नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशीर थरूर यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Tharur delegation)
एनडीए सरकारच्या धोरणांचे कौतुक करणाऱ्या वक्तव्यांमुळे स्वतःच्या पक्षातच टीका थरूर यांच्यावर टीका होत असते. आता या समितीवर नेमणूक झालेल्या थरूर यांनी, सातजणांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे सरकारकडून आमंत्रण मिळाले, हा माझा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा मी कधीही कमी पडणार नाही, असे थरूर यांनी स्पष्ट केले.(Tharur delegation)
‘‘भारत सरकारने अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ पाच प्रमुख देशांना भेटी देणार आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे आमंत्रण दिल्याने मला अभिमान वाटतो. राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या मदत आवश्यक असते तेव्हा मी कुठेही कमी पडणार नाही,’’ असे थरूर यांनी X वर म्हटले आहे.
त्यांनी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या स्थापनेबाबतची सरकारी अधिसूचना देखील शेअर केली. थरूर यांच्यासोबत, शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या इतर सदस्यांमध्ये भाजप नेते रविशंकर प्रसाद आणि जय पांडा, जेडीयू नेते संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.
विविध पक्षांचे सदस्य, प्रमुख राजकारणी आणि प्रतिष्ठित राजनयिक या शिष्टमंडळांचे सदस्य असतील.
हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह भागीदार देशांना भेट देतील आणि ‘‘सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताची राष्ट्रीय सहमती आणि दृढ भूमिका मांडतील.’’(Tharur delegation)
शिष्टमंडळांच्या इतर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी बोलून त्यांना शिष्टमंडळांसाठी चार नावे सादर करण्यास सांगितले.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याला दुजोरा दिला. पक्षाने माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आनंद शर्मा यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई; राज्यसभेतील खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन; आणि लोकसभातील खासदार राजा ब्रार यांची नावे दिली आहेत.