Kangana’s remark on Trump: कंगना ट्रम्पशी भिडली, भाजपा घाबरली

Kangana’s remark on Trump

अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना राणावत हिला आपली एक वादग्रस्त पोस्ट डिलिट करावी लागली. तिच्या या पोस्टची खूप चर्चा झाली. या पोस्टच्या माध्यमातून तिने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच शिंगावर घेतले. त्यामुळे भाजपच्या तंबूत घबराट उडाली आणि तिला पोस्ट डिलिट करायला भाग पाडण्यात आले. (Kangana’s remark on Trump)

-प्रतिनिधी

एकूण कंगना राणावतशी संबंधित हे प्रकरण काय आहे?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्याशी भारतासंदर्भात बोललो. भारतात उत्पादन वाढवू नये, असे त्यांना सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या जगाचे फौजदार असल्यासारखे वागताहेत. आणि त्यांच्याविरोधात कुणी ब्र देखील काढत नाही. परंतु खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत थेट ट्रम्प यांनाच भिडली.

कंगनाने १५ मे २०२५ रोजी एका एक्स पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या अॅपल कंपनीसंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख केला होता. यासोबतच तिने पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात तुलना केली. तिने लिहिले होते, “डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, पण जगातील सर्वात प्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे, तर मोदी यांचा तिसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प एक अल्फा मेल आहेत, पण आमचे पीएम हे अल्फा मेलचे बाप आहेत.”

या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. कंगनाच्या डेअरिंगची चर्चाही सुरू झाली. परंतु कंगनाच्या डेअरिंगमुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात घबराट पसरली. भाजपाला यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी कंगनाला फोन करून ही पोस्ट हटवण्यास सांगितले. कंगनाने नंतर एका दुसऱ्या पोस्टमध्ये याबाबत खेद व्यक्त केला. ही तिची वैयक्तिक मते व्यक्त होती. आणि पक्षाच्या निर्देशानुसार इंस्टाग्राम आणि एक्स वरून हटवली आहेत, असे तिने जाहीर केले. (Kangana’s remark on Trump)

कंगनाने लिहिले, ‘‘आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी यांनी मला फोन करून ट्रम्प यांच्या अॅपल उत्पादनासंदर्भातील ट्वीट हटवण्यास सांगितले. मला माझी वैयक्तिक मते पोस्ट केल्याचा खेद आहे, आणि मी ते ट्वीट इंस्टाग्रामवरूनही हटवले आहे.’’

कंगनाची आपल्याच पक्षाच्या तंबूत गोंधळ उडवून देण्याची ही पहिली वेळ नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. यापूर्वीही तिच्या अनेक पोस्ट आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत.

कंगनाने याआधीही खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तिच्या वैयक्तिक मतांविषयी वेळोवेळी खेद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने २०२१ मध्ये मागे घेतलेल्या शेती कायद्यांच्या पुनर्बहालीची मागणी तिने सप्टेंबर महिन्यात केली होती. ‘‘हे कायदे शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने योग्य होते आणि त्यांची पुनर्बहाली झाली पाहिजे. इतर राज्यांतील शेतकऱ्यांना जशी याची फळं मिळाली, तशीच प्रगती सगळीकडे व्हायला हवी,’’ असे तिने म्हटले होते. शेतकरी कायद्यावरून आधीच भाजपची, केंद्र सरकारची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाचक्की झाली होती. कंगनाच्या पोस्टमुळे जुन्या जखमेची खपली पुन्हा निघाली. आणि भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली. (Kangana’s remark on Trump)

दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी स्पष्ट केले की, ‘‘कंगनाचे विधान वैयक्तिक होते. पक्षाच्या वतीने धोरणात्मक विधान करण्याचा अधिकार त्यांना नाही.’’

आमचे शीर्षस्थ नेतृत्व कणखर राहिले नसते तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचाही बांगलादेश बनला असता, असं नमूद करून कंगना म्हणाली होती की, आंदोलनाच्या नावावर उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते. आंदोलनाच्या ठिकाणी बलात्कार आणि हत्या होत होत्या.

कंगनाच्या या विधानापासूनही भाजपने फारकत घेतली. कंगनाला शेतकरी आंदोलनासंदर्भात ‘बांगलादेशसारखी अराजकता’ निर्माण झाली असती असे विधान करण्याची परवानगी पक्षाने दिलेली नाही, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले. (Kangana’s remark on Trump)

शेतकरी आंदोलनाला विरोध करताना तिने अनेक पोस्ट केल्या. आंदोलनात सहभागी असलेल्या एका वृद्ध महिलेला उद्देशून ‘‘शंभर रुपयांना उपलब्ध’’ असे म्हटले होते आणि तिला ‘‘बिल्किस दादी’’ संबोधले होते. या पोस्टमुळेही मोठा वाद झाला आणि नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली.

शेतकरी आंदोलनासंदर्भात तिने केलेल्या वक्तव्यामुळे विमानतळावर एका सुरक्षा रक्षक महिलेने तिच्या कानफटात वाजवून निषेध व्यक्त केला होता. त्याचीही देशभर चर्चा झाली होती. (Kangana’s remark on Trump)

महात्मा गांधी यांच्याबद्दलही तिने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे आग्रा येथे तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. तिने नंतर सोशल मीडियावर माफी मागितली.

कंगनाने कोविड-19 ला ‘‘सामान्य फ्लू’’ म्हटले आणि त्याला ‘‘जास्त प्रसिद्धी मिळालेला आजार’’ असे संबोधले.

कंगनाने एका विनोदी व्हिडिओला खरा समजून कतार एअरवेज आणि त्यांच्या सीईओवर टीका करणारी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. नंतर तिला हा व्हिडिओ बनावट असल्याचे समजले आणि तिने ती पोस्ट डिलीट केली. यामुळे सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली गेली.

कंगनाने वेब सीरिज ‘तांडव’ च्या निर्मात्यांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली. यासंदर्भातील पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा शिशुपालाच्या ९९ चुका माफ केल्या होत्या. आधी शांती आणि नंतर क्रांती. याचं मुंडकं उडवण्याची वेळ आली आहे……

तिच्या या पोस्टनंतर तिचे ट्विटर अकौंटवर काही काळ निलंबित करण्यात आले होते. कंगना राणावत तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. ताज्या प्रकरणात तिने पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील पोस्ट भाजपच्या निर्देशानुसार डिलीट केली आणि खेद व्यक्त केला. भाजपने आपल्या विरोधकांना जेरीस आणण्यासाठी कंगणा राणावतचा वापर वेळोवेळी केला आहे. मुंबईत शिवसेनेच्या विरोधातील प्रकरण देशभर गाजले होते. सततच्या वादग्रस्त विधानांमुळेच तिला मंडीमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. ती निवडूनही आली. आता ती भाजपची थेट खासदार असल्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल भाजपला किंवा सरकारला सारवासारव करावी लागते. आपल्याच पक्षाच्या तंबूत घबरात निर्माण करणारी खासदार म्हणून कंगनाची ओळख ठळक बनत चालली आहे.

हेही वाचा :
सरकारची दडपशाही सुरूच
‘ऑपरेशन सिंदूर’ शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांच्याकडे

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर