्हाइट हाउसच्या हिरवळीवर राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांच्याशी हे बंडी महाशय बोलत आहेत, असे ते छायाचित्र. त्यात बंडी यांच्या हातातील एक फाइलवर लिहिलेले ‘टॉप सिक्रेट दिनार’ हे शब्द स्पष्ट दिसत होते. (US National Security Agency)
गुप्तचर संस्थांमध्ये गोपनीयतेच्याही पायऱ्या असतात. एनएसएमध्ये सर्वात वरच्या पायरीचा ‘कोडवर्ड’ होता ‘दिनार’ तत्पूर्वी त्यास म्हणत ‘ट्राइन’. आता त्यास ‘टॉप सिक्रेट अम्ब्र’ म्हणतात. अम्ब्र म्हणजे सावलीचा काळोखी केंद्रभाग. या छायाचित्रातून तो कोडवर्ड दिसत होता. ते पाहताच सीआयएच्या एका अधिकाऱ्याने न्यू यॉर्क टाइम्सशी संपर्क साधला. त्या छायाचित्राची मूळ ‘निगेटिव्ह’ मागवून घेतली. इतर कोणाच्या हातात ती जाऊ नये, यासाठी घेतलेली ती काळजी होती. हे सर्व पाहिल्यानंतर कोणासही वाटेल, की हे जरा अतिच होत आहे. ते तीन शब्द समजा समजले लोकांना, तरी त्याने एवढा काय फरक पडणार आहे?
कोडवर्डचे कोडे
त्या दिवशी सीआयएचे तत्कालीन उपसंचालक (आणि एनएसएचे भावी संचालक) लेफ्ट. जनरल मार्शल सी. कार्टर यांनी मॅकजॉर्ज बंडी यांना जो दूरध्वनी केला आणि त्यांचे जे बोलणे झाले, त्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळते. कार्टर बंडी यांना म्हणाले, की ‘हे मॅक, तुमच्या गोपनीय खात्यात अडीच हजार डॉलर आहेत ना?’ बंडी यांना या प्रश्नाचा रोख कळेना. तेव्हा कार्टर यांनी त्यांना, एनएसएच्या सिग्नल इंटेलिजन्सचा एखादा कोडवर्ड लोकांना समजल्यानंतर तो बदलण्यासाठी किती खर्च येतो, ते समजावून सांगितले. एनएसएचे ब्रिटिश, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या सिग्नल इंटेलिजन्स संस्थांशीही संबंध. एक कोडवर्ड फुटला, तर त्या सगळ्यांना तो बदलावा लागणार. त्याचे हजारो रबरस्टॅम्प फेकून देऊन नव्या कोडवर्डचे स्टॅम्प तयार करावे लागणार. त्यात पैसे आणि वेळ दोन्ही वाया
जाणार. म्हटले, तर साधी बाब. परंतु सीआयए, एनएसए यासारख्या संस्थांसाठी गोपनीयतेबाबत किती पातळ्यांवर संवेदनशील असतात, हे यातून लक्षात यावे. याच न्यू यॉर्क टाइम्समधील लेखामधील तिसरेच वाक्य सरकारी गोपनीयतेविषयीचे एक सत्य सांगून जात होते, की ‘गोपनीयतेची आवश्यकता जवळजवळ नेहमीच लोकशाहीच्या कर्तव्यांच्या वरचढ ठरते.’ आणि एनएसएबाबत ते तंतोतंत खरे होते. (US National Security Agency)
एनएसए ही अमेरिकेची सर्वांत मोठी गुप्तचर संस्था. पण आजही जनचर्चेत तिचे नाव नसते. याचे एक कारण, ही संस्था काही थेट जेम्स बॉण्डगिरी करणारी नाही. त्यामुळे लोकांना हवी तशी चित्तचक्षुचमत्कारिकता तिच्या कार्यात नाही. पण गुप्तचर जे ‘इंटेलिजन्स’ जमा करण्याचे काम करतात. तेच काम तीही करते. फक्त तिचे कुरूक्षेत्र वेगळे असते. ते इलेक्ट्रॉनिक्सने, सिग्नल्सनी बनलेले असते. ते शून्य आणि एक या अंकांनी बनलेले डिजिटल मैदान असते. सर्व्हेलन्स अर्थात पाळत हा तिच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. तिचा जन्म शीतयुद्धकाळातला. जन्मतारीख ४ नोव्हेंबर १९५२. सटवाई प्रत्येकाच्या माथ्यावर जन्मतःच त्याचे भवितव्य लिहिते, ही आपली भाबडी अंधश्रद्धा. त्या भाषेत सांगायचे, तर एनएसएच्या माथ्यावर त्या अमेरिकी सटवाईने जन्मतःच गोपनीयता कोरलेली होती. इतकी, की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. टूमन यांनी २४ ऑक्टोबर १९५२ रोजी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या ज्या ‘प्रेसिडेन्शियल मेमोरँडम ‘द्वारे ही संस्था जन्मास आली, तो मेमोही पुढे अनेक वर्षे गोपनीय ठेवण्यात आला होता.
