मुंबई : प्रतिनिधी : मतदार यादीतील घोळासंबधी भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके कन्फ्युज विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत, अशी टीका केली होती. फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावताना नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते तर त्यापेक्षाही आता फडणवीस कमी शहाणे दिसत आहेत असा टोला लगावला. (Raut’s attack on Fadnavis)
विरोधी आघाडीच्या नेत्यांनी गेले दोन दिवस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्या आयुष्यात इतके कन्फ्युज विरोधक पाहिलेले नाहीत. यातलं सगळं काही शरद पवारांना कळतं त्यामुळेच ते तिथे गेले नाहीत असा दावा केला. या टीकेला खासदार राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
खासदार राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस हे असेच बोलायचे. पेशवाईतील कागपत्रांचा अभ्यास केला तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत असल्याचे दिसून येते. पेशवाईतील जे साडेतीन शहाणे होते त्यामध्ये नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते. त्यामुळे पेशवाई बुडाली. त्यानंतर आता फडणवीस हे त्यापेक्षा कमी शहाणे दिसत आहेत अशी टीका केली. (Raut’s attack on Fadnavis)
खासदार राऊत म्हणाले, फडणवीस हे वकील असून ते भाजपचे नेते आहेत. म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. आम्ही जे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले, ते त्यांच्या काळजात घुसले आहेत. मतचोरी, घोटाळे आणि बोगस मतदानांवर निवडणूक जिंकता येते. मग यात कन्फ्युजन काय आहे हे फडणवीसांनी सांगावे. फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही, असा टोलाही त्यांनी मारला. त्यांना कुणी वकील केले, त्यांनी कुठुन वकिली केली हे कळायला मार्ग नाही. नरेंद्र मोदी यांच्या मेहरबानीने ते मुख्यमंत्री झाले. ते कर्तुत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. (Raut’s attack on Fadnavis)