शेतकरी आत्महत्येचे शिंदे, फडणवीस, अजित पवार पापाचे धनी

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केली. राज्यात फोडाफोडीचे राजकारण होऊनही कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते महिलांचा सन्मान न करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना या निवडणुकीत जागा दाखवतील, असा विश्वासही व्यक्त केला.

गांधी मैदान येथे महाविकास आघाडी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रियांका गांधी यांच्या सभेत ते बोलत होते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी त्रिसूत्री कारिडॉर सुरू करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस सतेज पाटील यांनी व्यक्त केला. इंडस्ट्रियल कारिडॉर, आयटी हब, चित्रनगरी आणि उद्योगनगरीला ऊर्जितावस्था, तीर्थक्षेत्राचा विकास, गडकोट किल्ल्यांचे जतन, क्रीडानगरी या विषयांवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याचा विकास केला जाईल, असे आश्वासन दिले.

लोकसभा निवडणुकीत जनतेने चांगला कौल दिल्याने भाजप सरकार थोडक्यात वाचले, पण विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला हद्दपार करेल, असा विश्वास खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी अशी शूरवीरांची आणि महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराची असलेली कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला राज्यात सत्तेत आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ऑलिंपिक कास्यपदक विजेते बजरंग पुनिया म्हणाले, कुस्तीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता घालवली. सर्व जातीच्या मल्लांमध्ये समतेची भावना निर्माण करून त्यांच्यात स्वाभिमान जागवला. याच भूमीतील खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले. शूटिंगमध्ये स्वप्नील कुसाळे याने पदक मिळवून दिले. पण कोल्हापुरात आतंरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती आणि शूटिंग खेळाची अकॅडमी नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

यावेळी आमदार विश्वजित कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, बेळगाव- खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार के.पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर, राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेना शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अतुल दिघे, बाबूराव कदम, शिवाजीराव परुळेकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आपचे संदीप देसाई, दगडू भास्कर, कॉ. दिलीप पवार, चेतन नरके, राहुल देसाई आदी उपस्थित होते.

इंदिरा गांधी, डी. वाय.पाटील यांच्या आठवणींना उजाळा

१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांची सभा सायंकाळी सहा वाजता होती, पण ती रात्री एक वाजता सुरू झाली. त्याच मैदानावर प्रियांका गांधी यांची सभा होत आहे, अशी आठवण सतेज पाटील यांनी भाषणात सांगितली. काळम्मावाडी धरणाची पायाभरणी इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली होती, तर त्याच धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा  होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी आठवण प्रियांका गांधी यांनी भाषणात सांगितली.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी