रणजित देसाई आणि माधवी देसाई हे मराठी साहित्यातील बहुचर्चित दाम्पत्य. रणजित देसाई मोठे साहित्यिक, तर नाच गं घुमा आत्मचरित्रामुळं माधवी देसाई यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका टप्प्यावर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी रणजित देसाई यांनी आपले एक पुस्तक माधवी देसाई यांना अर्पण केले. त्या अर्पणपत्रिकेत म्हटलं होतं की, नातं सरलं तरी जिव्हाळा कायम आहे, अशा माधवी देसाई यांना. माणसांच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी मनात जिव्हाळा असेल तर वेगवेगळ्या निमित्तांनी एकत्र येत असतात. शरद पवार आणि अजित पवार या दोघांचंही तसंच झालंय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांतील घटना त्याची साक्ष देतातच. शिवाय अजितदादांनी एका कार्यक्रमासाठी शरद पवार यांनाच निमंत्रण धाडले आहे. अर्थात जय पवार यांच्या लग्नासंदर्भात किंवा घरगुती कार्यक्रमाचे हे निमंत्रण नाही. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या एका कार्यक्रमासाठी शरद पवार यांना निमंत्रण धाडले आहे. (Sharad Pawar and Ajit Pawar)
बारामतीत अटीतटीचा संघर्ष
दोन वर्षांपूर्वी अजितदादांच्या अध्यक्षतेखालील आमदारांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिवसेनेप्रमाणेच अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला आणि अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद्चंद्र पवार) पक्ष असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या दोन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधात लढवल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीची लढाई पवार कुटुंबीयांच्यातच झाली. लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार तर विधानसभेला अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांच्यादरम्यान आरोप प्रत्यारोप झाले. दोन्हीकडून चुरशीने निवडणुका लढवल्या गेल्या. शऱद पवार आणि अजित पवार आतून एकच आहेत अशा दबक्या आवाजातील चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सुरू असायच्या त्या चर्चा या निवडणुकांनी थांबवल्या नाही, पण कमी केल्या. (Sharad Pawar and Ajit Pawar)
साहेब आणि दादांनी एकत्र येण्याची भावना
दोन्हीकडून अटीतटीचा संघर्ष सुरू असतानाच दोन्ही पक्षांचे दुस-या तिस-या फळीतील कार्यकर्ते मात्र साहेब आणि दादांनी एकत्र यावे अशीच प्रार्थना मनोमन करीत होते. आजही सामान्य कार्यकर्त्यांची ती भावना आहे. परंतु हा संघर्ष विचारधारेचा असल्यामुळे ते शक्य नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. अजितदादा मागे फिरणे शक्य नाही. आणि शरद पवारही भाजपसोबत तडजोड करण्याची शक्यता नाही. (Sharad Pawar and Ajit Pawar)
शरद पवार यांच्या वाढदिवसाला अचानक अजितदादा आणि त्यांचे सहकारी थेट दिल्लीत ६ जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले. खासदार सुनेत्रा पवारही सोबत होत्या. राजकारणापलीकडे ही कौटुंबिक पातळीवरची भेट असल्याचे सांगण्यात आले. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणे एवढा मर्यादित हेतू असल्याचे दोन्हीकडून सांगितले गेले. (Sharad Pawar and Ajit Pawar)
तटकरे यांची भूमिका
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अलीकडे पंढरपूरला गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी तुम्ही विठ्ठलाला काही साकडं घातलं का? त्यावर तटकरे म्हणाले, “पांडुरंगाकडे अशा प्रकारची मागणी करण्याचं काही कारण येतच नाही. अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असे आम्ही सर्वांनी मिळून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्त्वाखाली उद्याच्या भविष्यासाठी राजकीय दृष्ट्या काम करणार आहोत. यात आम्हाला यश मिळत राहो,” अशी भूमिका तटकरे यांनी मांडली. (Sharad Pawar and Ajit Pawar)
साहेब कालही दैवत, आजही दैवत
राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे काही नेते एकमेकांना भेटतात. त्यांनी परस्परांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार यांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले. त्यानंत छगन भुजबळ यांनीदेखील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत, असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली होती. (Sharad Pawar and Ajit Pawar)
रयतच्या बैठकीत एकत्र
साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रायगडावरील कार्यक्रम तसेच सुनील तटकरे यांच्याकडील भोजन समारंभानंतर अजित पवार रयतच्या बैठकीसाठी आले होते. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीयांसह दोन्ही नेते एकत्र आले होते. आता एप्रिलला एआय (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलें आहे. यावेळी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे कार्यक्रमपत्रिकेवरून दिसते. (Sharad Pawar and Ajit Pawar)
राजकीय कार्यक्रमाचे निमंत्रण
सार्वजनिक कार्यक्रमांमधील एकत्र येणे समजू शकते. परंतु हा विषय आहे राजकीय कार्यक्रमासंदर्भात. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त येत्या दोन ते चार मे अखेर मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार असा एक कार्यक्रम आहे. त्यासाठी अजितदादांच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनाही निमंत्रण धाडले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचा मोलाचा वाटा असल्यामुळे तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे यासंबंधीच्या पत्रात म्हटले आहे. आमच्या विनंतीचा मान राखून आपण कार्यक्रमास उपस्थित राहाल, अशी आम्हास आशा वाटते,असेही पत्रात म्हटले आहे. (Sharad Pawar and Ajit Pawar)
शरद पवार यांच्याकडून काढून घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी त्यांनाच निमंत्रित करण्याची ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घटना ठरली आहे. शरद पवार या कार्यक्रमासाठी जातात का, हा खरा प्रश्न आहे. तसे झाले तर ती राष्ट्रीय राजकारणातील मोठी बातमी ठरेल. परंतु अजितदादांच्या पक्षाने साहेबांना निमंत्रित करणे हीसुद्धा मोठीच बातमी आहे. शरद पवार उपस्थित राहतात, पत्र पाठवतात की निमंत्रणाकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(Sharad Pawar and Ajit Pawar)