बिहारमध्ये निवडणुका नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असल्या तरी ते मुख्यमंत्री असणार नाहीत, असं थेट नसलं तरी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलंय. अमित शाह यांनी हे विधान करून नीतिश कुमार यांना राजकारणाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याचं मानलं जातं. भाजपची ही चाल यशस्वी होते, की नीतिश कुमार भाजपला चकवा देऊन पुन्हा वेगळा मार्ग निवडतात, हे पाहावं लागणार आहे.
विजय चोरमारे
अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचे मुख्य रणनीतिकार मानले जातात. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील, असं विधान त्यांनी केलीय. त्यांच्या या विधानानं बिहारच्या राजकारणात निवडणुकीआधीच धमाल उडवून दिली आहे.
बिहारच्या निवडणुकीची संपूर्ण सूत्रे स्वतः अमित शाह यांच्या हातात आहेत. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना त्यात फारसा वाव नाही. नड्डा हे नामधारी अध्यक्ष असल्याचं जगजाहीर आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच एनडीएमधील जागावाटपाची गणितं जमवण्यासाठी अमित शाह पटण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत अमित शाह यांना विचारलं गेलं की, “निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारच राहणार का?” त्यावर त्यांनी उत्तर दिलं — “मी कोण आहे कोणाला मुख्यमंत्री बनवणारा?” त्यावर पत्रकारांनी विचारलं की, “जर भाजपला जास्त जागा मिळाल्या तर महाराष्ट्रासारखा बदल दिसेल का?” यावर अमित शाह हसत म्हणाले — “मी तुम्हाला हेडलाइन देणार नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो की निवडणुकीनंतर सर्व पक्षांचे आमदार आधी आपला नेता निवडतील, आणि नंतर घटक पक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्री ठरवतील.” (Shah’s statement about the CM post)
नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए निवडणूक लढवत आहे, अशी पुस्तीही अमित शाह यांनी जोडली. ती जोडण्यामागे नीतिश कुमार यांचे समर्थक मतदार नाराज होऊ नयेत, असा त्यांचा प्रयत्न राहिला. पण त्याचवेळी भाजपच्या मतदारांना त्यांनी, अंतिम निर्णय भाजपचाच असेल, असे संकेत दिले. नीतिश कुमार यांचं त्यांनी “देशातील महत्त्वाचे समाजवादी नेते” अशा शब्दात कौतुक केलं. म्हणजे अमित शाह यांचा नीतिश कुमार यांना सत्तेबाहेर घालवण्याबरोबर समाजवादालाही अलविदा करण्याचा विचार आहे की काय, अशी शंका येते..
नीतीश कुमार यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठेवण्याबाबत विचारल्यावर असं गोलमोल उत्तर दिल्याची ही पहिली वेळ नाही. भाजप आपल्या समर्थकांना पुढे काय घडणार आहे याचा अंदाज देतो. आणि त्याचवेळी स्वतःसाठी पळवाटही ठेवतो की “मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील”
बिहारमध्ये बहुतेक लोकांचं मत आहे की निवडणुकीत काहीही झाले म्हणजे नीतिश कुमार यांच्या पक्षाला कितीही जागा मिळाल्या तरी निवडणुकीनंतर नीतीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत. अमित शाह यांनी तीच गोष्ट हुशारीने सांगितली आहे — फक्त शब्द वेगळे आहेत.
या सगळ्या गोष्टींचा विचार करताना नीतीश कुमार यांची शेवटची “पलटी” आठवावी लागते. जेव्हा ते ‘इंडिया’ आघाडीचे सूत्रधार म्हणून पुढे येत होते, तेव्हा अमित शाह वारंवार म्हणत होते की, भाजपने नीतीश कुमार यांना आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत. आता नीतीश कुमार परत भाजपकडे जाणार नाहीत, असं सगळ्यांनाच वाटत होतं. परिणामी २०२४ची लोकसभेची निवडणूक भाजपसाठी कठीण ठरेल, असं चित्र होतं.
परंतु जेव्हा सगळं स्थिर दिसत होतं, तेव्हा अमित शाह यांनी एक छोटं पण महत्त्वाचं विधान केलं — “जर त्यांच्या बाजूने प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल.” ही बातमी जयपूरच्या एका वृत्तपत्रात छापली गेली होती, आणि पटण्यात कोणी त्याकडं विशेष लक्ष दिलं नव्हतं. त्यानंतर काही दिवसांतच नीतीश कुमार पुन्हा भाजपसोबत आले. नीतिश कुमार यांच्या साथीने भाजप पुन्हा बिहारमध्ये सत्तेत आला. (Shah’s statement about the CM post)
राजकीय अभ्यासकांच्या मते, निवडणूक होईपर्यंत नीतीश कुमार यांनाच एनडीएचा चेहरा दाखवलं जाईल. पण निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपकडेच असेल. मागच्यासारख्या जेडीयूच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होईल. महाराष्ट्रात जे घडलं त्याची पुनरावृत्ती होईल. एकनाथ शिंदे यांना जसं बाजूला केलं, तसं नीतिश कुमार यांना बाजूला केलं जाईल. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणं ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, त्यांतर त्यांना केंद्रात मंत्रिपदाचा पर्यायही असेल. नीतिश कुमार कोणता पर्याय स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. (Shah’s statement about the CM post)