टॉप सिक्रेट बर्थ सर्टिफिकेट
‘पझल पॅलेस’ या एनएसएच्या ‘चरित्रग्रंथा’चे लेखक जेम्स बॅमफोर्ड सांगतात, की या मेमोरँडमला एनएसएचे लोक ‘टॉप सिक्रेट बर्थ सर्टिफिकेट’ म्हणत असत. त्याची माहिती लोकांपर्यंत पाझरली, तेव्हा समजले, की संस्थेच्या जन्मपत्रिकेतच तिला पूर्ण मोकळीक देण्यात आलेली आहे. निर्बंधहीन अशी ती संस्था आहे. हे जगजाहीर होण्यास अनेकांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. त्यातील एक लक्षणीय प्रयत्न होता, डेव्हिड कान (स्पेलिंग के ए एच एन) यांचा. (US National Security Agency)
ते पत्रकार आणि हौशी ‘क्रिप्टॉलॉजिस्ट’ कूटलिपी, कूटभाषा हा त्यांच्या आवडीचा, अभ्यासाचा विषय. त्यांनी लिहिलेले ‘द कोडब्रेकर्स’ हे या विषयावरचे एक उत्तम पुस्तक. (यात कौटिल्याचे अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामशास्त्र यांचेही संदर्भ येतात.) ‘मॅकमिलन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या पुस्तकात एनएसएवर एक पूर्ण प्रकरण आहे, याचा सुगावा जेव्हा एनएसएला लागला, तेव्हा हबकलेच ते. विचार सुरू झाला, की हे पुस्तक दडपायचे कसे? कोणी कान यांना सरकारी सेवेत घ्यावे म्हणजे कायद्याने दडपण आणता येईल, असे सुचवले. कोणी ‘ब्लॅक बॅग जॉब’ हा पर्याय सुचवला. म्हणजे पाळत ठेवणे, दूरध्वनी टॅप करणे, संभाषण चोरून ऐकण्यासाठीची उपकरणे बसवणे वगैरे बेकायदेशीर गोष्टी करणे. एकदा तर एनएसएच्या संचालकांनी सुचवले, की कान यांच्या लिखाणावर टीका करणारा मजकूर छापून आणून, त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करावे. तसे ‘पुस्तक परीक्षण’ लिहूनही घेण्यात आले होते.
अखेर सीआयएचे माजी संचालक अॅलन डलस यांनी प्रकाशकांशी संपर्क साधला. ४ मार्च १९६६ रोजी या पुस्तकाची ‘छपाईप्रत’ संरक्षण मंत्रालय आणि तेथून एनएसएकडे धाडण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून हे पुस्तक मागे घ्यावे, यासाठी प्रकाशकावर दबाव आणण्यात आला. अशा वेळी प्रकाशक नमतात. अगदी छापलेले पुस्तकही छापलेलेच नाही, असे जाहीर करण्यापर्यंत नमतात. पण ती अमेरिका असल्याने तसे काही झाले नाही. मग एनएसएने सुचवले की ते प्रकरण गाळावे. अखेर पुस्तकातील काही संवेदनशील मजकूर, म्हणजे उदाहरणार्थ एनएसए आणि जीसीएचक्यू यांच्या संबंधांची माहिती असणारे वगैरे परिच्छेद गाळण्यावर प्रकरण सुटले. १९६६मध्ये हे पुस्तक बाजारात आले. पण त्याचा भर प्रामुख्याने कूटलिपीवर असल्याने त्यातून एनएसएचे जे भयंकर रूप होते ते झाकलेलेच राहिले. ते काळोखातून उजेडात आले पुढे सहा वर्षांनी. ते करण्याचा मान जातो, पेरी फेलवॉक यांच्याकडे.
फेलवॉकचे धाडस
एनएसएमध्ये वरिष्ठ विश्लेषक या पदावर विविध देशांत काम केलेला हा अवघ्या २५ वर्षांचा ‘एअर फोर्स स्टाफ सार्जंट’. व्हिएतनाम युद्धाविषयीच्या अमेरिकी धोरणांमुळे भ्रमनिरास झालेला. अशात १९६७ मध्ये इस्रायल आणि अरब राष्ट्रांतील ते सहा दिवसीय युद्ध झाले. त्यावेळी अमेरिकी नौदलाचे ‘लिबर्टी’ नामक हेरगिरी जहाज इजिप्तच्या समुद्रातून तेथील संदेशवहनावर नजर ठेवत होते. इस्रायलने ते जहाज बुडवले. ३५ अमेरिकी नौसैनिक मारले गेले. १७१ जण जखमी झाले. इस्रायलचा खुलासा असा, की चुकून घडले ते. पण ते खोटे होते. इस्रायली सैनिकांनी कैद केलेल्या शेकडो इजिप्शियन सैनिकांचे हत्याकांड केले होते. ते उजेडात येऊ नये, म्हणून इस्रायलने अमेरिकेचे हेरगिरी जहाज बुडवले होते. आणि तरीही लिंडन जॉन्सन प्रशासनाने त्यावर पडदा टाकला. (US National Security Agency)
या अशा गोष्टींमुळे फेलवॉकचे युद्धांबाबतचे मत बदलले. अमेरिकेत परतल्यावर त्याने पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. ४ मे १९७० रोजी केंट स्टेट विद्यापीठात व्हिएतनाम युद्धाविरोधातील सभेवर अमेरिकेच्या नॅशनल गार्डने गोळीबार केला. त्यात चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले. नऊ जखमी झाले. या घटनेचा फेलवॉकवर मोठा परिणाम झाला. तो युद्धविरोधी चळवळीकडे ओढला गेला ‘पेंटॅगॉन पेपर्स’ फुटी, ‘वॉटरगेट’चा काळ तो.
त्यानेही ठरवले, की एनएसएवरचा गोपनीयतेचा पडदा हटवून, या संस्थेचे नेमके काय उद्योग चालतात, ते नागरिकांसमोर आणायचे. एक मोठा लेख लिहिला त्याने. पण तो छापणार कोण? त्याच्या नजरेसमोर नाव आले, ‘रॅम्पार्ट्स’चे. छोटेसे मासिक ते. पण बंडखोर. सीआयए महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हेरगिरीसाठी कसा वापर करते, याचा गौप्यस्फोट करण्याचे धाडस दाखवले होते, त्यांनी. त्यामुळे पेरी फेलवॉकने त्या मासिकास आपला लेख पाठवला. मात्र त्यातली ती ‘सिगिन्ट’ आणि ‘एलिन्ट’ आणि ‘कॉमसेक’ सारखी तांत्रिक शब्दावली पाहून डेव्हिड होरोविट्झ, पीटर कोलिएर या संपादकांना समजेनाच, की याचे काय करायचे? या मासिकात लष्करी गुप्तचर संस्थेत काम केलेला एक पत्रकार होता. त्याने तो लेख वाचल्यावर, तो उडालाच. म्हणाला, ‘हा लेख छापला, तर आपली जेलवारी नक्की.’ मग त्या संपादकांनी पेरी फेलवॉकला भेटायला बोलावले. त्याची विस्तृत मुलाखत घेतली आणि ऑगस्ट १९७२च्या अंकात ती प्रसिद्ध केली. तिचा मथळा होता – ‘यूएस इलेक्ट्रॉनिक एस्पिओनॉज : ए मेमॉयर’.
