कोल्हापूर :प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी या आवाहनाला कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोल्हापूरकरांनी आपले दातृत्व दाखवताना मोठी मदत दिली. आज सोमवारी कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ टेंपोंतून जीवनावश्यक वस्तूंची मदत मराठवाड्याकडे रवाना झाली. पुढील टप्प्यात शालेय साहित्य पाठवणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. (Relief sent to Marathwada)
आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा आवाहन केलं होतं. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अबालवृद्धांनी मदतीसाठी हात पुढे केला. काँग्रेस कमिटीत गेले आठवडाभर मदत देण्याऱ्यांची रीघ लागली होती. पुरामुळे जनजीवन उध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेटस, चटईपर्यत कोल्हापुरातील प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल २७ टेम्पो भरुन गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली. (Relief sent to Marathwada)
धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच टेम्पो पाठवण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराजांनी कोल्हापूरकर एखाद्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येत आहे, काँग्रेसचा हा मदतीचा हात पूरग्रस्तांच्यासाठी आधार देणारा असेल असंही त्यांनी सांगितले. (Relief sent to Marathwada)
आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मराठवाड्याला मदत करण्याच आवाहन केले होते. त्याअनुषंगाने ही मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगीतले. जिल्ह्यातील नागरिक अजून काँग्रेस कमिटीत येऊन मदत देत आहेत. सध्या मराठवाड्यात शाळेचे दप्तर आणि वह्या यांची गरज आहे. पुढच्या काळात दप्तर आणि वह्या दसऱ्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Relief sent to Marathwada)
आज पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये, जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये तांदूळ, गहू, साखर तूरडाळ मसूरडाळ, खाद्यतेल, शाबु, रवा आदि वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर पाण्याचे बॉटल्स, कपडे ब्लॅंकेट्स, शालेय उपयोगी साहित्य पाठवण्यात आले. यावेळी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राहूल देसाई, जीवन पाटील, सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राहुल माने, अर्जुन माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, इंद्रजीत बोंद्रे, संदीप नेजदार, तौफीक मुल्लाणी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजू साबळे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, संजय पोवार – वाईकर, सुप्रिया साळोखे, विनायक घोरपडे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते. (Relief sent to Marathwada)