बेंगळुरू : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाला चार दशके उलटली आहेत. या चार दशकांनंतर, शुक्ला या मोहिमेवर जाणार आहेत. ही माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) दिली.(Shukla set for space travel)
भारताच्या विस्तारत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यात ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचे नियोजित मिशन एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास मंत्री सिंह यांनी वेळी व्यक्त केला.
भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुक्ला यांना इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आले. ते गगनयान मोहिमेच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत. (Shukla set for space travel)
निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक-खाजगी आंतरराष्ट्रीय भागीदारीतून भारत अंतराळ मोहिमा आखत आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या सहभागामुळे मानवी अंतराळ संशोधनात एक महत्त्वाचा दावेदार म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या निश्चयाला बळकटी मिळते. (Shukla set for space travel)
इस्रो जूनमध्ये जीएसएलव्ही-मार्क २ रॉकेटद्वारे नासासोबत संयुक्तपणे विकसित केलेला निसार उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. जुलैमध्ये अंतराळ संस्था हेवी-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेट वापरून अमेरिकेतील एएसटी स्पेसमोबाइल इंक.चे ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रह कक्षेत सोडेल, असे श्री. सिंह म्हणाले.
‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी यावेळी आगामी विविध अंतराळ मोहिमांविषयीचे सादरीकरण केले.