उपदव्यापी उठाठेव
सुरुवातीची सुमारे चार पाने विषय परिचयाची आणि त्यानंतर पेरी फेलवॉक यांची विन्स्लो पेक या टोपणनावाने मुलाखत, असा तो तब्बल १६ पानी ऐवज. एनएसएचे प्रताप आणि उद्योग यांवर पहिल्यांदाच मास मीडियातून प्रकाशझोत पडला होता. त्यामुळे न्यू यॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतली. त्यावरच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. कोणी यात काय विशेष म्हणत टीकाही केली. गंमत म्हणजे, इंटेलिजन्स कम्युनिटीने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले. अनेकांचा कयास होता, की आता पेरी फेलवॉक यांना अटक होणार. पण तसे झाले नाही. ‘पझल पॅलेस’ (१९८२) हे एनएसएचे चरित्र आणि चारित्र्य यांवरचे एक उत्तम पुस्तक. त्याचे लेखक-पत्रकार जेम्स बॅमफोर्ड सांगतात, की खटला भरला, तर त्या लेखातील मजकुरास दुजोरा दिल्यासारखे झाले असते. त्यामुळे एनएसएने ते टाळले. (US National Security Agency)
सीआयएने काही वर्षांपूर्वी खुल्या केलेल्या एका गोपनीय फाइलमध्ये पेरी फेलवॉकची ही मुलाखत आणि त्यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांची कात्रणे आढळतात. त्यातून एक बाब स्पष्ट होते, की तेव्हाच्या त्या वृत्तपत्रांनी, त्या लेखातील एनएसएची जी ‘कौतुकास्पद’ कारवाई आहे, तिच्यावर अधिक भर दिला होता. एनएसएने सोव्हिएत रशियाचे सर्व कोड्स उलगडले होते, ही बाब ठळकपणे छापली होती. पण त्यातील एकानेही एनएसएमधील गैरप्रकारांचा उल्लेख केला नाही. फेलवॉकने स्पष्ट म्हटले होते, की एनएसएमधील बरीच मंडळी या ना त्या प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांत अडकलेली आहेत. काही जण तर मानवी तस्करीत स्लेव्ह ट्रेडमध्ये गुंतलेले आहेत. त्याकडे मात्र माध्यमांनी दुर्लक्ष केले. पण याच बरोबर, जगभरात एनएसएची सुमारे दोन हजार स्टेशन्स आहेत आणि त्या माध्यमातून ही संस्था जगातील शब्दशः प्रत्येक संदेश ‘इंटरसेप्ट’ आणि ‘डिकोड’ करू शकते, या गोष्टीकडेही या वृत्तपत्रांनी काणाडोळा केला होता.
धोक्याची घंटा
वस्तुतः यातून तेव्हाची ती वृत्तपत्रे, पत्रकार, अभ्यासक यांचा मेंदू हादरून जायला हवा होता. फेलवॉक यांची ही मुलाखत केवळ ‘एनएसए अस्तित्वात आहे’ एवढेच सांगत नव्हती. तिच्या गोपनीय सिग्नल इंटेलिजन्स यंत्रणेचे अवाढव्य स्वरूप, क्षमता आणि जगास कवेत घेणाऱ्या तिच्या कक्षा यांकडे ती निर्देश करीत होती. एनएसएची ही प्रचंड क्षमता केव्हाही अमेरिकी नागरिकांवर उलटू शकत होती. पाळतखोरीची चटक मर्यादा जुमानत नसते. तेथे आपले परके असा भेद नसतो. याचे संकेत ही मुलाखत देत होती. धोक्याची घंटा वाजवली होती, (US National Security Agency)
या मुलाखतीने. कालांतराने ते सारे धोके लोकांसमोर आले. सरकार नामक यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षेच्या, गुन्हेगारी, दहशतवाद विरोधी कारवायांच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या खासगीपणाची कशी शिकार करते, ते चर्च समितीपासून एडवर्ड स्नोडेन यांच्यापर्यंत अनेकांनी हे दाखवून दिले. आज ती सर्व प्रकरणे इतिहासजमा झालेली असली, आजच्या पाळतखोरीने किती तरी योजने उड्डाणे मारलेली असली, तरी ती जुनी प्रकरणे जाणून घेणे महत्त्वाचे. कारण पाळतखोरीचे वर्तमान आकळण्यासाठी उपयुक्त आहेत ती.
(रवि आमले हे ज्येष्ठ पत्रकार संपादक, प्रथितयश लेखक आणि भाष्यकार आहेत. त्यांची प्रोपगंडा, रॉः भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा, मॅनहंट (अनुवादित), परकीय हात, वरुण ते बहिर्जी आदी पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत.)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका जून २०२६ वरून साभार)