जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याचा छडा लावत राहणारच. आपण कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्के माहिती दिली असून जर तपासात काळंबेरं केले तर अजून ७० टक्के माहिती उघड करू, सरकारला ते महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दिला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्लॅकबॉक्स जळून गेल्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. (Rohit Pawar’s warning to the government)
विधिमंडळाच्या परिसरात पत्रकाराशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांच्याविषयी शोक प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे, परंतु त्याआधी त्यांनी विमान अपघाताच्या चौकशीसंबंधी सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का? हे तपासावे. अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी पत्र देणार आहे. केंद्रीय मंत्री नायडू यांना पदावर ठेवणं योग्य नाही. रिपोर्टमध्ये डिटेल्स असावेत, थातूरमातूर उत्तर नसावे , असेही त्यांनी स्पष्ट केले. (Rohit Pawar’s warning to the government)
यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने पाच हजार तासांपेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान आठ हजारांपेक्षा जास्त तास उडून झाले होते. यात एका माणसाचा जीव गेला. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेला. (Rohit Pawar’s warning to the government)
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. ब्लॅक बॉक्स जिथे असतो, तो विमानाचा भाग जशाच्या तसा तिथे होता. रोहित पवार काही चौकशी करीत आहेत, ते अतिशय योग्य आहे. ते बरेच संशोधन करत असून त्या माध्यमातून विमानाची बरीच माहिती काढली आहे. कंपनी कोणाची?, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत?, विमान किती तास उडलं होतं?, त्याला इतके तास उडण्याची परवानगी होती का नव्हती?, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीए अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत?, ही कंपनी कोणाच्या अधिपत्याखाली चालते?, हे सर्व प्रश्न आता समोर आलेत. जेवढी चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढा संशयाला वाव मिळेल. अजित पवार आज नाहीत. त्यामुळे अधिवेशनात काय बोलावं ते कळत नाही. एवढा मोठा नेता आपल्यात नाहीये. ही वेदना आहे. अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडलाय. त्यांनी नेहमी काम करत राहा, असा विचार आपल्या सगळ्यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. (Rohit Pawar’s warning to the government)