मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्वाभीमानी महाराष्ट्र आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Sapkal criticizes Shinde)
सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला. (Sapkal criticizes Shinde)
पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांनी केलेल्या घोषणेचा समाचार घेत ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले व मुख्यमंत्रीपदी बसवले त्या शिंदेच्या तोंडून मोदी-शाह यांची स्तुती करणे समजू शकतो पण आपल्या गुजराती मालकाला खूश करण्यासाठी चक्क जय गुजरात म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे. अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का? असा सवाल करत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. (Sapkal criticizes Shinde)
‘‘मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम शिंदे करत आहेत. मागील ११ वर्षात महाराष्ट्रातील उद्योग, संस्था, कार्पोरेट ऑफिसेस आणि कोट्यवधीचा निधी हा फडणवीस आणि शिंदेंमुळेच गुजरामध्ये जात आहेत. वेदांता फॅाक्सकॅानसारखे मोठे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला पाठवून दिला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कुपोषण वाढले आहे पण सत्तेतील हे लाचार गुजरातची गुलामी करण्यात व्यस्त आहेत,’’ असा टोलाही लगावला आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!
शाहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर : संजय राऊत